मुंबई हल्ला 26/11: तहव्वुर राणाचं प्रत्यर्पण कधी होणार? अमेरिकेतील न्यायालयानं काय म्हटलं?

अमेरिकन तुरुंगात कैदेत असलेल्या पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन व्यावसायिक तहव्वुर राणा यांचं भारताकडे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडणार असल्याची चिन्हं आहेत.
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप तहव्वुर राणा यांच्यावर आहे. याच प्रकरणी त्यांना अमेरिकेकडून अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी (24 जून) लॉस एंजिलिसमधील एका न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. यामध्ये न्यायाधीश जॅकलीन चूलजियान यांनी सरकारी तसंच बचाव पक्षाच्या वकिलांना आणखी काही कागदपत्रे जमा करण्यास सांगितली आहेत. यासाठी त्यांनी 15 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत तहव्वुर राणा अमेरिकेच्याच तुरुंगात राहतील, असं न्यायाधीशांनी आदेशात म्हटलं आहे.
गुरुवारी सुनावणीकरिता तहव्वुर राणा न्यायालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पांढरा जंपसूट घातलेला होता. त्यांच्या डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा होता. तसंच त्यांच्या पायात बेड्या अडकवलेल्या होत्या.
बाजूलाच त्यांच्या दोन्ही मुली उभ्या होत्या. त्यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
भारत सरकारच्या विनंतीनुसार, प्रत्यर्पणाची ही सुनावणी घेण्यात येत होती. न्यायालयातील नोंदीनुसार, अमेरिकन सरकारने याच आठवड्यात दोनवेळा सीलबंद भारतीय दस्तऐवज न्यायालयात जमा केले होते.
सरकारच्या विनंतीमुळेच हे दस्तऐवज सीलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भारतात तहव्वुर राणा यांच्याविरोधात ऑगस्ट 2018 मध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला होता.
तहव्वुर राणा हे लष्कर-ए-तोयबाचे कट्टरवादी डेव्हिड कोलमन हेडली यांचे बालपणीचे मित्र असल्याचा भारत सरकारचा दावा आहे.

फोटो स्रोत, Reuters
दुसरीकडे राणा यांना हेडली यांच्या प्लॅनबाबत काहीही माहीत नव्हतं, असा बचाव त्यांच्या वकिलांनी केला आहे. ते फक्त मुंबईत एक कार्यालय स्थापन करण्यासाठी हेडलीची मदत करत होते, असं वकिलांनी सांगितलं.
भारत सरकारच्या विनंतीनंतर, तहव्वुर राणा यांना मुंबई 26/11 हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपांखाली लॉस एंजिलिस येथून 10 जून 2020 रोजी अटक करण्यात आली होती.
2008 च्या मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने तहव्वुर राणा यांना वॉंटेड यादीत टाकून फरार घोषित केलं होतं.
भारतीय तपास संस्थांच्या मते, पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन नागरीक असलेले डेव्हिड हेडली यांनी 2008 च्या मुंबई हल्ल्याचं षडयंत्र रचलं होतं.
या प्रकरणात हेडली यांनीही आपल्या कृत्याची कबुली दिली. तसंच ते आता सरकारी साक्षीदार बनले आहेत. या प्रकरणात त्यांना अमेरिकेत 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
59 वर्षीय राणा यांचं भारताकडे होत असलेलं प्रत्यार्पण उभय देशांत झालेल्या करारानुसार होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
या करारानुसार भारत सरकारने प्रत्यार्पणासाठी औपचारीक मागणी केली असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भारताने राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक सर्व अटी व शर्थी पूर्ण केल्यास त्याला मंजुरी दिली जाईल, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
सध्यातरी भारताकडे राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक ते सर्व पुरावे आहेत. भारताची मागणी फेटाळून लावण्यासाठी राणाने कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























