महात्मा गांधीजींच्या पणती आशिष लताला फसवणुकीप्रकरणी 7 वर्षांचा तुरुंगवास

फोटो स्रोत, TWITTER/@TIMESLIVE
महात्मा गांधीजींची पणती आशिष लता रामगोबिन यांना दक्षिण आफ्रिकेतील कोर्टानं 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. 60 लाख रँड (रँड हे दक्षिण आफ्रिकेतील चलन आहे) च्या फसवणुकीप्रकरणी डर्बन कोर्टानं ही शिक्षा सुनावली.
आशिष लता रामगोबिन या 56 वर्षांच्या आहेत. डर्बन कोर्टानं सोमवारी (7 जून) फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावलीय.
60 लाख रँड म्हणजे भारतातील रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास, जवळपास तीन कोटींपर्यंत ही रक्कम जाते.
आशिष लता रामगोबिन यांनी उद्योगपती एस. आर. महाराज यांना फसवल्याचा आरोप होता.
आशिष लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची कन्या होत. इला गांधी या महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांच्या कन्या आहेत.
आशिष लता रामगोबिन यांच्यावर काय आरोप होते?
पीटीआय वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, हे 2015 सालचं प्रकरण आहे. आशिष लता यांच्याविरोधात सुनावणी झाली होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील NPA चे ब्रिगेडियर हंगवानी मूलौदजी यांनी म्हटलं होतं की, आशिष लता यांनी गुंतवणूकदारांना विश्वास देण्यासाठी बनावट कागदपत्र दिले होते, ज्यात असं सांगितलं होतं की, भारतातून लिनेनचे तीन कंटेनर येत आहेत.
त्यावेळी आशिष लता यांना 50 हजार रँडच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER/@TIMESLIVE
सोमवारी (7 जून) सुनावणीदरम्यान कोर्टानं सांगितलं की, आशिष लता यांनी 'न्यू आफ्रिका फुटवेअर डिस्ट्रिब्युटर्स'चे संचालक एस. आर. महाराज यांच्याशी ऑगस्ट 2015 मध्ये चर्चा केली होती. महाराज यांची कंपनी कपडे, लिनेन आणि चप्पल-बुटांची आयात, निर्मिती आणि विक्रीचं काम करते. महाराज यांची कंपनी लाभांशाच्या आधारावर इतर कंपन्यांना वित्तीय मदतही देते. आशिष लता यांनी महाराजांना सांगितलं होतं की, त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉस्पिटल ग्रुप नेट केअरसाठी लिनेनचे तीन कंटेनर मागवले आहेत.
स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आशिष लता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नेट केअरची कागदपत्रं पाहता, महाराज यांनी कर्जासाठी त्यांच्यासोबत लिखित करार केला होता. मात्र, जेव्हा त्यांना बनावट कागदपत्रांबाबत कळलं, तेव्हा त्यांनी आशिष लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
कौटुंबिक पार्श्वभूमी
आशिष लता इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन-व्हॉयलन्स नामक एका अशासकीय संस्थेच्या कार्यक्रमाच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक होत्या.

महात्मा गांधीजींचे अन्य वंशजही मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यात आशिष लता यांचे चुलत भाऊ कीर्ती मेनन हेही आहेत.
आशिष लता यांची आई इला गांधी यांना मानवाधिकारांसंबंधी कामामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली. भारतासोबत दक्षिण आफ्रिकेतही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
इला गांधी या महात्मा गांधींच्या चार मुलांपैकी एक असलेल्या मणिलाला गांधी यांची कन्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























