पाकिस्तानः दरोडेखोरांसमोर पाकिस्तानातले पोलीस हतबल का झाले?

फोटो स्रोत, ABDUL KHALIQ SOOMRO
- Author, रियाज सुहैल
- Role, बीबीसी उर्दू सर्व्हिस, कराची (पाकिस्तान)
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सोशल मीडियावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक व्हीडिओ व्हायरल होतोय. पोलीस अधिकारी सज्जाद चांडियो हे या व्हीडिओत दिसत असून, चिलखती गाडीतून हा व्हीडिओ तयार केला गेलाय. बाहेरून सतत गोळीबार होत असल्याचं व्हीडिओतून दिसतंय, आवाज येतोय.
दरोडेखोर 'धछको'मधून पोलिसांवर निशाणा साधत होते. पाकिस्तानमध्ये स्थानिक भाषेत 12.5 आणि 12.7 एमएमच्या अँटी-एअरक्राफ्ट बंदुकीला 'धछको' म्हणतात.
सज्जाद चांडियो त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बचावासाठी विनवण्या करताना व्हीडिओत दिसतात. तीन साथीदार मारले गेलेत आणि दोघे अजूनही जिवंत आहेत, असं ते सांगत आहेत.
या दरम्यान त्या गाडीवर सलग गोळीबार होत असल्याचा आवाज व्हीडिओतून ऐकायला येतो. या व्हीडिओत त्यांनी मृतदेहही दाखवले आणि म्हणाले की हा आमचा शेवटचा व्हीडिओ असेल.
मात्र, सज्जाद चांडियो आणि इतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एका पथकाने वाचवलं.
'चिलखती गाडी शवपेटी बनली'
सज्जाद चांडियो शिकारपूरचे पोलीस अधिकारी आहेत. काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी हल्ला केलेल्या चिलखती गाडीत सज्जाद होते. दरोडेखोरांच्या या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी आणि एका फोटोग्राफरचा मृत्यू झाला.

बीबीसीशी बोलताना सज्जाद चांडियो यांनी सांगितलं, "आम्ही गढी तिगानी छावणीत जमलो आणि तिथून निघालो. 15-20 मिनिटंच गेलो असेल, तेवढ्यात आमच्या चिलखती गाडीवर गोळीबार सुरू झाला. एक गोळी चालकाच्या पायाला लागून गिअरवर आदळली. त्यामुळे गाडी बंद पडली. गाडी ना पुढे जात होती आणि ना मागे. आम्ही हतबल झालो होतो आणि बाहेरून गोळीबार सुरूच होता."
गोळीबारात चिलखती गाडीची काचही फुटली आणि एक रॉकेट तर गाडीत येऊन पडलं. त्यामुळे दोन साथीदारांचा मृत्यू झाला.
व्हीडिओ बनवण्याचा उद्देश काय?
सज्जाद चांडियोंनी सांगितलं की, चिलखती गाडीत संपर्कासाठी वॉकी-टॉकी असतं. मात्र, ते काम करत नव्हते आणि त्या भागात मोबाईल नेटवर्कही नव्हतं.
आम्हाला वाटलं हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्हीडिओ बनवला आणि पोलिसांच्या ग्रुपवर पाठवला, असं सज्जाद सांगतात.
"माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दुसरी चिलखती गाडी आमच्या गाडीच्या बाजूला आणून दरवाजा उघडून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमक्या याच वेळी गोळीबार वाढत होता. पण प्रयत्नांअंती आम्हाला वाचवण्यात यश मिळालं. ज्यांचा मृत्यू झाला ता, त्यांना तिथेच सोडण्यात आलं," असं सज्जाद सांगतात.
सज्जाद म्हणतात, "माझ्या डोळ्यांसमोर साथीदारांच्या शरीराचे तुकडे पडले. गेल्या 8-9 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होतो. ऑपरेशनदरम्यान आई-बाबा किंव भाऊ कुणीही सोबत नसतं. पोलीस साथीदारच एकमेकांची काळजी घेतात."
सज्जाद चांडियो याआधीही दरोडेखोरांविरोधातील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. ते सांगतात, शिकारपूरमध्ये दरोडेखोरांनी जमिनीत खड्डे बनवले आहेत. त्यातून ते गोळीबार करतात.
चिलखती गाड्यांच्या बनावटीवर प्रश्न उपस्थित
दरोडेखोरांनी ज्या चिलखती गाड्यांवर हल्ला केला होता, त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. एक गोळी तर गाडीच्या आता घुसली होती.
चिलखती गाडीवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाहीय. जून 2019 मध्ये शिकारपूर आणि सुक्कुरमध्ये गुलाम मुस्तफा मिरानी, जुल्फिकार आणि गुलाम शाह असे अधिकारी हल्ल्यात मृत्युमुखी पडले. हे तिघेही चिलखती गाडीतच होते.

फोटो स्रोत, ABDUL KHALIQ SOOMRO
काही महिन्यानंतर 22 ऑगस्टला गढी तेगो इथं एक ऑपरेशन पार पडलं. या दरम्यान हल्ला झाला आणि त्यात डीएसपी राव शफीउल्लाह यांचा मृत्यू झाला.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हा हल्लाही चिलखती गाडीवर झाला होता आणि शफील्लाह हे गाडीत होते. मात्र, नंतर डीआयजी इरफान बलूच यांनी त्यांच्या अहवालात शफील्लाह यांचा मृत्यू गाडीच्या बाहेर झाला अस म्हटलं.
2012 साली कराचीच्या लियार ऑपरेशदरम्यानही तीन चिलखती गाड्यांवर हल्ले झाले. यात एसएचओसह जवळपास डझनभर पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले होते.
माध्यमांनी चिलखती गाड्यांच्या बनावटीवर आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
सिंध पोलीस या चिलखती गाड्या हेवी इंडस्ट्री टॅक्सलाकडून खरेदी करतात.
हेवी इंडस्ट्रीज टॅक्सलाने 2012 साली लियारी घटनेनंतर आरोपांचं खंडन केलं होतं की ऑपरेशनच्या दरम्यान बी-7 चिलखती गाड्यांचं नुकसान झाले असतानाही सिंधु पोलिसांनी त्यांना 32 चिलखती गाड्यांची ऑर्डर दिलीय.
बी-6 आणि बी-7 या चिलखती गाड्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहाय्यक कंपनीत बनवल्या जातात. सिंध पोलिसांकडे बी-6 गाड्या होत्या, बी-7 नंतर खरेदी केल्या गेल्या.
डीआयजी आणि एसएसपी स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांच्या मते, बी-7 गाड्यांच्या मॉडिफिकेशनची आवश्यकता आहे.
'धछको'समोर पोलीस हतबल
शिकारपूर चकमकीतून वाचलेल्या सज्जाद चांडियो हे याआधीही काही दरेडोखोरांविरोधातील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या मते, धछको बंदुकीबाबत याआधी केवळ ऐकलं होतं, मात्र पहिल्यांदा तिचा निशाणा पाहिला.
इरफान बलूच यांच्या मते, चिलखती गाड्या कलाश्निकोव आणि जी-3 पासून संरक्षण करू शकतात. 12.5 आणि 12.7 एमएमच्या अँटी-एअरक्राफ्ट बंदुकीनं तिच्यावर गोळीबार केल्यास बचाव अशक्य आहे.
12.7 एमएम अँटी-एअरक्राफ्ट बंदूक रशियानिर्मित आहे. 700 ते 800 राऊंड प्रतिमिनिट अशी तिची क्षमता आहे. 1600 ते 1700 मीटरपर्यंत या बंदुकीची रेंज आहे. रशियन सैन्य या बंदुकीचा पूर्वी वापर करत असे.
सिंध प्रांतात इतकी शस्त्रं येतात कुठून?
सिंध प्रांतात कुठलेही शस्त्रनिर्मिती कारखाने नाहीत. मग रॉकेट लाँचरसह आधुनिक शस्त्र सिंध प्रांतात येतात कुठून?
क्वेटाच्या स्पेशल ब्रांचचे डीआयजी कप्तान परवेझ चांडियो सांगतात, अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातून झोब, लोरालई, दकी, कोहलू आणि डेरा बुगटीपर्यंत शस्त्र पोहोचतात. तिथून कट्टरतावादी आणि सिंधमधील दरोडेखोर शस्त्रांची खरेदी करतात.
उत्तर सिंधमध्ये पोलीस सेवा बजावलेल्या एका डीआयजीनं सांगितलं की, उत्तर सिंधच्या तीन जिल्ह्यांमध्ये डझनभराहून अधिक अँटी-एअरक्राफ्ट गन 'धछको' आहेत.
दुसरीकडे, सिंधमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशनसाठी आधुनिक शस्त्रांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. आधुनिक शस्त्रांची आवश्यकता आहे.
"आमच्याकडे 3-जी आणि कलाश्निकोव बंदुका आहेत. मात्र, दरोडेखोरांकडे दूरपर्यंत निशाणा साधता येण्यासारखी शस्त्रं आहेत. अनेकदा आम्ही केवळ हवेत गोळीबार करून दबाव आणतो. कारण मुकाबला करणं कठीण असतं," असं पोलीस अधिकारी सांगतात.
सिंध सरकारचे प्रवक्ते मुर्तजा वहाब म्हणतात की, जुन्या शस्त्रांनी दरोडेखोरांचा सामना अशक्य असल्यानं नवीन शस्त्रखरेदीला सिंध सरकारचा पाठिंबाच आहे.
तर स्पेशल ब्रांचचे डीआयडी कप्तान परवेज चांडिया यांच्या मते, बलुचिस्तानात अफागणिस्तानच्यी सीमेवर कुंपणाचं काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात सीमेपलिकडून शस्त्र येणार नाहीत आणि त्यामुळे परिस्थिती सुधारेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























