भावेश झवेरीः एक विमान, 360 सीट, मुंबई ते दुबई प्रवास फक्त एका माणसासाठी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबई ते दुबई विमान उडालं खरं पण फक्त एका प्रवाशाला घेऊन. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, असंच आश्चर्य त्या व्यक्तीला वाटलं ज्यांनी 360 सीटांच्या या विमानात एकट्याने बसून प्रवास केला.
आता हे कधी झालं, कसं झालं हे वाचण्याआधी हे नक्की जाणून घ्या - यात कोणाची चूक नव्हती ना कुठला गैरसमज. ज्यांच्या बाबतीत हे झालं ते या गोष्टीला आपलं 'नशीब' मानतात.
कोण आहेत हे प्रवासी?
तारीख : 19 मे 2021
स्थळ : मुंबई एअरपोर्ट
वेळ : सकाळचे 4 वाजता
व्यक्ती : भावेश झवेरी
दुबईस्थित भावेश आपल्या व्यवसायानिमित्त मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत आले होते. काम संपवून परत जाण्याचं बुकिंग त्यांनी 10 दिवस आधीच केलं होतं. ते सहसा बिझनेस क्लासने प्रवास करायचे. पण कोरोनाच्या साथीमुळे विमानात गर्दी नसेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी एकोनॉमी क्लासचं तिकीट बुक केलं. या तिकीटासाठी त्यांना 18 हजार रूपये खर्च आला.
19 मेला सकाळी 4.30 वाजताची फ्लाईट होती. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांच्या नियमांनुसार ते मध्यरात्रीच विमानतळावर पोहचले. चेक-इन करताना त्यांना कळलं की प्रवास करणारे ते एकटे व्यक्ती आहेत. थोडावेळ त्यांनाच हे पटलं नाही, पण जरा वेळाने कळलं की हे स्वप्न नाही, खरंच असं घडतंय.

फोटो स्रोत, Bhavesh javeri
गेल्या 20 वर्षांपासून ते दुबईला जातात. त्यांनी मुंबई-दुबई हा प्रवास कित्येकदा केला आहे पण असा 'सुखद' अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला.
दुबईहून बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी सहसा व्हीडिओ वगैरे काढत नाही, कॅमेऱ्यासमोर यायलाही मला संकोच वाटतो पण हा सगळा प्रवास मी माझ्या मोबाईलवर शूट केला. मी हा प्रवास माझ्या आठवणींमध्ये कायमचा जिवंत ठेवू इच्छितो. चेक-इननंतर एअरपोर्टच्या गेटपासून फ्लाईटपर्यंत मला तसंच अटेंड केलं जसं कोणत्याही प्रवाशाला केलं गेलं असतं. एमिरेट्सच्या फ्लाईट क्रू साठीही हा वेगळाच अनुभव होता. विमानात शिरल्याबरोबर सगळ्या फ्लाईट क्रूने टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. पायलटही मला भेटायला कॉकपिटमधून बाहेर आले. त्यांनी गमतीत मला पूर्ण विमान फिरवण्याची ऑफरही दिली."

फोटो स्रोत, Bhavesh javeri
खर्च
एमिरेट्सची फ्लाईट, ज्यात भावेश मुंबईहून दुबईला गेले, ते 360 सीटांचं बोईंग 777 विमान होतं.
आता तुमच्या डोक्यात विचार आला असेल की या सगळ्या प्रवासासाठी विमान कंपनीला किती खर्च आला असेल तर तेही ऐका.

फोटो स्रोत, Bhavesh javeri
एव्हिएशन एक्स्पर्ट राजेश हांडा म्हणतात की, "मुंबईहून दुबईच्या विमानप्रवासात अडीच तास लागतात. या प्रवासात जवळपास 25 टन इंधन खर्च झालं असेल. एअरलाईन्सने फक्त इंधनावर 12-15 लाख रूपये खर्च केले असतील. पूर्ण प्रवासाचा खर्च काढला तर 20-25 लाख रूपये खर्च झाले असतील.
पण एका प्रवाशासाठी कोणताही एअरलाईन्स इतका खर्च का करेल?
हा प्रश्न भावेश यांच्याही मनात होता आणि त्यांनी क्रू मेंबर्सला हाच प्रश्न विचारला.
आम्ही एमिरेट्स एअरलाईन्सला हा प्रश्न विचारण्याआधीच भावेशने आम्हाला याचं उत्तर देऊन टाकलं.

फोटो स्रोत, Bhavesh javeri
"मला अंदाज होताच की विमानात फारशी गर्दी नसेल. यूएईमध्ये सध्या कोरोना साथीमुळे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आहे. फक्त गोल्डन वीजा, यूएईचे नागरिक आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनाच भारतातून दुबईत जाण्याची परवानगी आहे. फक्त या तीन वर्गातले प्रवासी कमर्शिअल फ्लाईटमधून दुबईला जाऊ शकतात. दुबईतून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईत असंही आलं होतं. परत जाताना रिकामंच जाणार होतं. मी बुकिंग केलं होतं त्यामुळे मला या विमानातून प्रवास करण्याची परवानगी दिली गेली."
एकट्याने प्रवासाचा अनुभव
भावेश व्यवसायाने हिऱ्याचे व्यापारी आहेत. 'स्टारजेम्स ग्रुपचे' ते सीईओ आहेत. दुबईत ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहातात. 360 सीटांच्या फ्लाईटमध्ये एकट्याने प्रवास करण्याचा त्यांचा व्हीडिओ मुंबई आणि दुबईत खूप व्हायरल होतोय.

फोटो स्रोत, Bhavesh javeri
या पूर्ण प्रवासाचं वर्णन ते 'एक खूप सुंदर प्रवास' असं करतात. त्यांच्या मते अशी संधी नशिबानेच मिळते. पैशाने हा आनंद विकत घेता येत नाही. "माझी फ्लाईट पहाटेची होती त्यामुळे माझी झोप पूर्ण झाली नाही. प्रवासत झोपण्याची माझी इच्छा नव्हती पण डोळा लागलाच. घरी पोहचल्यावर मी घरच्यांना माझा अनुभव सांगितला. आता सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्यामुळे मला ओळखीपाळखीच्या खूप लोकांचे फोन येत आहेत. माझी मुलंही मला आता सेलिब्रिटी म्हणून चिडवत आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























