कोरोना : भारतात वाढणारा कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूंची संख्या भयावह - कमला हॅरीस

फोटो स्रोत, Getty Images
भारत वाढत असलेला कोरोना संसर्ग आणि मृत्यूंची संख्या भयावह आहे, असं अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांनी म्हटलं आहे.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरीस म्हणाल्या, "भारताची मदत करणं अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या स्वकीयांना गमावलेल्या लोकांच्या दुःखात मी सहभागी आहे."
भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी कोव्हिड-19 शी संबंधित एका कार्यक्रमात कमला हॅरीस बोलत होत्या.
आपल्या रेकॉर्डेड संदेशात त्या म्हणाल्या, "माझ्या कुटुंबातील अनेक पिढ्या भारतातील आहेत, हे तुम्हाला माहीत असेलच. माझ्या आईचा जन्म आणि वाढ भारतातच झाली. माझ्या कुटुंबातील अनेक सदस्य अजूनही भारतातच राहतात. भारताची मदत करणं अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतातील परिस्थिती बिघडत चालल्याचं दिसताच अमेरिकन प्रशासनाने पावलं उचलली."
पण भारतात दुसरी लाट आल्यानंतर बायडन सरकारच्या भूमिकेवर खूप टीका झाली होती. इतर देश भारताच्या मदतीसाठी लगेच पुढे आले. पण अमेरिका शांत बसून होता, अशी टीका करण्यात येत होती.
सुरुवातीपासून आतापर्यंत अमेरिकेने भारताला 100 मिलियन डॉलरची मदत केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हॅरीस म्हणाल्या, "26 एप्रिलला राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं. 30 एप्रिलपासून अमेरिकेच्या प्रशासनाकडून प्रत्यक्ष मदत केली जात आहे. भारताला N-95 मास्क, ऑक्सिजन सिलेंडर यांच्यासारखी मदत पाठवण्यात आली आहे. यापुढेही ती पाठवण्यात येईल."
US एडच्या माहितीनुसार, भारताला पाठवण्यात आलेल्या मदतीत रेमडेसिवीरच्या 1 लाख 25 हजार कुप्या, 1500 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि 10 लाख रॅपिड टेस्टींग किट यांचा समावेश आहे.
आतापर्यंत अमेरिकेकडून 6 विमानांमार्फत मदत पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 550 मोबाईल ऑक्सिजन कॉन्संट्रेटरही आहेत. हवेतील ऑक्सिजनचा वापर करून हे उपकरण काम करतं.
याचा वापर एकाच वेळी अनेक रुग्णांवर केला जाऊ शकतो. हे सुमारे पाच वर्षांपर्यंत चालू शकतं.
पेटंटमध्ये सवलत देण्याला आमची सहमती आहे. भारत तसंच इतर देशांतील नागरिकांचं लसीकरण लवकर होण्यासाठी हे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
बायडन प्रशासनाने यापूर्वीही लशींच्या पेटंटसंदर्भात सवलत देण्याबाबत म्हटलं होतं. भारताने अमेरिकेच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे.
हॅरीस पुढे म्हणाल्या, "कोरोना संकटाच्या सुरुवातीला अमेरिकेत बेडची कमतरता होती, त्यावेळी भारताने आमची मदत केली होती. त्यामुळे आम्ही भारताची मदत करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही भारताचे मित्र, आशियाई क्वाड आणि जागतिक संघटनेचे सदस्य या नात्याने भारताची मदत करत आहोत."
कोण आहेत कमला हॅरिस?
55 वर्षांच्या कमला हॅरिस अमेरिकेच्य उपराष्ट्राध्यक्षा आहेत.
त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतातला, तर वडिलांचा जन्म जमैकामधला. हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. स्वतःच्या ओळखीवर आपण समाधानी असल्याचं आणि स्वतःला केवळ एक अमेरिकन नागरिक म्हणणं आवडत असल्याचं त्या सांगतात.
हॉर्वर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्या वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























