आईनस्टाईन, इलॉन मस्क, लेडी गागा : 'या' 14 लक्षणांवरून एखादी व्यक्ती जीनियस आहे की नाही हे कळू शकतं...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅना पाईस
- Role, बीबीसी मुंडो
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
प्रसिद्ध संगीतकार लुडविग व्हॅन बिथोवन यांना गणित सोडवता यायची नाहीत. त्यांना कधी गुणाकार-भागाकार करता आला नाही.
प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांना बाराखडी यायची नाही. चित्रपट निर्मितीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वॉल्ट डिस्ने वर्गात झोपा काढायचे. 20 शतकातल्या प्रसिद्ध लेखकांपैकी एक असणाऱ्या व्हर्जिनिया वुल्फ यांना कधी शाळेतही जाऊ दिलं नाही. त्यांचे बंधू मात्र केंब्रिजमध्ये शिकले.
चार्ल्स डार्विन शाळेत असताना सुमार विद्यार्थ्यांमध्ये गणले जायचे. परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्या वडिलांनी म्हटलं होतं डार्विन घरच्यांची मान घालायला लावतील.
यापैकी प्रत्येक जण आजच्या शैक्षणिक मानकांनुसार हुशार नव्हता पण त्यांनी कला आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या बळावर सर्वोच्च स्थान मिळवलं.
आजच्या प्रतिभावंत लोकांविषयी बोलायचं झालं तर बिल गेट्स, बॉब डिलन, ओप्रा विन्फ्रे या सगळ्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं किंवा त्यांनी स्वतः सोडून दिलं. पण तरीही त्यांनी आपआपल्या क्षेत्रात यश मिळवलं.
अमेरिकन म्यूझिकोलॉजीत प्रोफेसर असणारे डॉ क्रेग राईट गेल्या दोन दशकांपासून इतिहासातल्या आणि सध्याच्या काळातल्या प्रतिभावंत लोकांचा अभ्यास करतात.
नुकतंच त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे ज्याचं नाव आहे - 'द हिडन हॅबिट्स ऑफ जीनियस : बियॉन्ड टँलेंट, आयक्यू अँड ग्रीट - अनलॉकिंग सिक्रेट्स ऑफ ग्रेटनेस'. या पुस्तकात त्यांनी 14 अशा लक्षणांविषयी लिहिलं आहे जे प्रतिभावंत लोकांमध्ये सारखे असतात.
जीनियस (प्रतिभावंत) व्यक्तीची व्याख्या
कोणाला प्रतिभावंत म्हणावं याची एक सरधोपट व्याख्या नाहीये. ती वेगवेगळ्या लोकांनुसार बदलत राहते.
पण डॉ राईट यांच्यानुसार, "प्रतिभावंत व्यक्तींमध्ये विलक्षण अशी मानसिक ताकद असते ज्यांच्या कार्यामुळे समाजात काहीतरी मोठा आणि चांगला बदल घडतो."

फोटो स्रोत, craig wright
त्यांनी प्रतिभेचं सूत्रही बनवलं आहे - G = SxNxD
म्हणजेच,
जीनियस = प्रभाव किंवा बदल किती महत्त्वाचा आहे X किती लोक यामुळे प्रभावित झाले आहेत X प्रभावाचा कालावधी
डॉ. राईट यांची व्याख्या सोप्या शब्दात सांगायची झाली तर जीनियस म्हणजे ती व्यक्ती, जिचा जास्तीत जास्त लोकांवर जास्तीत जास्त काळासाठी प्रभाव पडलेला आहे.
येल विद्यापीठात अनेक वर्षांपासून 'जीनियस कोर्स' शिकवताना राईट यांच्या लक्षात आलं की अनेक विद्यार्थी पॉप सिंगर लेडी गागाला समकालीन प्रतिभावंतांमध्ये गणत नाहीत किंवा इतिहासात सगळ्यात जास्त ऑलिंपिंक पदक जिंकणारे अॅथलिट जीनियस नाहीयेत.
प्रतिभावंत असणं म्हणजे नक्की काय याबद्दल बीबीसीने डॉ. क्रेग राईट यांच्याशी चर्चा केली. ती इथे देत आहोत.
प्रश्न - रॉयल स्पॅनिश अॅकेडमीच्या शब्दकोशानुसार प्रतिभावंत असण्याची व्याख्या आहे - 'नव्या आणि उल्लेखनीय गोष्टी घडवण्याची विलक्षण क्षमता.' तुमचं याबद्दल काय मत आहे?
उत्तर - मला वाटतं की ही मर्यादित व्याख्या आहे.
ही व्याख्या लिहिणाऱ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की जीनियस असण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची आहे, तर आपल्या बुद्धीचा वापर. यात त्या सर्जनशील व्यक्तीचा विचार स्वतःपुरता मर्यादित ठेवण्याचाही समावेश होतो.
पण स्वतःचे विचार स्वतः पुरते मर्यादित ठेवणं या गोष्टीवरून दुमत असू शकतं. यासाठी मी अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या त्या फोटोची आठवण देऊ इच्छितो ज्यात ते एका बेटावर एकटे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
तिथे असताना त्यांना लक्षात आलं की E = MC². त्याठिकाणी ते सापेक्षता आणि अन्य सिद्धांतांविषयी विचार करू शकले. पण त्यांनी आपले विचार कोणाला सांगितले नसते तर आपल्याला अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या कामाविषयी कळलं असतं का?
अभ्यासकांच्या व्याख्येनुसार आईन्स्टाईन तेव्हाही जीनियस ठरले असते, पण माझ्या व्याख्यानुसार नाही. कारण तेव्हा त्यांच्या विचारांचा, अभ्यासांचा कोणावर काही प्रभाव पडला नसता.
इथे तात्विक चर्चेला वाव आहे. तुमच्या मते प्रतिभावंत लोकांची व्याख्या करण्याचा कोणता पर्याय योग्य आहे?
म्हणजे बघा, मी माझ्या पुस्तकात आयक्यूला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे.
बुद्ध्यांक मोजण्याची पद्धत व्यक्तींची एका विशिष्ट पद्धतीची क्षमता मोजण्यासाठी आहे. ही क्षमता सहसा आनुवंशिक असते.
शतकानुशतकं थोर ठरलेल्या व्यक्तींच्या अभ्यास केला की तुमच्या लक्षात येईल की ते बुद्धीवंत नक्कीच होते, पण त्यांच्या आयक्यू टेस्टमध्ये त्यांना सर्वोत्तम गुण जसं की - 140-150, मिळाले असतीलच असं नाही.
याचा अर्थ तुम्हाला खेळात आपली क्षमता सिद्ध करायची असेल, तर फक्त सरासरीपेक्षा जास्त आयक्यू असण्याची गरज आहे.
पण असं असतानाही इतर अनेक घटक आणि प्रेरणा असतात ज्या कोणाही व्यक्तीला महान बनण्याच्या आणि जग बदलण्याच्या दिशेने घेऊन जातात.
प्रश्न - प्रतिभावंत मुल वाढवण्यासाठी किंवा आपल्या मुलांना प्रतिभावंत बनवण्यासाठी काय करायला हवं?
उत्तर - मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सतत प्रयत्न करत राहाणं आहे. पण कठोर मेहनत करण्यासाठी इतरही गोष्टी गरजेच्या आहेत. फक्त प्रयत्न तुम्हाला महानतेकडे घेऊन जाणार इंजिन नाहीये तर आंतरिक प्रेरणांची बाह्य अभिव्यक्ती आहे. जिद्द ते इंजिन आहे, जे मेहनतीच्या रूपात बाहेर येतं. जिद्द म्हणजे एखाद्या गोष्टीवर प्रेम करण्यापासून ती मिळवण्याचा वेडेपणा डोक्यात भरणं यापैकी काहीही असू शकतं.
त्यामुळे जिद्दीला प्रोत्साहन देणं सगळ्यांत जास्त गरजेचं आहे.
या प्रतिभावंत लोकांच्या बाबतीत मी अजून एक गोष्ट पाहिली आहे. या विद्वानांना वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती होती.
स्वतःला विचारायला हवं की तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात? अशी व्यक्ती जी हजार मैलाचा प्रवास करेल की हजार फुट खाली उतरेल?

फोटो स्रोत, HARPERCOLLINS
प्रतिभावंत लोक वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र पाहातात कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारचे अनुभव असतात. ते आयुष्यातले वेगळे तुकडे एकत्र करून पाहू शकतात जे इतरांना जमत नाही.
त्यामुळे मुलांना वाढवताना त्यांना वेगवेगळे अनुभव मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. जर त्यांना विज्ञान आवडतं तर कांदबऱ्या वाचायला प्रवृत्त करा. त्यांना राजकारणात रस असेल तर त्यांना चित्रकलेची ओळख करून द्या.
ज्या आई-वडिलांना वाटतं की आपल्या मुलांना महान ऑलिंपिंक स्वीमर किंवा फिजिक्समध्ये पुढचं नोबल मिळवणारी शास्त्रज्ञ बनवायचं असेल तर एकच फोकस ठेवून त्यांना त्या पद्धतीने प्रशिक्षण द्यावं लागेल, ते चुकीचा विचार करत आहेत.
जोपर्यंत आपल्याकडे वेगवेगळे अनुभव जमा होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कसं कळणार की आपली आवड, आपलं वेड कशात आहे.
प्रश्न - तुमच्या व्याख्येनुसार समकालील जीनियस (प्रतिभावंत) लोकांची उदाहरण कोणती? आणि यातले कोण तुमच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक आश्चर्यचकित करतात?
उत्तर - अशी अनेक उदाहरणं आहेत पण एलॉन मस्क मुळातच जीनियस आहेत. द बोरिंग कंपनी, हायपरलूप, सोलरसिटी, टेस्ला, स्पेसएक्स अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात ते अजब-गजब गोष्टी करत राहातात.
पण काही अनपेक्षित उदाहरणंही आहेत. समजा मी म्हटलं की कान्ये वेस्ट, लेडी गागा किंवा डॉली पार्टन अशाच काही प्रतिभावंतांची उदाहरणं आहेत तर कोणाला धक्का बसू शकतो किंवा वाटू शकतं की थट्टा करतोय.

फोटो स्रोत, Getty Images
डॉली पार्टन एक फारच रंजक केस आहे कारण त्या अतिशय बुद्धीवान व्यक्ती आहेत मग भले त्यांनी 'मुर्ख गोरी बाई' अशी स्वतःची प्रतिमा बनवलेली असेल.
त्यांनी स्वतःचा उद्योग उभारला, आजही त्या काम करतात. करमणुकीच्या दुनियेत एका महिला उद्योजकाने कसं काम केलं पाहिजे याचं त्या मुर्तीमंत उदाहरण आहेत.
परत त्या गाणे लिहून आपलं मनोरंजन करत असतातच.
त्यामुळे असं म्हणू शकतो की डॉली पार्टन महत्त्वाच्या आहेत, विशेषतः त्या श्वेतवर्णीय गरीब महिलांसाठी ज्या त्यांची गाणी ऐकतात. अर्थात हे पाहावं लागेल की त्यांचा प्रभाव कधीपर्यंत राहातो.
आता मायकल फेल्प्ससारखीही काही उदाहरणं आहेत.
मला म्हणायचंय की फ्रान्समध्ये कोणीतरी म्हटलं असेल की प्राचीन काळात ग्रीसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिंकला पुर्नस्थापित करायला हवं आणि म्हटलं असेल की यातला एक खेळ पोहणं हा असेल.
मग या खेळातले फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्टोक आणि बटरफ्लाय असे 100 आणि 200 मीटर अंतरासाठी होणारे प्रकार निश्चित झाले.
आता मायकल फेल्प्स स्वीमिंग पूलमध्ये उतरतात, इतर स्पर्धकांपेक्षा जलद गतीने पोहतात. पण कोणीतरी त्यांच्यापेक्षा जलद गतीने पोहू शकतं कारण त्यांच्या शरीराचा प्रकार, क्षमता वेगळी असू शकते. आता प्रशिक्षण, उत्तम आहाराने त्यांचं शरीर अधिक वेगवान बनत असेल.
पण जसं त्या स्पॅनिश अॅकडमीच्या शब्दकोशात म्हटलंय की यात काही हुशारी किंवा बुद्धीचा वापर नाही. हे म्हणजे पिंजऱ्यात बंद असलेल्या एका उंदरासारखं झालं. हा उंदीर फक्त जोरजोरात धावतोय.

फोटो स्रोत, Getty Images
मला वाटतं जीनियस असणं पिंजऱ्यातल्या उंदरापेक्षा किंवा पाण्यात पोहणाऱ्या जलतरणपटूपेक्षा जास्त काहीतरी आहे.
प्रश्न - येलमध्ये प्रतिभावंत लोकांचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी त्यांच्यासारखं बनू इच्छित नाहीत. तुमच्यामते असं का होत असावं?
उत्तर - या प्रतिभावंत लोकांच्या बाबतीत एक मोठी समस्या असते की ते आपल्या आसपासच्या लोकांसाठी विध्वंसकारी ठरतात कारण त्यांच्यात एक प्रकारचा वेडेपणा असतो.
त्यांचं लक्ष फक्त आपलं लक्ष्य मिळवण्यावर असतं कारण त्यांना वाटतं ते जग बदलणार आहेत. त्यांना वाटतं की जर काही बदलायचं असेल तर तेच बदलू शकतात.
ते लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या आसपासच्यांवर, जवळच्या लोकांवर कधी कधी तर परक्यांवरही ते खूप दबाव टाकतात. ते लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्षही करतात.
त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं कधीही सुखद असू शकत नाही.
जेफ बेझोस, एलॉन मस्क किंवा बिल गेट्सच्या बाबतीत या गोष्टी तुम्ही ऐकू शकता.
त्यामुळे जे लोक जीनियस कोर्स करतात ते स्वतःला विचारतात, "मल खरंच असं बनायचं आहे का? मला इतरांसाठी जग बदलायचं आहे की इतरांसाठी, स्वतःसाठी एक माणूस म्हणून जगायचं आहे?"
माझ्या पुस्तकाचं छोटसं गुपित आहे की आपल्यातले बहुतांश लोक कोणत्याही प्रकारे जग बदलणारे नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात या लोकांनी जे केलं त्याबद्दल जाणून घेतलं तर आपल्यालाही काही महत्त्वाच्या गोष्टी कळतात. त्यातल्या अनेक गोष्टी आपण अंगीकारू शकतो जसं की इतरांशी कसं वागावं, आपल्या आयुष्यात आणखी सर्जनशीलता कशी आणावी.
आपल्याला कसं जगायचं आहे याचा विचार करण्याची संधी आपल्याकडे आहे. त्यानुसार आपण आपल्या आयुष्याची दिशा ठरवू शकतो. डॉ क्रेग राईट यांच्यामते प्रतिभावंत लोकांची 14 लक्षणं असतात - ती अशी
1) कार्यनिती
2) लवचिकता
3) अस्सलपणा
4) एका लहान मुलासारखी कल्पनाशक्ती
5) कधीही न शमणारी जिज्ञासा
6) जिद्द किंवा कशाचं तरी वेड
7) बांधली न जाणारी सर्जनशीलता
8) बंडखोरी
9) मर्यादांच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची क्षमता
10) प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्षमता
11) अभ्यास
12) सणक
13) ढिलेपणा
14) एकाग्रता
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























