'सेक्सच्या व्यसनातून' अमेरिकेतील अटलांटामधील गोळीबार?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतल्या जॉर्जिया प्रांतातल्या अटलांटा शहरात मंगळवारी रात्री काही मसाज पार्लरमध्ये गोळीबार करून 8 जणांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात एका संशयिताला अटक झाली आहे.
या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये आशियातल्या 8 महिलांचा समावेश आहे. मात्र, हा हल्ला वर्णद्वेषातून करण्यात आला का, हे अजून कळू शकलेलं नाही.
संशयित आरोपीचं नाव रॉबर्ट एरॉन लॉन्ग असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्यावर अनेक खुनांसह गंभीर मारहाणीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
'आपण सेक्स अॅडिक्ट' असल्याचं त्याने सांगितल्याचं चेरोकी काउंटीचे पोलीस अधिकारी फ्रँक रेनॉल्ड्स यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तो या पार्लर्समध्ये याआधीही जात असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
अमेरिकेत एशियन-अमेरिकन लोकांवर हल्ले वाढत असताना ही घटना घडली आहे.
तपास अधिकारी काय म्हणतात?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. जॉर्जियाचा राहणारा 21 वर्षांचा रॉबर्ट लॉन्ग याने हल्ल्याची कबुली दिली असली तरी हा वर्णद्वेषातून करण्यात आलेला हल्ला नाही, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉन्गविरोधात अनेक खुनांसह गंभीर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"त्याच्या म्हणण्यानुसार त्याला काही त्रास आहे. आपण 'सेक्स अॅडिक्ट' असल्याचं तो सांगतो. अशी ठिकाणं त्याला आकर्षित करणारी वाटतात आणि म्हणून त्याला ती ठिकाणं नष्ट करायची आहेत," असं पोलीस प्रवक्ते कॅप्टन जे. बेकर म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉन्गला 9mm पिस्तुलासह अटक करण्यात आली होती आणि अटक करताना त्याने कुठल्याही प्रकारे प्रतिकार केला नाही.
कॅप्टन बेकर पुढे म्हणाले, "कालचा दिवस त्याच्यासाठी खूप वाईट होता आणि त्याने हे कृत्य केलं."
मात्र, एका खुन्याबद्दल सहानुभूतीचे उद्गार काढल्याने पोलिसांवर टीकाही होतेय.
काही मसाज पार्लरमध्ये देहव्यापारही चालतो. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत असा कुठलाही पुरावा सापडला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार हल्ल्याचा उद्देश अजून स्पष्ट नाही. मात्र, हल्ला एकाच व्यक्तीने केला, एवढी ठोस माहिती या प्रकरणात मिळाली आहे.
रॉबर्ट लॉन्गला फ्लोरिडामधून अटक करण्यात आली. तो हल्ल्याच्या उद्देशानेच फ्लोरिडाला गेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Reuters
आरोपीच्या आई-वडिलांनी त्याची ओळख पटवली आहे. सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार "आपल्याला ईश्वर आणि बंदुका आवडत असल्याचं" आरोपीने पोलिसांना सांगितलं.
गोळीबाराविषयी...
मंगळवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला चेरोकी काउंटीच्या 'यंग्स एशियन' या मसाज पार्लरमध्ये पहिला हल्ला झाल्याची माहिती मिळाली.
पोलीस प्रवक्ते कॅप्टन बेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि तिघांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जवळपास अर्ध्या तासानंतर अटलांटा शहराच्या वायव्य भागाकडे असणाऱ्या 'गोल्ड स्पा' मसाज पार्लरमध्ये चोरी झाल्याची सूचना मिळाली.
पोलीस अधिकारी तिथे पोहोचले त्यावेळी तिथे तीन महिलांचे मृतदेह पडले होते.
त्याच रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला असणाऱ्या मसाज पार्लरमध्येही एका महिलेचा मृतदेह होता.
एशियन लोकांमध्ये रोष
वॉशिंग्टनमधल्या एशियन लोकांमध्ये निराशा आणि रोष असल्याचं बीबीसीचे वॉशिंग्टन येथील प्रतिनिधी जॉओईन फेंग यांनी सांगितलं. चायनाटाऊन भागात जवळपास 100 लोकांनी कँडल मार्चही काढला.
हा हल्ला एशियन लोकांविरोधात होता, असं अजूनतरी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं नाही. मात्र, हा एशियन लोकांना लक्ष्य करून केलेला आणखी एक हल्ला आहे, असं तिथे राहणाऱ्यांची भावना आहे.
"एशियन महिला असणं, अमेरिकेत कुठेच सुरक्षित नाही", अशी प्रतिक्रिया एका एशियन महिलेने दिली.
माझ्या कुटुंबाने मला गप्प रहायला सांगितलं असलं तरी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
कँडल मार्चमध्ये भाग घेणाऱ्या एका एशियन व्यक्तीने "आम्ही वर्णद्वेषाचा लढा वर्णद्वेषाने न लढता एकत्रितपणे त्याविरोधात लढू" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावरही अनेकांनी हा हल्ला वर्णद्वेषातून करण्यात आल्याचं सांगत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, हा वर्णद्वेषी हल्ला आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
ही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























