सौदी अरेबिया : स्त्री हक्क कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना पाच वर्षांची शिक्षा

फोटो स्रोत, AMNESTY.ORG
सौदी अरेबियातील स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना पाच वर्ष आठ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
महिलांच्या अधिकारांबद्दल आवाज उठवणाऱ्या 31 वर्षीय लुजैन अल हथलौल गेल्या अडीच वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांना जेलमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आलं आहे.
लुजैन अल हथलौल यांनी सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवू देण्याचा अधिकार देण्याची मागणी केली होती.
2018 मध्ये लुजैन अल हथलौल आणि त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्यांना सौदी अरेबियाच्या शत्रूंसोबत संपर्कात असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं होतं.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी त्यांच्या सुटकेची वारंवार मागणी केली आहे.
सोमवारी लुजैन अल हथलौल यांच्यावर दाखल खटल्याची सुनावणी झाली. दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयाने हथलौल यांना राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्याचसोबत परदेशी अजेंडा चालवण्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
कोर्टाने लुजैन अल हथलौल यांना दोषी ठरवत पाच वर्ष आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. हथलौल गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये बंद आहेत. त्यामुळे हा कालावधी त्यांच्या शिक्षेतून कमी केला जाऊ शकतो.
दरम्यान, लुजैन अल हथलौल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबीयांनी लुजैन अल हथलौल यांना जेलमध्ये त्रास दिल्याचा आरोप केला आहे. हा आरोप कोर्टाने मात्र फेटाळून लावला.

फोटो स्रोत, Reuters
लुजैन अल हथलौल यांना 2018 मध्ये महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळण्याच्या काही आठवडे आधी ताब्यात घेण्यात आलं होतं.
सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हथलौल यांना ताब्यात घेण्याचा या प्रकरणाची काही संबंध नाही.
लुजैन अल हथलौल यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ताब्यात घेतल्यानंतर तीन महिने त्यांना कोणाशी चर्चा करू दिली नाही. त्यांना शॉक देण्यात आला. चाबकाचे फटके देण्यात आले. त्यांच लैगिक शोषण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, छळ करण्यात आला नाही असं सांगितल्यास त्यांना जेलमधून मुक्त करण्यात येईल असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला होता.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी लुजैन अल हथलौल यांच्यावर चालवण्यात आलेला खटला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नसल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात अॅमनेस्टी इंटरनॅशनलने स्पेशलाइज्ड क्रिमिनल कोर्टात त्यांचं प्रकरण पाठवलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचल्याच्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे. 2018 मध्ये सौदी अरेबियाने कायद्यात मोठा बदल करत, महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली होती.
कार्यकर्त्यांवर सतत होणारे हल्ले, पत्रकार जमाल खाशोगी यांची झालेली हत्या या प्रकरणी सौदी अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे त्यांची अनेकवेळा टीका करण्यात आली.
कोण आहेत लुजैन अल हथलौल?
सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना डिसेंबर 2014 मध्ये गाडी चालवण्याच्या आरोपात सौदी पोलिसांनी अटक केली होती.
एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लुजैन अल हथलौल यांना गाडी चालवत देशात प्रवेश करताना अटक करण्यात आली होती.
पत्रकार मायसा अल अमौदी यांनी याचा विरोध केला होता. लुजैन अल हथलौल यांच्या समर्थनार्थ गाडी चालवत त्या सीमेवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती.
लुजैन अल हथलौल आणि अल अमौदी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने या दोघींवर रियादच्या दहशतवादविरोधी कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला होता.
यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था, अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि इतर देशातील मानवाधिकार संस्थानी सौदी अरेबियावर टीका केली होती.
अखेर 73 दिवसांनंतर लुजैन अल हतलौल यांची मुक्तता करण्यात आली. मात्र, तोपर्यंत महिलांचा अधिकार एक मोहीम म्हणून सुरू झाली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू
























