कोरोना लस : रशियाने मॉस्कोमधून केली लसीकरण मोहिमेला सुरुवात

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनावरील लस लोकांना द्यायला रशियाची राजधानी मॉस्को शहरातून सुरुवात करण्यात आलेली आहे. या रोगाचा धोका सर्वात जास्त असणाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यासाठी रशियामध्येच विकसित करण्यात आलेली स्पुटनिक-5 लस वापरण्यात येतेय.
ही लस 95% पर्यंत संरक्षण देते आणि याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नसल्याचं ही लस विकसित करणाऱ्या संशोधकांनी म्हटलं होतं. पण तरीही या लशीच्या अजूनही मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत.
शनिवार-रविवारच्या दोन दिवसांमध्ये या लशीच्या दोन डोसपैकी पहिला डोस घेण्यासाठी हजारो लोकांनी नावं नोंदवली आहेत. पण रशिया या लशीचं नेमकं किती उत्पादन करू शकेल, हे अद्याप स्पष्ट नाही.
या लशीचे निर्माते 2020च्या अखेरपर्यंत लशीचे फक्त 20 लाख डोस तयार करू शकतील अशी शक्यता आहे.

फोटो स्रोत, Reuters
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयनिन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ही लसीकरण मोहीम जाहीर केली.
मॉस्को शहरातल्या शाळा आणि आरोग्य सेवांमध्ये काम करणाऱ्या आणि समाजकार्य करणाऱ्या 1.3 कोटी लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
जसजशी लशीच्या डोसेसची उपलब्धता वाढेल तशी ही लस देण्यात येणाऱ्यांची यादी वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
मॉस्कोमधील तीन पेशांमध्ये काम करणाऱ्या 18 ते 60 वयोगटातल्या लोकांना ऑनलाईन नोंदणी करून शहरातल्या 70 क्लिनिक्समध्ये ही लस घेता येणार आहे.
मात्र ज्यांनी गेल्या 30 दिवसांत एखादं इंजेक्शन घेतलं असेल, वा ज्यांना श्वसनाचा विकार किंवा इतर व्याधी असणाऱ्या व्यक्तींना आणि गर्भवती, स्तनपान देणाऱ्या महिलांना ही लस दिली जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला या लशीचे दोन डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जातील.
पण या लशीमध्ये लोकांच्या मनात संमिश्र भावना आहे.
"मला लस घ्यायला आवडेल. कारण त्यामुळे ही साथ आटोक्यात येत संसर्गाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे," असं मॉस्कोतले रहिवासी आयगॉर क्रिवोबोकोव्ह यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं.

पण त्याचवेळी लस घेण्याचा आपला इरादा नसल्याचं दुसरे रहिवासी सर्गेई ग्रिशिन सांगतात.
"या प्रक्रियेला खूप वेळ लागेल. आतापर्यंत कमी प्रमाणत लस उत्पादन झालेलं आहे. बाकीच्यांना लस घेऊ देत, जर ते जगले, तर मीही जगेन," ते सांगतात.
रशियामध्ये आतापर्यंत कोव्हिडचे 24 लाख 31 हजार 731 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर यामुळे 42 हजार 684 बळी गेले आहेत. शनिवारी रशियामध्ये 28,782 नवीन रुग्णांची नोंद झाली. मॉस्को शहरामध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
त्यामुळे मॉस्कोतले बार आणि क्लब्सच्या वेळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण देण्यात येतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)























