Ind vs Aus : काँकशन सबस्टिट्यूट म्हणजे नेमकं काय, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना जिंकला

रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भारत, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजाऐवजी युझवेंद्र चहलला संधी मिळाली.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या ट्वेन्टी-20 दरम्यान रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने युझवेंद्र चहल खेळायला उतरला आणि वादाला तोंड फुटलं.

काय आहे नेमकावाद?

भारताच्या डावादरम्यान, शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा बॉल रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर आदळला. मात्र त्यावेळी भारताचे फिजिओ मैदानावर आले नाहीत.

त्यांनी जडेजाची काँकशन टेस्ट घेतली नाही. जडेजाने ओव्हरचे उर्वरित बॉल खेळले. दोन इनिंग्जच्या दरम्यान जडेजाला त्रास होत असल्याचं जाणवल्यानंतर भारतीय संघाने मॅचरेफरी डेव्हिड बून यांना कल्पना दिली. जडेजाऐवजी लेगस्पिनर युझवेंद्र चहल मैदानात उतरला.

रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भारत, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, ICC

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर बॉल आदळला होता.

नियमानुसार, लाईक अ लाईक रिप्लेसमेंट हे प्रमाण मानलं तर जडेजा बॅटिंग करताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्याऐवजी एका बॅट्समनला समाविष्ट करायला हवं होतं. मात्र मॅचरेफरींनी जडेजाच्या ऐवजी चहलला खेळायला परवानगी दिली.

यामुळे भारतीय संघाला जडेजा दुखापतग्रस्त होऊनही चहलच्या रुपात बॉलर मिळाला. भारतीय संघाचं नुकसान झालं नाही. मात्र या मॅचरेफरी बून यांच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर नाराज होते. मॅचदरम्यान बून आणि लँगर यांच्यात प्रदीर्घ संभाषण सुरू असलेलं पाहायला मिळालं.

नियमात पुरेशी स्पष्टता नसल्याचा फायदा भारतीय संघाला मिळाला. जडेजाच्या जागी खेळायची संधी मिळालेल्या चहलने 3 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.

गेल्या वर्षी आयसीसीने हा नियम केल्यानंतर अशेस मालिकेत स्टीव्हन स्मिथ दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला स्थिर उभं राहण्यात अडचण जाणवत होती. चक्करेसारखा त्रासही होत होता. म्हणून त्याच्या जागी मार्नस लबूशेनला संघात समाविष्ट करण्यात आलं.

गेल्या वर्षी भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान झालेल्या पिंक बॉल टेस्टदरम्यान बांगलादेशचे दोन बॅट्समनच्या जागी काँकशन सबस्टिट्यूट खेळवण्यात आले होते.

नयीम हसन आणि लिट्टन दास यांच्या हेल्मेटवर बॉल आदळला होता. त्यांच्याऐवजी ताजिऊल इस्लाम आणि मेहदी हसन या काँकशन सबस्टिटयूटला संधी देण्यात आली. मात्र लाईक-अ-लाईक रिप्लेसमेंट नुसार मेहदी हसन बॅट्समन म्हणून खेळला. त्याला बॉलिंग करता आली नाही.

काँकशन सबस्टिट्यूट नियम काय आहे?

बॉल शरीरावर आदळून खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास, त्या संघाचा एक खेळाडू कमी होतो. त्याच्याऐवजी बदली खेळाडू मैदानावर येत असे मात्र त्याला बॅटिंग किंवा बॉलिंगचा अधिकार मिळत नसे. गेल्या काही वर्षात बॉल आदळून खेळाडू दुखापतग्रस्त होऊन संघांना फटका बसत असल्याचं लक्षात आल्यानंतर आयसीसीने काँकशन सबस्टिट्यूट नावाचा नियम तयार केला.

मॅचदरम्यान एखाद्या खेळाडूच्या शरीराच्या भागावर चेंडू आदळला आणि दुखापतीमुळे त्याला उभं राहण्यात अडचण असेल, चक्कर येत असेल, अंधारी येत असेल तर त्याच्याऐवजी त्या संघाला बदली खेळाडू मिळेल. त्याला काँकशन सबस्टिट्यूट म्हटलं जाईल.

रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भारत, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, BCCI

फोटो कॅप्शन, युझवेंद्र चहलला जडेजाच्या जागी संधी मिळाली.

दुखापत झाल्यानंतर, टीम फिजिओ खेळाडूची मैदानावर काँकशन टेस्ट घेईल. यामध्ये त्याला उभं राहण्यात, बघण्यात अडचण असेल तर त्याची कल्पना संघव्यवस्थापनाला देण्यात येईल. दुखापत गंभीर असेल तर खेळाडूला मैदानाबाहेर नेण्यात येईल. ड्रेसिंगरुममध्ये आवश्यक उपचार करण्यात येतील. आवश्यकता असेल तर प्रगत उपचारांसाठी खेळाडूला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल.

आयसीसीच्या नियमानुसार, बदली खेळाडू लाईक अ लाईक रिप्लेसमेंट असावा. म्हणजे दुखापतग्रस्त खेळाडू बॅट्समन असेल तर बदली खेळाडूही बॅट्समन असावा. दुखापतग्रस्त खेळाडू बॉलर असेल तर बदली खेळाडू बॉलर यावा.

बॅट्समनऐवजी बॉलर किंवा ऑलराऊंडर समाविष्ट झाला किंवा बॉलरऐवजी बॅट्समन किंवा ऑलराऊंडर अंतिम अकरात समाविष्ट झाला तर एका संघाला फायदा मिळू शकतो म्हणूनच लाईक-अ-लाईक रिप्लेसमेंट करण्यावर भर देण्यात आला आहे.

ज्या संघाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, तो संघ मॅचरेफरींना याची कल्पना देईल. मॅचरेफरी खेळाडूच्या दुखापतीचा आढावा घेतील, गरज असेल तर फिजिओंशी चर्चा करतील आणि त्यानंतर काँकशन सबस्टिट्यूटला परवानगी देण्यात येईल.

मॅचचं काय झालं?

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. लोकेश राहुलने आयपीएल फॉर्म कायम राखताना 40 बॉलमध्ये 5चौकार आणि एका षटकारासह 51रन्सची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर टीम इंडियाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रवींद्र जडेजाने 23 बॉलमध्ये 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 44 रन्सची खेळी केली. टीम इंडियाने 161 रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे मॉइझेस हेन्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पदार्पणवीर टी. नटराजन आणि काँकशन सबस्टिट्यूट युझवेंद्र चहलच्या प्रत्येकी तीन विकेट्सच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दीडशे रन्समध्येच रोखलं.

आरोन फिंचने 35 तर डी आर्की शॉर्टने 34 रन्सची खेळी केली. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)