फ्रान्समध्ये पुन्हा एकदा हल्ला, गोळीबारात पाद्री गंभीर जखमी

फोटो स्रोत, PHILIPPE DESMAZES/AFP VIA GETTY IMAGES
फ्रान्सच्या लियो शहरात एक ग्रीक आर्थोडॉक्स पाद्री गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून गायब झाला होता. पण, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून एका व्यक्तीला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. अद्याप तरी या हल्ल्याचा हेतू स्पष्ट नाहीये. पण प्रशासनानं हत्येचा प्रयत्न यादृष्टीनं तपास सुरू केला आहे.
या घटनेपूर्वी दक्षिण फ्रान्समधल्या नीस शहरात एका चाकू हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हा 'इस्लामिक दहशतवादी हल्ला' असं संबोधलं होतं आणि प्रार्थनास्थळांबाहेर अधिक सुरक्षा तैनात करण्यात आली.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार 4 वाजता पाद्री जेव्हा चर्च बंद करत होते, तेव्हा ही गोळीबाराची घटना घडली.
हल्लेखोराजवळ एक शॉटगन होती आणि तो नंतर फरार झाला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
फ्रान्सच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे की, सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झालं आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लियोचे सरकारी प्रवक्ते निरोलस जॅक यांनी शनिवारी (31 ऑक्टोबर) एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं आहे, "सुरुवातीच्या काही साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे."
संशयित व्यक्तीकडे अटक करतेवेळी बंदूक होती. या संशयिताची सविस्तर माहिती मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलं
लियोचे महापौर ग्रिगोगी दूसे यांनी पत्रकारांना सांगितलं आहे की, सध्या तरी हल्ल्याचा हेतू काय होता, याविषयी स्पष्ट झालेलं नाही.
निकोलस काकावेलायकीस असं हल्ल्यात जखमी झालेल्या पाद्रीचं नाव असून सध्या त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
त्यांना पोटात दोन गोळ्या लागल्या असून त्यांची स्थिती गंभीर आहे.
"सरकार प्रत्येकाला पूर्ण सुरक्षा आणि स्वातंत्र्य देण्यासाठी कटिबद्ध आहे," असं फ्रान्सचे पंतप्रधान ज्या कास्टेक्स यांनी म्हटलं आहे..
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























