कोरोनाः स्पेनमध्ये आणीबाणी स्थिती घोषित, रात्रीचा कर्फ्यू लागू

स्पेन

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

स्पेननं कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणीची परिस्थिती घोषित केली आहे, तसंच रात्री कर्फ्यूही लागू केला आहे.

रविवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल अशी पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी घोषणा केली आहे.

आणीबाणीत वापरायच्या अधिकारांनुसार स्थानिक प्रशासन प्रवासबंदीसुद्धा लागू करू शकते असं सांचेझ यांनी म्हटलंय.

सुरुवातीच्या काळात 15 दिवस आणि नंतर सहा महिन्यांपर्यंत नवे नियम लागू करण्यासाठी आपण संसदेला विनंती करू असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्पेनला मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे स्पेनमध्ये अत्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

युरोपमध्ये सध्या आलेल्या दुसऱ्या लाटेप्रमाणे स्पेनमध्येही त्याचे परिणाम दिसत आहेत.

इटलीमध्येही रविवारी (25 ऑक्टोबर) नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम होत असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. तर फ्रान्समध्ये रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं. 24 तासांमध्ये 52,010 रुग्ण आढळले तर शनिवारी 45,000 रुग्ण आढळले होते.

स्पेनने कोणते निर्बंध लागू केले आहेत?

रात्रीच्या कर्फ्यूच्या नियमात तासाभराचा बदल करण्याची मुभा स्थानिक प्रदेशांना असेल असं सांचेझ यांनी सांगितलं.

प्रवासावरील निर्बंध ठरवण्याचे अधिकार प्रादेशिक नेत्यांना असतील आणि ते काम आणि वैद्यकीय गरजांवर ठरवता येईल.

आता सार्वजनिक किंवा घरगुती जागी सहापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

रविवारी टिव्हीवरून माहिती देताना आपण अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आहोत. असं सांचेझ यांनी सांगितलं. गेल्या पन्नास वर्षातील सर्वात ही सर्वात गंभीर परिस्थिती आहे असंही ते म्हणाले.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

स्पेनमधल्या 17 प्रदेशांपैकी अर्ध्याहून अधिक प्रांतांनी कडक निर्बंध लागू करण्याची मागणी केली होती. आता लागू केलेले निर्बंध कॅनरी बेट वगळता सर्व प्रदेशांवर लागू होतील.

याआधी एप्रिल महिन्यात अशी आणीबाणी लागू करण्यात आली होती,

स्पेनमध्ये आतापर्यंत 10 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग रोखण्यासाठी इटलीत कोणते प्रयत्न होत आहेत?

  • आज 26 नोव्हेंबरपासून इटलीत सिनेमागृहे, स्विमिंग पूल, जिम बंद होतील.
  • बार, रेस्टॉरंट आणि कॅफे संध्याकाळी 6 पर्यंत असतील. पण दुकाने व इतर व्यवसाय सुरू राहातील.
  • या निर्बंधांना प्रादेशिक नेत्यांची मंजुरी मिळावी यासाठी पंतप्रधान ज्यूसेप कोंटे प्रयत्न करत आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना इटलीचे पंतप्रधान म्हणाले, "आणखी काही महिने हा त्रास सहन करावा लागणार असं दिसतं. पण आता या निर्बंधांचा थोडा त्रास सहन केला तर डिसेंबरपर्यंत त्यातून मोकळं होण्याइतपत स्थिती तयार होईल."

पंतप्रधान म्हणाले कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत आपण नाही. कारण तेव्हा मोठं आर्थिक नुकसान झालं होतं.

नव्या निर्बंधांनुसार बहुतांश शाळांमध्ये वर्ग भरवण्याऐवजी ऑनलाईन शिकवलं जाईल.

रविवारी (25 ऑक्टोबर) इटलीमध्ये एका दिवसात 21,200 नवे रुग्ण आढळले, तर 128 लोकांचा मृत्यू झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)