कोरोना : 'या' पाच कारणांमुळे कोरोना विषाणू बनला आहे सर्वाधिक घातक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोना विषाणूनं जगभरात हातपाय पसरले आहेत.
जगात यापूर्वीही आपल्यासमोर विषाणू संसर्गाचा धोका होता. आधीही असे साथीचे रोग आले होते. मात्र प्रत्येक संसर्गाचा किंवा साथीचा सामना करताना जग असं ठप्प झालं नव्हतं.
मग या कोरोना विषाणुमध्येच असं काय आहे? त्याच्या जैवशास्त्रीय रचनेत अशी काय रहस्यं दडली आहेत की, तो आपल्या शरीरासाठी इतका मोठा धोका बनला आहे?
चकवा देणारा व्हायरस
संसर्गाच्या सुरूवातीच्या टप्प्यातच कोरोना व्हायरस तुमच्या शरीराला धोका देण्यात यशस्वी ठरतो.
हा विषाणू आपली फुफ्फुसं आणि श्वसन यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर असतो, मात्र आपल्या प्रतिकारशक्तीला वाटत असतं की, सगळं काही ठीक आहे.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-सीरम इन्स्टिट्यूटला लशीची चाचणी पुन्हा सुरू करायला परवानगी
- वाचा- कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत?

युनिर्व्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमधील प्रोफेसर पॉल लेहनर सांगतात, "हा कमालीचा व्हायरस आहे. तो तुमच्या नाकात विषाणुंची फॅक्ट्री उघडतो आणि तुम्हाला मात्र आपल्याला काही झालंय, याचा अंदाजही येत नाही."
आपल्या शरीरातील कोशिका इंटरफर्नो नावाचं एक रसायन तयार करतात. जेव्हा या रसायनावर एखाद्या व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा आपल्या शरीराला आणि प्रतिकारशक्तीला व्हायरसच्या अस्तित्वाचा इशारा मिळतो.
पण कोरोना व्हायरसमध्ये आपल्या प्रतिकार यंत्रणेला इशारा मिळू न देण्याची एक चमत्कारिक क्षमता आहे.
प्रोफेसर लेहनर सांगतात, "हा व्हायरस हे काम इतक्या सफाईनं करतो की आजारी आहोत याचा आपल्याला पत्ताही लागत नाही."
ते सांगतात की, जेव्हा तुम्ही संसर्ग झालेल्या कोशिका लॅबमध्ये पाहता तेव्हा कळतही नाही की, या संसर्गित आहेत. मात्र त्याची चाचणी झाल्यानंतर लक्षात येतं की यात मोठ्या प्रमाणावर विषाणू आहेत.
जेव्हा आपल्या शरीरात असलेला व्हायरस 'लोड' उच्चांकी पातळीवर पोहोचतो तेव्हा आपल्यात आजारपणाची लक्षणं दिसायला लागतात.
पण दरम्यान विषाणू शरीरातच असतात आणि एकमेकांच्या संपर्कात येऊन त्याचा फैलाव होत राहतो.

फोटो स्रोत, Getty Images
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येण्यासाठी जवळपास एका आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. प्रोफेसर लेहनर सांगतात, "स्वतःचा विकास करून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे तुम्हाला आजारपणाची लक्षणं जाणवत नाहीत, तुम्ही अगदी धडधाकट असल्याप्रमाणे बाहेर फिरता आणि विषाणूंना फेलावण्याची संधी मिळत राहते."
2002 साली ज्या सार्स-कोरोना व्हायरसची साथ आली होती त्यामध्ये आणि आताच्या कोरोना व्हायरसमध्येच हेच महत्त्वाचं अंतर आहे.
सार्स-कोरोना व्हायरसमध्ये लोक आजारी पडल्यानंतर म्हणजे लक्षणं दिसायला लागल्यानंतर संसर्गाचा धोका सर्वाधिक असायचा. त्यामुळे रुग्णांना तातडीनं आयसोलेट करणं सोपं जात होतं.
आपल्या शरीरासाठी अनोळखी विषाणू
गेल्यावेळेस पसरलेली साथ आठवतीये? 2009 साली एच1एन1 म्हणजेच स्वाइन फ्लू विषाणुबद्दल लोकांच्या मनात भीती बसली होती.
अर्थात जितकी चिंता व्यक्त केली जात होती, तितका हा विषाणू प्राणघातक नव्हता.
वृद्धांमध्ये या विषाणुशी लढण्यासाठीची क्षमता काही प्रमाणात आधीपासूनच होती. कारण यापूर्वीही अशा विषाणूंचा संसर्ग झाला होता. चार प्रकारचे कोरोना व्हायरस असतात, ज्यामध्ये सर्दी-पडशासारखीच सामान्य लक्षणं दिसतात.
युनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टरमधील प्रोफेसर ट्रेसी हसल सांगतात, "हा नवीन प्रकारचा विषाणू आहे. त्यामुळेच याच्याविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती लोकांमध्ये नाहीये. याचा संसर्ग प्रतिकार शक्तीसाठी चांगलाच धक्का देणारा ठरतो."

फोटो स्रोत, Getty Images
याची तुलना युरोपमध्ये पसरलेल्या देवीच्या साथीशी करता येईल. ही साथ आली तेव्हाही लोकांमध्ये याविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती नव्हती. त्याचे परिणाम अतिशय घातक होते.
कोणत्याही नवीन व्हायरसविरोधात लढण्यासाठी नव्यानं प्रतिकारशक्ती विकसित करणं वृद्धांसाठी अवघड जातं, त्यांच्या शरीराची ही यंत्रणा मुळातच कमकुवत झालेली असते.
एखाद्या नवीन व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपल्या शरीराच्या प्रतिकारक्षमतेला अनेक बदलातून जावं लागतं. जसं एखादी अचानक समोर आलेली समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी वेगळा विचार करतो तसंच असतं हे. यातील काही बदल हे यशस्वी ठरतात, तर काही अयशस्वी.
पण वयासोबत प्रतिकारक्षमतेचा महत्त्वपूर्ण भाग मानल्या टी-सेल्स शरीरात कमी होत जातात आणि त्यामुळेच विषाणु संसर्ग तुलनेनं चटकन होतो.
पूर्ण शरीरात पसरतो कोरोना
कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर परिणाम करत सगळ्या शरीरात पसरतो.
किंग्ज कॉलेज लंडनमधील प्राध्यापक मारो गाका सांगतात की, कोव्हिडचे अनेक पैलू खूप अनोखे आहेत.
हा आजार अन्य व्हायरल आजारांहून वेगळा असल्याचं सांगताना ते म्हणात, "हा व्हायरस फुफ्फुसांमधील कोशिंकावर हल्ला करून थांबत नाही, तर त्यांना खराबही करतो. या खराब झालेल्या कोशिका आजूबाजूच्या निरोगी कोशिंकासोबत जोडल्या जातात आणि अशातऱ्हेनं हा आजार शरीरात पसरत जातो.
प्रोफेसर गाका सांगतात की, फ्लूनंतर तुमची फुफ्फुसं पूर्णपणे बरी होतात, परंतु कोव्हिडमध्ये असं होतं नाही. हा एक विचित्र संसर्ग आहे.
यामध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्याही तयार होतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांना रुग्णांची नस सापडायला अडचण होते.

फोटो स्रोत, Getty Images
किंग्ज कॉलेजमधील प्राध्यापक बेव्हरली हंट सांगतात की, कोव्हिडच्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक दोनशे, तीनशे, चारशे पट अधिक प्रमाणात आढळले.
त्यांनी इनसाइड हेल्थशी बोलताना म्हटलं की, माझ्या पूर्ण करिअरमध्ये मी रक्त एवढं दाट झालेले रुग्ण पाहिलेले नव्हते.
कोरोनाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होण्याचं कारण म्हणजे शरीरातील एसीई2 रिस्पेटर. याच्या आधारे हा व्हायरस कोशिकांना संक्रमित करतो.
एसीई2 रिस्पेटर एक प्रकारचं प्रोटीन आहे, जे रक्त कोशिका, फुफ्फुसं, लिव्हर आणि किडनीसह संपूर्ण शरीरात आढळून येतं. त्यामुळेच कोरोना व्हायरस शरीराच्या प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
जर तुमचं वजन जास्त असेल तर कोव्हिड-19 चा धोका तुम्हाला अधिक असू शकतो.
केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन ओ रेहली सांगतात, "कोरोना आणि लठ्ठपणाचा संबंध अधिक दिसून आलाय. इतर विषाणू संसर्गामध्ये तसं दिसत नाही."
कोरोना व्हायरस आणि त्याच्या शरीरावरील परिणामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या तसंच माहित नसलेल्या गोष्टी भविष्यात समोर येऊ शकतात. जसजशा या गोष्टी माहीत होतील, तसंतसे आपण या आजाराशी लढायला तयार होत जाऊ.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























