अझरबैजान-आर्मेनियामधल्या संघर्षाचं नेमकं कारण काय आहे?

अझरबैजान आणि अर्मेनिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात वाद सुरू आहे.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

युरोपात सध्या एक युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध कोरोना व्हायरसविरोधातलं नाहीये. हे युद्ध खऱ्याखुऱ्या बंदुका आणि रणगाड्यांनी लढलं जातंय.

अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांमध्ये हे युद्ध सुरू आहे. आपण क्वचितच ज्यांची नावं ऐकतो अशा देशांमधल्या युद्धाबद्दल कशाला बोलायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कदाचित. पण हे युद्ध आजूबाजूच्या देशांमध्ये पसरतंय आणि तुर्कस्तान, अमेरिका, रशिया, फ्रान्स यांसारखे मोठे देशसुद्धा यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहभागी झाले आहेत.

त्यामुळेच तीन दशकांपेक्षा जास्त मोठा इतिहास असलेल्या या संघर्षाची गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

हा संघर्ष दोन देशांमध्ये नागोर्नो काराबाख नावाच्या एका प्रांतावरून सुरू झालेला आहे. सध्याच्या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय आणि हजारो लोक जखमी आहेत. या सगळ्याचा आजूबाजूच्या देशांवरही परिणाम होतोय. आपण एकदा या प्रदेशाचा भूगोल समजून घेऊ आणि मग पुढच्या गोष्टींकडे येऊ या.

अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन आग्नेय युरोपातले देश आहेत. एकेकाळी हे दोन्ही देश सोव्हिएत महासंघाचा भाग होते. 1990 मध्ये USSR ची शकलं झाली तेव्हा हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. या दोन्ही देशांच्या सीमा रशिया, इराण, तुर्कस्तान आणि जॉर्जिया या देशांना लागून आहेत.

आर्मेनिया हा प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीयांचा देश आहे. ज्या प्रांतावरून वाद आहे त्या वादग्रस्त नागोर्नो काराबाखमध्ये बहुसंख्य आर्मेनियन ख्रिश्चन लोक राहतात आणि हा प्रांत ज्या देशाच्या हद्दीत येतो त्या अझरबैजानमध्ये प्रामुख्याने तुर्की वंशाचे मुस्लीम लोक बहुसंख्य आहेत.

अझरबैजान आणि अर्मेनिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अझरबैजान-अर्मेनियात संघर्ष सुरू आहे.

USSR मध्ये असताना नागोर्नो काराबाख अझरबैजानकडे दिला गेला. पण जेव्हा USSR च्या विघटनाची प्रक्रिया सुरू होत होती तेव्हा नागोर्नो काराबाखच्या प्रादेशिक संसदेने आर्मेनियात विलीन होण्याच्या बाजूने बहुमत दिलं. अझरबैजानने ही विभक्ततावादी चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला.

सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचं रुपांतर युद्धात झालं. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 10 लाख लोक विस्थापित झाले. अखेर 1994 मध्ये रशियाने या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणला पण तोपर्यंत आर्मेनियन सैन्याने या प्रांतावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. या शस्त्रसंधीनंतर नागोर्नो काराबाख लाईन ऑफ कॉन्टॅक्ट स्थापन केली गेली. या रेषेने दोन्ही देशांच्या सैन्याला एकमेकांपासून वेगळं केलं.

या 27 सप्टेंबरला दोन्ही देशांमध्ये संघर्षाला नव्याने सुरुवात झाली. अझरबैजानी सैन्याने आर्मेनियाच्या सैन्याकडून काराबाख प्रांतातला काही प्रदेश जिंकून घेण्यासाठी चढाई केल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला असा अंदाज आहे. यापूर्वीही लहान-मोठे संघर्ष झाले होते पण यावेळी थेट तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रं आणि ड्रोन्सचा वापर झाला. 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले ज्यात सामान्य लोक आणि सैनिकांचाही समावेश होता.

या युद्धाचे जागतिक परिणाम काय?

हा संघर्ष आजूबाजूच्या इतर देशांवरही परिणाम करतोय आणि म्हणून त्याचे परिणाम जास्त व्यापक असू शकतात. या दोन फौजांची लढाई सुरू असताना काही रॉकेट्स इराणच्या काही खेड्यांमध्ये जाऊन पडली आणि यावरून इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले.

"इराणच्या जमिनीवर रॉकेट्स येऊन आदळणं आम्ही सहन करणार नाही. या दोन देशांमधला संघर्ष प्रादेशिक युद्धात रुपांतरित होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी" असाही इशारा त्यांनी दिलाय.

अझरबैजान आणि अर्मेनिया

फोटो स्रोत, AFP

तुर्कस्थानने आजवर नेहमीच उघडपणे अझरबैजानची बाजू घेतलीय. आता राष्ट्राध्यक्ष अर्दोगान यांनी अझरबैजानला लष्करी मदत केल्याचाही अंदाज आहे. तुर्कस्थानकडे असलेलं अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान या लढाईत वापरलं जातंय अशी दाट शक्यता आहे. अर्मेनियाचं एक विमान तुर्कस्थानने पाडल्याचा आरोपही झाला पण तुर्कस्थानने तो फेटाळून लावलाय. इथल्या लढाईसाठी तुर्कस्थान सीरियामधल्या आत्मघातकी हल्लेखोरांची फौज उभी करत असल्याचाही आरोप झालाय.

आता रशियाकडे येऊ या. रशियाने दोन्ही देशांना युद्धबंदीचं आवाहन केलंय. रशियाचा अर्मेनियामध्ये लष्करी तळ आहे, पण त्यांच्या विद्यमान नेतृत्वाबरोबर त्यांचे फारसे घनिष्ठ संबंध नाहीयत.

अझरबैजानशी रशिया चांगले संबंध राखून आहेत. महत्त्वाचं म्हणजे रशिया या दोन्ही देशांना शस्त्रास्त्रं पुरवतो. Organization for Security and Co-operation in Europe या संघटनेचा 'मिन्स्क ग्रुप' हा गट नागोर्नो-कोराबाख वाद सोडवण्याचा प्रयत्न गेली तीन दशकं करतेय. याचं अध्यक्षपद रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेकडे संयुक्तपणे आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची 29 सप्टेंबरला बैठक झाली. यात OSCE च्या Minsk Group ची हा वाद मिटवण्यात प्राथमिक भूमिका असेल यावर सहमती झाली. पण सध्या अमेरिकेतल्या निवडणुका, जगभरातलं कोरोनाचं आरोग्य संकट आणि शस्त्रसंधी झाल्यानंतर दुर्लक्ष होण्याचा प्रघात त्यामुळे या संघर्षावर दीर्घकाळ टिकणारा तोडगा काढता येईल का याबद्दल शंकाच आहे. अख्खं जग कोरोनाच्या अदृश्य शत्रूशी लढत असताना या लहानशा प्रदेशातले लोक प्रत्यक्ष शस्त्रास्च्या लढाईचे साक्षीदार होतायत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)