You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: शारजात दोनशेची फॅक्टरी; मुंबई विजयी
छोट्या आकाराच्या शारजाच्या मैदानावर चौकार-षटकारांच्या लयलूटीसह दर इनिंग्जला दोनशे धावांची फॅक्टरी मुंबई-हैदराबाद मॅचमध्येही पाहायला मिळाली.
मुंबईने हैदराबादला 34 रन्सनी नमवलं. मुंबईने 208 रन्स केल्या. शिस्तबद्ध बॉलिंगच्या बळावर मुंबईने हैदराबादला 174 रन्सवरच रोखलं. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.
क्विंटन डी कॉकने 39 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांसह 67 रन्सची आक्रमक खेळी केली. सूर्यकुमार यादवने 18 बॉलमध्ये 27 तर इशान किशनने 23 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
हार्दिक पंड्याने 19 बॉलमध्ये 28 तर कायरेन पोलार्डने 13 बॉलमध्ये 25 रन्स करत मुंबईला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडून दिला. कृणाल पंड्याने 4 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांसह 20 रन्स केल्या आणि मुंबईने 208 रन्सची नोंद केली.
हैदराबादने दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारऐवजी सिद्धार्थ कौलला तर खलील अहमदच्या जागी संदीप शर्माला संघात घेतलं.
रशीद खानने 4 ओव्हर्समध्ये फक्त 22 रन्स देत या खेळपट्टीवर कशी बॉलिंग करावी याचा वस्तुपाठ सादर केला. त्याने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या क्विंटनला आऊट केलं.
बुंध्यात यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध टी. नटराजनने याही मॅचमध्ये टिच्चून बॉलिंग केली. नटराजनला विकेट्सच्या बाबतीत यश मिळालं नाही. परंतु त्याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 29 रन्स दिल्या.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो जोडीने 34 धावांची सलामी दिली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला आऊट करत ही जोडी फोडली. त्याने 25 रन्स केल्या. मनीष पांडेने वॉर्नरला चांगली साथ दिली. जेम्स पॅटिन्सनने पांडेला आऊट केलं. पांडेने 30 रन्सची खेळी केली.
घणाघाणी बॅटिंगसाठी प्रसिद्ध वॉर्नरला सूर गवसण्यासाठी थोडा वेळ लागला. यामुळे रनरेटचं दडपण वाढलं. भरवशाचा केन विल्यमसन बोल्टचा बॉल अप्पर कट करण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. राहुल चहरने अफलातून कॅच घेत प्रियम गर्गला माघारी धाडलं.
वॉर्नर खेळपट्टीवर असेपर्यंत मुंबईला धोका होता. मात्र पॅटिन्सनच्या बॉलिंगवर इशान किशनने वॉर्नरला सुरेख कॅच टिपला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्याने 44 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांसह 60 रन्सची खेळी केली.
अभिषेक शर्मा 10 तर अब्दुल समदने 20 रन्स करत चमत्कार घडवण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबईच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर ते आगेकूच करू शकले नाहीत.
मुंबईतर्फे ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
दोनशेची परंपरा
सर्वाधिक वनडे आयोजित करण्याचा विक्रम शारजाच्या मैदानाच्या नावावर आहे. मात्र छोट्या आकारामुळे बॉलर्ससाठी हे मैदान जास्त धावा करण्यासाठी उत्तम आहे.
राजस्थानने 216 रन्सचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईने 200 रन्सपर्यंत मजल मारली.
किंग्ज इलेव्हन पंजाबने 223 रन्स केल्या तेव्हा ही धावसंख्या पुरेशी ठरेल असं चित्र होतं परंतु राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य पार केलं.
दिल्लीने युवा बॅट्समनच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर 228 रन्स केल्या. कोलकाताने उशिराने प्रतिकार केला मात्र तरीही 210 रन्सची मजल मारली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)