You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुष्पा भावे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका प्रा. पुष्पा भावेंचं निधन
ज्येष्ठ लेखिका, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं दीर्घ आजारपणानंतर निधन झालंय. त्या 81 वर्षांच्या होत्या.
अनेक वर्ष मधुमेह आजाराशी संघर्ष केल्यानंतर गेलं वर्षभर त्या अंथरुणाला खिळून होत्या पण तरीही त्यांनी आपलं लिखाण आणि इतरांशी संवाद सुरु ठेवला होता. कृतीशील विचारवंत म्हणून त्यांना अनेकजण ओळखतात.
राष्ट्र सेवा दल, लोकशाहीवादी चळवळींमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रीय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्रामातही त्या सहभागी झाल्या होत्या.
मुंबईतल्या रुईया महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अनेक वर्षं कार्यरत होत्या.
मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म 1939मध्ये झाला. मुंबईतल्या एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी मराठीची तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून संस्कृतीची पदवी त्यांनी मिळवली.
सामाजिक परिस्थिती, विविध वर्गांसमोरच्या सामाजिक समस्यांविषयीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी कायमच हिरीरीने सहभाग घेतला. महागाई विरोधातल्या आंदोलनात त्या अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरेंच्या सोबत सहभागी झाल्या होत्या.
1957मध्ये त्यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये उडी घेतली.
मराठावाडा विद्यापीठाचं नामांतर आंबेडकर विद्यापीठामध्ये करावं यासाठी झालेल्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.
मुंबईतल्या गिरणी कामगारांचे प्रश्न, देवदासींचे प्रश्न, दलित पँथरची चळवळ यांच्याशी देखील पुष्पा भावेंचा जवळचा संबंध होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)