कॅलिफोर्नियात 4 लाख हेक्टरवर पसरला वणवा, आगीचं तांडव सुरूच

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कॅलिफोर्नियातील आगीचं तांडव ही भीषण दुर्घटना असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. या भीषण आगीत असंख्य घरं आणि जंगल जळून खाक झाल्याचं स्पष्ट होतं आहे. पीडितांना सरकारतर्फे मदत देण्यात आल्याचं ट्रंप यांनी सांगितलं.

585 ठिकाणी लागलेल्या आगीत 400,000 हेक्टर क्षेत्रफळ भक्ष्यस्थानी पडलं आहे. अग्निशमन दलाचे 14 हजार कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्याचं काम करत आहेत.

जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे आगीच्या ज्वाळा दाट लोकवस्तीच्या अन्य भागांमध्ये पसरू शकण्याची भीती निर्माण झाली आहे. भीषण अशा आगीमुळे संपूर्ण परिसराला धूर आणि धुळीने वेढलं आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारोंना स्थलांतरित व्हावं लागलं आहे.

पर्वतरांगांच्या आणि लाकडाची झाडं असणाऱ्या ग्रामीण भागाला या आगीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

कॅलिफोर्निया राज्याच्या इतिहासातली ही तिसऱ्या क्रमांकाची विनाशकारी दुर्घटना असल्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसोम यांनी सांगितलं.

गॅव्हिन यांनी ट्वीट केलेल्या व्हीडिओत या भागाचं झालेलं प्रचंड नुकसान दिसत आहे. झाडांचे जळालेल्या स्थितीतील बुंधे आणि आगीमुळे लालसर झालेलं आकाश आणि राखेतून निघणाऱ्या वाफांमुळे पांढऱ्या रंगाचे निघालेल्या ज्वाळा यांनी आसमंत भरून गेला आहे.

अग्निशमन दलाचे कर्मचारी दिवसरात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. आगीमुळे वातावरणातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

कॅलिफोर्नियातील सगळ्यात जुन्या उद्यानातील 2000 वर्षांपूर्वीची रेडवूड झाडं जळून खाक झाली आहेत. बिग बेसिन स्टेट पार्क या प्रसिद्ध उद्यानातील दुर्मीळ प्रजातीची झाडं आगीचं भक्ष्य ठरली आहेत. या भागाला आगीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मनुष्यबळाची टंचाई जाणवते आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अग्निशमन दलाकडची कुमक कमी झाली होती. तुरुंगातील आरोपींच्या साथीने अग्निशमन दल ही आग आटोक्यात आणतं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच तुरुंगातील आरोपींची मदत घेण्यात आली आहे.

शुक्रवारी (21 ऑगस्ट) लागलेली आग शनिवारीही (22 ऑगस्ट) धुमसत होती. अग्निशमल दलातर्फे आग शमवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात, कॅलिफोर्नियात उष्णतेची लाट आली होती. या वेळी तापमानात उच्चांकी वाढ झालं होती. त्याच दरम्यान या आगीच्या तांडवाला सुरुवात झाली.

एलएनयू लाईटनिंग कॉम्प्लेक्स या नावानं ओळखली जाणारी ही आग वाईनचं उत्पादन घेतलं जाणाऱ्या नापा आणि सोनोमा या सॅनफ्रान्सिस्कोच्या उत्तरेला लागली. ही आग 15 टक्केच आटोक्यात आणता आली आहे.

सांता क्रूझच्या दक्षिण भागात, 115 घरं आगीत खाक झाली आहेत. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

गव्हर्नर न्यूसोम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्याकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अन्य भागातून फायर इंजिन्स, सुटका करू शकणारी विमानं, अग्निशमन दलाचे बंब रवाना झाले आहेत.

कॅलिफोर्नियात जंगलांना आगी लागतात, पण ही दुर्घटना वेगळी आणि विनाशकारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

'तुमचा हवामान बदलावर विश्वास नसेल तर तुम्ही कॅलिफोर्नियाला या,' असं ट्वीट न्यूसोम यांनी केलं आहे.

दरम्यान, कॅलिफोर्नियात 650,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेतील सर्वाधिक कोरोनाग्रस्त कॅलिफोर्नियात आहेत. आगीमुळे ज्यांना आपलं घरदार सोडून अन्य ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे त्यांना तिथे जायला कोरोनामुळे भीती वाटते आहे.

आपात्कालीन परिस्थितीत घर सोडताना किमान दोन मास्क, सॅनिटायझर, साबण आणि निर्जुंतुकीकरणासाठी स्प्रे बाळगा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

आपात्कालीन निवाऱ्यांमध्ये कोरोना संदर्भातील नियमावलीचं पालन केलं जात आहे. आगीमुळे हवेचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे लोकांनी घरातच राहावं, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

कॅलिफोर्नियात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्याही नागरिकांना भेडसावते आहे.

उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रांकडे नजर टाकली तर कॅलिफोर्नियाला आगीच्या धुराने वेढून टाकल्याचं चित्र आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)