चीनमध्ये लोकशाहीची मागणी करणारे हे विचारवंत का आले चर्चेत?

चीन

फोटो स्रोत, BBC Monitoring

    • Author, सिद्धार्थ राय
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना विषाणूची साथ ज्यापद्धतीने चीनने हाताळली, त्यावरून जगभरातून चीनवर टीका होतेय. अशातच आता बिजिंगने चायनीज कम्युनिस्ट पार्टी (CCP) आणि प्रशासनाविरोधात आवाज उठवणाऱ्या विचारवंताची मुस्कटदाबी करायला सुरुवात केली आहे.

त्सिंगुआ विद्यापीठात कायदा विषयाचे प्राध्यापक असलेले क्झू झँगरून यांनी सरकारवर टीका करणारे लेख लिहिल्यामुळे 15 जुलै रोजी त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं.

तर यापूर्वी मे महिन्यात कायद्याचेच प्राध्यापक असलेले झँग क्झेझाँग यांना अटक झाली होती. अटकेचं कारण काय तर त्यांनी सरकारविरोधात एक खुलं पत्र लिहिलं होतं.

जून महिन्यात चीनी साहित्याच्या प्राध्यापिका आणि पुरस्कारप्राप्त साहित्यिक लिअँग यानपिंग यांनी हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना शिकवण्यापासून रोखण्यात आलं.

चीनमध्ये विचारवंतावर होणाऱ्या या कारवाईवर अमेरिका आणि युरोपातूनही आवाज उठू लागला आहे.

कोरोना
लाईन

2015 साली जुलै महिन्यात चीनने शेकडो वकील आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. 9 जूनपासून ही कारवाई सुरू झाली होती. त्यामुळे याला '709 क्रॅकडाऊन' म्हणून ओळखलं जातं.

या '709 क्रॅकडाऊन'च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्ताने अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने आणि युरोपीय महासंघाने चीनमध्ये सातत्याने होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर काळजी व्यक्त करत प्रा. क्झू झँगरून यांची सुटका करावी, असं आवाहन केलं आहे.

चीनच्या सरकारी दमनशाहीविरोधात आवाज उठवणारे आणि ज्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड उगारण्यात आली, अशा काही चीनी विचारवंतांचा थोडक्यात परिचय.

क्झू झँगरून

क्झू झँगरून चीनमधले आघाडीचे कायदेतज्ज्ञ आहेत. 6 जुलै रोजी बिजिंगमधल्या त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. वेश्याव्यवसायाचा आग्रह धरण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली. मात्र, हा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं आणि मित्रपरिवाराचं म्हणणं आहे.

चीन

फोटो स्रोत, BBC Monitoring

12 जुलै रोजी त्यांची पोलीस कोठडीतून सुटका झाली. मात्र, बाहेर आल्यानंतर लगेच त्सिंगुआ विद्यापीठाने त्यांना नोकरीवरून कमी केलं.

सरकारवर उघडपणे टीका करणारे क्झू झँगरून यांचा जन्म 1962 साली चीनच्या पूर्वेकडच्या अँहुई प्रांतात झाला.

1983 साली त्यांनी साऊथवेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड लॉ विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर 1986 साली चायना युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड लॉ या विद्यापीठातून पद्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर झँगरून त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

मेलबर्न विद्यापीठातून पीएचडी करण्यासाठी 1994 साली ते ऑस्ट्रेलियाला गेले. यानंतर 2000 साली ते चीनला परतले आणि त्सिंगुआ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

2003 साली त्यांनी पहिल्यांदा चीनी घटनावादाची (Chinese constitutionalism) संकल्पना मांडली. जानेवारी 2015 मध्ये चीन लॉ सोसायटीने त्यांना 10 सर्वोत्कृष्ट कायदेतज्ज्ञांमध्ये स्थान दिलं.

कन्फ्युशिअनवादाचा कायदेशीर वारसा, कायद्याचं पाश्च्यात्य तत्त्वज्ञान आणि घटनात्मक सिद्धांत (constitutional theory) हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी 'The Confucian Misgivings - Liang Shu-ming's Narrative About Law' हे पुस्तकही लिहिलं आहे.

जुलै 2018 मध्ये त्यांना "Imminent Fears, Immediate Hopes" (आसन्न भीती आणि तात्काळ दिसणारी आशा) हा लेख लिहिला होता. त्यांच्या इतर लिखाणाप्रमाणेच या लेखातही त्यांनी चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या निरंकुश राजकारणावर (totalitarian politics) चिंता व्यक्त करत अध्यक्ष क्षी चिनपिंग यांच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं.

यानंतर चीनच्या लाल साम्राज्याच्या प्रतिमेमुळे देशाच्या विकासात कसा अडथळा निर्माण झाला, हे विषद करणारे तीन लेख त्यांनी लिहिले. यात त्यांनी स्वातंत्र्य आणि समता या लोकशाही मूल्यांची रुजूवात करण्याचंही आवाहन केलं होतं.

त्यांचे सर्व लेख एकत्रित करून पुस्तकरुपात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचं नाव होतं "Six Chapters from the 2018 Year of the Dog". या पुस्तकामुळे सीसीपी सरकार अधिकच चवताळलं आणि मार्च 2019 मध्ये त्सिंगुआ विद्यापीठाने त्यांना निलंबित करून त्यांच्यावर चौकशी बसवली.

मात्र, सूडबुद्धीने कारवाई होऊनही क्झू डगमगले नाहीत. त्यांनी चीनी प्रशासनाविरोधात लिखाण सुरूच ठेवलं. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर त्यांनी दोन लेख लिहिले. "Viral Alarm: When Fury Overcomes Fear" आणि "China, a Lone Ship of State on the Vast Ocean of Global Civilisation". या दोन्ही लेखात त्यांनी कोरोना विषाणू उद्रेकाच्या सुरुवातीच्या दिवसात चीनी प्रशासनाने ज्यापद्धतीने लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला, त्यावर कोरडे ओढले. कोरोना विषाणूच्या उद्रेकाचे व्हिसल ब्लोअर आणि ज्यांचा याच आजाराने मृत्यू झाला ते डॉ. ली वेनलिआंग यांचा मृत्यूदिन 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

झँग क्झूझाँग

झँग क्झूझाँग ईस्ट चायना युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड लॉ विद्यापीठात सहप्राध्यापक होते. चीनच्या नॅशनल पिपल्स काँग्रेस या कायदेमंडळाला खुलं पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे रोजी त्यांना अटक करण्यात आली.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झँग क्झेझाँग

तब्बल दहा हजार शब्दांचं हे पत्र आहे. यात प्रा. झँग क्झूझाँग यांनी चीनची विद्यमान राज्यघटना 'सुडो-कॉन्स्टिट्युशन' असल्याचं म्हणत राजकीय कैद्यांची तात्काळ सुटका, प्रसार माध्यमांवरील निर्बंध उठवणे आणि शांततेच्या मार्गाने बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था स्थापन करणे, या प्रमुख मागण्या केल्या होत्या.

22 मे रोजी चीनच्या संसदेचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या सत्राच्या काही दिवस आधीच हे पत्र प्रकाशित झालं. यात त्यांनी चायनीज कम्युनिस्ट पक्षाने ज्या पद्धतीने कोरोना विषाणूच्या उद्रेकाला हाताळलं, त्यावरही टीका केली होती. तसंच कोरोना साथीविरोधात सर्वात आधी धोक्याची सूचना देणारे डॉ. ली वेनलियांग यांना चीनी प्रशासनाने शिक्षा केल्याचंही म्हटलं होतं.

44 वर्षीय झँग, जिअँक्झी प्रांतात राहतात. चीनमध्ये राजकीय आणि घटनात्मक सुधारणेविषयी ते कायम बोलत. डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी कॉन्स्टिट्युशनॅलिझम, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि कायद्याचं राज्य यांचा पुरस्कार करणारा "The origin and danger of anti-constitutional counter current in 2013" हा लेख लिहिला होता. हा लेख लिहिल्यामुळे ईस्ट चायना युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड लॉ विद्यापीठाने त्यांना बडतर्फेही केलं होतं.

याच विद्यापीठातून झँग यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर 2007 मध्ये पीएचडी पूर्ण झाल्यावर ते याच विद्यापीठात सहप्राध्यापक म्हणून रुजू झाले. 2009 साली त्यांनी सिंगापूरमधून प्रकाशित होणाऱ्या 'लिअॅन्हे झॅओबॅओ' या चीनी वृत्तपत्रात "China needs to remove Marxism" शिर्षकाखाली एक लेख लिहिला होता. हा लेख मागे घ्यावा, यासाठी त्यांच्यावर खूप दबाव टाकण्यात आला होता. मात्र, त्यांनी लेख मागे घ्यायला स्पष्ट नकार दिला होता.

मे 2013 मध्ये युनिव्हर्सिटीने ज्या 7 विषयांवर प्राध्यपकांनी बोलू नये किंवा शिकवू नये म्हणून सांगितलं होतं, ते '7 टॅबू टॉपिक्स' त्यांनी वेबो या सोशल मीडियावरच्या त्यांच्या अकाउंटवर सार्वजनिक केले होते. यात माध्यम स्वातंत्र्य, नागरी अधिकार, न्यायालयीन स्वातंत्र्य आणि कम्युनिस्ट पक्षाच्या भूतकाळातल्या चुका या विषयांचा समावेश होता. या विषयांची त्यांनी जाहीर वाच्यता केल्यानंतर चीनमध्ये इंटरनेटवर '7 टॅबू टॉपिक्स'वर बंदी आणण्यात आली आणि झँग यांचं विबो अकाउंटही बंद करण्यात आलं.

विद्यापीठाने प्राध्यापक पदावरून उचलबांगडी केल्यानंतर 2019 पर्यंत त्यांनी अटक करण्यात आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे वकील म्हणून काम केलं. मात्र, पुढे शांघाई ज्युडिशिअल ब्युरोने त्यांचा वकिलीचा परवानाही रद्द केला.

लिअँग यानपिंग

लिअँग यानपिंग चीनी साहित्याच्या अभ्यासिका आणि प्राध्यापिका आहेत. 27 एप्रिल 2020 रोजी हुबेई विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशी समिती बसवली. 'वुहान डायरी' या वुहान लॉकडाऊनदरम्यान आलेल्या अनुभवावर पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका फँग फँग यांच्या लेखाला पाठिंबा देणारं लेखन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात चौकशी बसवण्यात आली आहे.

प्रशासनाने 20 जून रोजी यासंबंधीची नोटीस जारी करत लिअँग हाँगकाँगच्या फुटीरतावादाला पाठिंबा देणे आणि सोशल मीडियावरून दुसरा महायुद्धादरम्यान चीनमधल्या जपानच्या भूमिकेविषयी चुकीची माहिती पसरवणे, यात दोषी आढळल्याचं सांगत चौकशी करणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यापासूनही रोखण्यात आलं.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झँग क्झेझाँग

गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये प्रत्याप्रणविरोधी विधेयकाविरोधात निदर्शनं झाली होती. या निदर्शनात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काळा मास्क घातलेला फोटो लावला होता.

59 वर्षांच्या लिअँग यांचा जन्म शांक्झी प्रांतातल्या डॅटाँग शहरातला. 1997 साली त्यांनी हुबेई विद्यापीठातून चीनी साहित्यातून पद्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच विद्यापीठात त्या पुढे प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.

2003 साली त्या वुहान येथील सेंट्रल चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीत पीएचडी स्कॉलर म्हणून दाखल झाल्या. त्यानंतर 2006 साली जपान युनिव्हर्सिटी ऑफ टोकियोमध्येही त्यांनी एक वर्ष व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून काम केलं. जपानहून परतल्यानतंर 2010 साली त्यांना हुबेई विद्यापीठातल्या लिबरल आर्ट स्कूलमध्ये प्राध्यापिका म्हणून पदोन्नती मिळाली.

आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत लिअँग यानपिंग यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तकं लिहिली आहेत. 2011 साली त्यांना हुबेई सोशल सायन्स अचिव्हमेंट आणि हुबेई साहित्य आणि कला पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)