भारत चीन सीमा वाद: भारताला चीनकडून धोका असल्यानं युरोपातील सैन्य कमी करतोय - अमेरिका

भारत चीन सीमा वाद

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारत-चीन तणावादरम्यान अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पण संपूर्ण वादावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची वक्तव्यं भारतासाठी इतकी उत्साहवर्धक नव्हती. पण गुरुवारी (25 जून) माईक पॉम्पिओ यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

माईक पॉम्पिओ गुरुवारी ब्रसेल्स फोरममध्ये बोलत होते. तिथं ते म्हणाले, चीनकडून भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाला वाढता धोका पाहून अमेरिकेने युरोपातून आपलं सैन्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतेच अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनीही जर्मनीमधून आपलं सैन्य कमी करणार असल्याची घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या निर्णयावर युरोपियन महासंघाने नाराजी दर्शवली होती.

पॉम्पिओ म्हणाले, चिनी कम्युनिस्ट पार्टीची कृत्यं भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स आणि दक्षिण चीन समुद्रासाठी धोका आहेत.

भारत चीन सीमा वाद

फोटो स्रोत, Getty Images

"चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सामना करण्यासाठी आम्ही सुसज्ज असावं, याची आम्ही काळजी घेत आहोत. सध्याच्या काळातील हे एक आव्हान आहे. आम्ही यासाठीची तयारी पूर्ण केली याची आम्ही खात्री करून घेत आहोत," असंही पॉम्पिओ यांनी म्हटलं.

चीनचा धोका

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पियो यांनी यावेळी भारत-चीन सीमेवरचा जीवघेणा संघर्ष, दक्षिण चीन समुद्रातील चीनची कुरघोडी शिवाय कथितरित्या इतरांना नुकसान पोहोचवणारं चीनचं आर्थिक धोरण या गोष्टींवर खुलून मत मांडलं.

ते पुढे म्हणाले, "चीनचा शेजारी देशांना धोका आहे. अमेरिका यावर लक्ष ठेवून आहे. चीनच्या या धोक्याबाबत अमेरिका युरोपियन महासंघाशी चर्चा करणार आहे."

ट्रान्स-अटलांटिक अलायन्समुळे चीनच्या धोक्याबाबत संवाद साधण्यास मदत होईल.

पॉम्पियो यांच्या मते, चीनचा धोका या विषयावर युरोपियन महासंघ आणि अमेरिकेला एकत्रित मिळून काम करणं आवश्यक आहे. म्हणजेच कोणतीही कारवाई एकत्रितरित्या करता येईल. युरोप नेहमीच चीनबाबत उदार धोरण स्वीकारत असल्याचे आरोप लावले जातात, असंही पॉम्पियो म्हणाले.

चीनची टेलिकम्युनिकेशन कंपनी ख्वावेसुद्धा चीनी सर्व्हिलन्स स्टेटचा भाग आहे का, हा प्रश्नही यावेळी पॉम्पियो यांना विचारण्यात आला.

उत्तरादाखल ते सांगतात, "चीनच्या सुरक्षा दलातील लोक या कंपनीच्या मुख्यालयात काम करतात. चीनच्या कायद्यानुसार चीन कम्युनिस्ट पार्टीने ख्वावेकडे कोणतीही माहिती मागितल्यास ती त्यांना द्यावी लागते. ही माहिती खासगीसुद्धा असू शकते.

युरोपमधून सैन्य कमी करण्यामागचा अमेरिकेचा तर्क

अमेरिका जर्मनीतली आपली सैन्यसंख्या 52 हजारवरून 25 हजारांवर आणणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना पॉम्पियो म्हणतात, "काही विशिष्ट ठिकाणी अमेरिकन सैनिकांची संख्या कमी होईल. कारण जास्त धोका असलेल्या इतर ठिकाणी या सैन्याची सर्वाधिक गरज आहे. इथं हे सैन्य पाठवता येऊ शकतं. मी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या धोक्यांबाबत बोलत आहे. अजूनही चीनकडून भारताला धोका आहे. व्हिएतनामलासुद्धा धोका आहे. शिवाय मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स आणि दक्षिण चीन समुद्रातील सुरक्षेबाबत आव्हानं वाढत आहेत. धोका असलेली ठिकाणं आता वाढू लागली आहेत. चीनकडून धोका वाढत असलेल्या सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवूनच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. आमच्या सहकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा व्हावी, असं आम्हाला वाटतं."

युरोपातील सैन्य कमी करण्याच्या निर्णयामुळे ट्रंप यांच्यावर टीका होत आहे. टीकाकारांच्या मते, यामुळे युरोपला रशियाचा धोका वाढेल. पण पॉ़म्पियो ही शक्यता नाकारतात.

ते म्हणतात, "सध्याचा अमेरिकेचा निर्णय परिस्थितीनुरूप घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत असे निर्णय घेतले जातात. विविध देशात अमेरिकेचं सैन्य असण्याबाबत टीका होऊ शकते. पण आपल्याला धोक्यांबाबत गांभीर्य असलं पाहिजे. आपण आपल्या संसाधनांचा योग्य वापर करत आहोत किंवा नाही, हे आपल्याला पडताळून पाहण्याची गरज आहे."

तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची - चीन

याच दरम्यान चीनचे भारतातील राजदूत सुन वेइडोंग यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, सीमेवरील तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची आहे.

"भारत आणि चीन एकमेकांमधील मतभेद सोडवण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, याची जबाबदारी भारतावर आहे. हे प्रकरण आणखी किचकट बनवण्याची आवश्यकता नाही. सीमेवरील स्थिती सध्या स्थिर आहे," असं चीनचे भारतातील राजदूत म्हणाले.

एकमेकांप्रती आदर आणि समर्थनच या प्रकरणावर उपाय आहे, असं सांगताना चीनचे राजदूत पुढे म्हणाले, "सीमेवरील तणाव कमी करण्याची भारतावर आहे."

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

"चीन आणि भारत विकसनशील देश आहेत. एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेले दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था उभारी घेण्याच्या अवस्थेत आहेत. दोन्ही देश विकासासाठी काम करत आहेत. सीमेवरील तणावाचा मुद्दा लक्षात घेता, तो तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची आहे, चीनची नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला होता. भारतीय लष्करानं सीमा कराराचं उल्लंघन केलं होतं," असं चीनच्या राजदूतांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

दरम्यान, भारतानं चीनचे सर्व आरोपांना फेटाळलं आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सीमेवरील तणावाला चीनला जबाबदार धरलं आहे. चिनी लष्करानंच द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केल्याचा दावाही श्रीवास्तव यांनी केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)