कोरोना आरोग्य : तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीनेच शरीरावर हल्ला केला तर?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अॅम्बर डान्स
    • Role, बीबीसी फ्युचर
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

जगभरातली हॉस्पिटल्स सध्या कोव्हिड-19 च्या रुग्णांनी भरलेली आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात तीन लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय.

मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मात्र इतरांना कोरोनापासून धोका नाही, असा याचा अर्थ होत नाही. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये अनेक तरूण आणि निरोगी व्यक्तींचाही समावेश आहे.

याचं नेमकं कारण काय?

आपल्या शरीरामध्ये एखाद्या बॅक्टेरियाने शिरकाव केल्यानंतर आपली रोग प्रतिकारकशक्ती त्याच्याशी लढते आणि त्याला कमकुवत करून संपवते.

पण शरीराच्या शत्रूंशी लढणाऱ्या पेशींचं हे सैन्य अनेकदा बंड करतं आणि शत्रूला संपवण्याच्या प्रयत्नांत या पेशी स्वतःच्याच शरीराचं नुकसान करू लागतात.

ज्या पेशींनी खरंतर रक्षण करणं अपेक्षित असतं, त्याच पेशी हे सैन्य मारू लागतं.

आपली रोग प्रतिकार शक्ती गरजेपेक्षा जास्त सक्रीय होत रोगांशी लढण्याऐवजी स्वतःच्याच शरीराचं नुकसान जेव्हा करू लागते, तेव्हा त्याला 'सायटोकाईन स्टॉर्म' म्हणतात.

कोरोना
लाईन

यामध्ये या रोगप्रतिकारक पेशी म्हणजेच इम्यून सेल्स (Immune Cells) फुफ्फुसांजवळ जमा होतात आणि फुफ्फुसांवर हल्ला करतात.

या प्रक्रियेमध्ये रक्तवाहिन्या फाटतात आणि त्यामधून रक्तस्त्राव व्हायला लागतो आणि रक्ताच्या गुठळ्या होतात. परिणामी शरीराचा रक्तदाब कमी होतो. हृदय, मूत्राशय, फुफ्फुस्सांसारख्या नाजूक अवयवांचं काम मंदावतं.

तपासणी आणि उपचारांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते. पण कोव्हिड-19 या रुग्णांमध्ये यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, हे सांगणं सध्या कठीण आहे.

कोमामध्ये जाऊ शकतो रुग्ण

शरीरात जेव्हा हे सायटोकाईन स्टॉर्म होतं, तेव्हा याचा परिणाम शरीरातल्या निरोगी पेशींवरही होतो. रक्तातल्या लाल आणि पांढऱ्या पेशी संपू लागतात. यकृताचं नुकसान होऊ लागतं.

सायटोकाईन स्टॉर्मदरम्यान रुग्णाला सणसणून ताप भरतो आणि डोकं दुखतं असं तज्ज्ञ सांगतात. अनेक रुग्ण कोमात जाण्याचीही शक्यता असते. असे रुग्ण आपल्याला जाणवतं त्यापेक्षा जास्त आजारी असतात. पण अजूनही डॉक्टर ही स्थिती पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. याचा शोध घेण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

कोव्हिड-19च्या रुग्णांमध्ये सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याबद्दलची माहिती वुहानमधल्या डॉक्टर्सकडूनच जगाला मिळाली. 29 रुग्णांवर त्यांनी एक अभ्यास केला. या रुग्णांमध्ये IL - 2 आणि IL - 6 सायटोकाईन स्टॉर्मची लक्षणं त्यांना आढळली.

वुहानमध्ये 150 कोरोना रुग्णांवर एक संशोधन करण्यात आलं. कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये IL - 6 सीआरपी सायटोकाईन स्टॉर्मची लक्षणं जास्त असल्याचं यामध्ये आढळलं. बचावलेल्यांमध्ये ही लक्षणं कमी होती.

अमेरिकेतही कोव्हिड रुग्णांमध्ये सायटोकाईन स्टॉर्मचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय.

कोव्हिड-19 च्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकारक पेशी फुफ्फुसांवर इतक्या वेगाने आणि लवकर हल्ला करतात की फुफ्फुसांवर फायब्रोसिस म्हटल्या जाणाऱ्या खुणा उमटत असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. व्हायरसच्या सक्रियतेमुळे कदाचित हे होत असावं.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

पण सायटोकाईन स्टॉर्मचा एखाद्या साथीच्या रोगाशी संबंध जोडला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. संशोधकांनुसार 1918 मधली फ्लूची साथ आणि 2003 मधली सार्सची साथ य दरम्यान कदाचित यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले होते. कदाचित H1N1 स्वाईन फ्लूमध्येही अनेक रुग्णांचा मृत्यू त्यांच्या शरीरातल्या रोग प्रतिकारक पेशींच्या बंडामुळे झाला होता.

जागतिक साथीच्या फ्लूमध्ये रुग्णांचा मृत्यू हा व्हायरसमुळे होत नसून रुग्णाच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती जास्त सक्रीय झाल्यामुळे होत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. शरीरातल्या रोग प्रतिकारक शक्तीचं संतुलन बिघडलं तर मृत्यू होणं अटळ आहे.

म्हणूनच शरीरातल्या या शक्तीचं संतुलन कायम ठेवण्याला प्राधान्य असतं. याच्या उपचारासाठी स्टिरॉईड्सना प्राधान्य दिलं जातं. पण कोव्हिडच्या बाबतीत स्टिरॉईड्स परिणामकारक ठरतात का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

कोरोना

फोटो स्रोत, PA Media

काही खास प्रकारची सायटोकाईन रोखण्यासाठी विविध प्रकारची औषधं बाजारात उपलब्ध आहेत.

म्हणजे सायटोकाईनशी लढण्यासाठी स्टिरॉईड्स जर एखाद्या बॉम्बसारखी असतील तर इतर औषधं ही नेम धरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसारखी असतात. रोग प्रतिकारक यंत्रणा शाबूत ठेवणं आणि गडबड करणाऱ्या पेशींना संपवणं हे या औषधांचं काम असतं.

उदाहरणार्थ-किनेरेट म्हणजेच अनाकिनरा नावाचं प्रोटीन सायटोकायना IL 1 च्या रिसेप्टर्सना थांबवतं. रुमटाईड आर्थरायटिसच्या उपचारांसाठी या औषधाला अमेरिकन सरकारने मान्यता दिली आहे.

याप्रकारे टॉसिलीजमॉब (अॅक्टेम्रा) देखील कोव्हिड-19 साठी उपयोगी ठरू शकतं. याचा वापरही सहसा सांधेदुखी, इम्युथेरपीच्या कॅन्सर रुग्णांमधलं सायटोकाईन स्टॉर्म नियंत्रित करायला केला जातो.

चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात 21 कोव्हिड रुग्णांवर याचा वापर करण्यात आला. काहीच दिवसांत कोव्हिडची या रुग्णांमधली अनेक लक्षणं कमी झाली. दोन आठवड्यांत 19 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं होतं.

कोव्हिड-19 साठीच्या सायटोकाईन ब्लॉकर्सविषयी सध्या विविध प्रकारचं संशोधन केलं जातंय. टॉसिलीजमॉबवर इटली आणि चीनमध्येही संशोधन होतंय.

पण सायटोकाईन स्टॉर्मचं निदान करणं हीच मुळात मोठी गोष्ट असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. अनेकदा शरीरात हे वादळ येऊन जातं पण डॉक्टर्सच्या हे लक्षात येत नाही.

रोग प्रतिकारक क्षमता आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवते. पण हीच यंत्रणा जीवावर उठली तर काय करायचं? हा यंत्रणेच्या बंडावर विजय मिळवायलाच हवा आणि संशोधक याचसाठी कामाला लागले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)