कोरोना व्हायरसः चीन 10 दिवसात करणार 1 कोटी लोकांची कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पाब्लो उचो आणि विन्सेंट नी
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
चीनने कोरोना संकटाचा ज्या पद्धतीने सामना केला त्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तोंडभर कौतुक केलं आहे. "कदाचित हे जगाच्या आजार नियंत्रणाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत महात्त्वाकांक्षी आणि आक्रमक प्रयत्न असावे," अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या प्रयत्नांचं वर्णन केलं आहे.
आता चीनने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. कोरोना विषाणूचं उगमस्थान असणाऱ्या वुहान शहरातल्या सर्वच्या सर्व लोकांची अवघ्या 10 दिवसात कोरोना चाचणी घेण्याचा निर्धार चीनने व्यक्त केला आहे.
यासंबंधीच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शहरात 1 कोटी 10 लाख नोंदणीकृत नागरिक आहेत. या नागरिकांच्या चाचणीसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्यसेवेसारख्या अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आणि ज्यांना कोव्हिड-19 आजार होण्याची शक्यता अधिक आहे, अशांना यादीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की चाचणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा करून करण्यात येईल.
या चाचण्यातून किती जण अॅक्टिव्हली इन्फेक्टेड आहेत, याची माहिती मिळू शकेल.
मात्र, हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी चीनला दररोज जवळपास 10 लाख लोकांची चाचणी करावी लागणार आहे. सध्या चीनमध्ये दररोज 40 हजार ते 60 हजार कोव्हिड-19 चाचण्या होत आहेत.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?

याविषयी बोलताना, "हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही", असं न्यू यॉर्कमधल्या ग्लोबल हेल्थ अॅट द काउंसिल ऑफ फॉरेन अफेअर्समधले तज्ज्ञ यँनझाँग हुअँग यांनी म्हटलं आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्याचं कारण काय?
या आठवड्यात वुहान शहरातल्या रहिवाशी कम्पाउंडमध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे वुहान शहरातल्या एकूणएक नागरिकाची कोव्हिड-19 चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे सहाही नवे कोरोनाग्रस्त असिम्प्टोमॅटिक होते. म्हणजे या रुग्णांमध्ये कोरोनाची ताप किंवा खोकला अशी कुठलीही लक्षणं आढळली नाही.
यानंतर या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सर्वच्या सर्व पाच हजार जणांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
मात्र, असंही सांगितलं जातंय की वुहान शहरातल्या नोंदणीकृत नागरिकांपैकी अनेकजण लॉकडाऊन लागू होण्याआधीच शहर सोडून गेले आहेत आणि उर्वरित नागरिकांपैकी अनेकांची यापूर्वीच कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.
त्यामुळे जी शहराच्या लोकसंख्येची आकडेवारी दिली जातेय तेवढ्या लोकांच्या चाचण्या खरंतर करायच्याच नाहीयेत.
वुहान विद्यापीठातल्या पॅथोजेन बायोलॉजी विभागाचे उपसंचालक प्रा. याँग झेंकी यांनी ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की वुहानमधल्या 30 ते 50 लाख नागरिकांची यापूर्वीच कोरोना चाचणी झालेली आहे. "उर्वरित 60 ते 80 लाख लोकांची चाचणी दहा दिवसात घेणं वुहानसाठी शक्य आहे."
असं असलं तरीसुद्धा 10 दिवसात एवढ्या चाचण्या करण्याचं उद्दिष्ट प्रशासनाने ठेवलं असेल तर त्यासाठी दररोज किमान 6 ते 8 लाख लोकांच्या चाचण्या कराव्या लागणार आहे.
आणि हे एक मोठं आव्हान आहे.
22 एप्रिल रोजी हुबेई प्रांतीय सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या प्रांतात दररोज जवळपास 89 हजार लोकांच्या चाचण्या होत आहेत. यापैकी 63 हजार चाचण्या या हुबेईची राजधानी असलेल्या वुहान शहरात होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
तर 10 मे रोजी वुहानमध्ये केवळ 40 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.
इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या कशा घेणार?
सध्याची क्षमता बघता 10 दिवसात जवळपास 80 लाख लोकांच्या चाचण्या घेणं शक्य आहे का, असा प्रश्न पडतो. मात्र, चीन सरकारने ठरवलं तर हे नक्कीच शक्य असल्याचं काहींना वाटतं. या चाचण्या थर्ड पार्टी कंपन्या करणार असल्याचं वुहानमधल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने म्हटल्याचं वृत्त चीनच्या प्रसार माध्यमामध्ये आलं आहे. या चाचण्यांसाठी नमुने गोळा करण्यासाठी स्थानिक हॉस्पिटल आपला कर्मचारी वर्ग पाठवणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार थर्ड पार्टी एका दिवसात एक लाख चाचण्या करू शकते आणि म्हणूनच अवघ्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणं शक्य होईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
"त्यामुळे चाचण्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. म्हणजेच वुहानच्या काही भागात चाचण्या 12 मेपासून सुरू होतील तर काही भागात 17 मेपासून आणि सर्व भागातल्या चाचण्या दहा दिवसांच्या आत पूर्ण होतील."
चीनचे उद्योग मंत्री गेल्या महिन्यात म्हणाले होते की दररोज 50 लाख टेस्ट किटची निर्मिती करण्याची चीनची क्षमता आहे. तसंच अधिकाधिक टेस्टिंग सेंटर्स आणि लॅब्स उभारण्याचं कामही सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. यांग प्रमाणेच काहींचं म्हणणं आहे की एखाद्याच्या आजूबाजूला एकही रुग्ण आढळलेला नसेल तर त्या ठिकाणी प्रत्येकाची चाचणी करण्याची गरज नाही.
द ग्लोबल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "एखाद्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा त्याला पुढे आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी एपिडेमॉलॉजीची मदत घेणं गरजेचं आहे."
'संक्रमणाची दुसरी लाट येण्याची भीती'
अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट येण्याची भीती दाटू लागली आहे.
वुहानमध्येही 11 आठवड्यांसाठी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. 8 एप्रिल रोजी वुहानमधून लॉकडाऊन हटवण्यात आला. मात्र, 11 आठवड्यांचा कडकडीत लॉकडाऊन पाळणाऱ्या वुहानमध्येच कोरोना संसर्गाच्या काही नवीन केसेस समोर आल्याने संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चीनमधल्या इतर भागातही खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. ईशान्य चीनमधल्या जिलीन शहराचं उदाहरण देता येईल. या शहराने आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत आणि गेल्या 48 तासात ज्यांचे कोरोना चाचण्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत केवळ त्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या शहरात ट्रेन आणि बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. चित्रपटगृहं, जिम आणि इंटरनेट कॅफेही बंद आहेत.
चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनमध्ये चीफ एपिडेमॉलॉजिस्ट असलेले वू जुनयो यांचं म्हणणं आहे की चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा लागण होत असल्याने चीन सरकार हाय अलर्टवर आहे.
सरकारी मीडिया असलेल्या सीसीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले, "वुहानमध्ये एकापेक्षा जास्त अशा केसेस आढळल्या आहेत ज्यांच्यात 30 ते 50 दिवसांपर्यंत आजार असू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा परिणाम जास्त काळ राहू शकतो आणि अशा लोकांमध्ये आजाराची लक्षणं सलग नाही तर अधूनमधून दिसून येतात."
खर्चिक चाचण्या
प्रा. वुहांग सांगतात वुहानमधल्या सर्वच्या सर्व नागरिकांच्या कोरोना चाचण्या करणं खूप खर्चिक असणार आहे.
ते म्हणाले, "मात्र एक लक्षात घ्या की हा चीन आहे. इथे ज्या पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आला. विषाणूला आळा घालण्यासाठी जी कठोर पावलं उचलली गेली, ते सर्व खूप खर्चिक होतं. हे करताना त्यांचा उद्देश होता कुठल्याही किंमतीत सर्वाधिक सुरक्षा पुरवणं."
कोरोना विषाणूविरोधातली चीनची महत्त्वाकांक्षी भूमिका ही इतर कुठल्याही देशापेक्षा विपरित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत दररोज जवळपास 3 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या होत आहेत आणि कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेले असूनदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोशल डिस्टंसिंगमध्ये शिथिलता देत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका होतेय.
प्रा. हुआंग म्हणतात, "चीन प्रशासनाच्या नजरेत ही तुलना चीनच्या कामगिरीचं श्रेष्ठत्व अधोरेखित करते."
असं असलं तरी चाचण्या केल्याने अॅक्टिव्ह केसेस शोधून काढता येतील. मात्र, त्यामुळे भविष्यातला संसर्गाचा धोका काही कमी होत नाही.
प्रा. हुआंग म्हणतात, "भविष्यात काही ठिकाणी संसर्ग पुन्हा उफाळण्याची भीती आहे आणि मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्याने ही समस्या सुटणारी नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























