कोरोना व्हायरस : इटलीमधल्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त

An armed police officer, wearing a face mask, patrols a closed and deserted St Peter's Square in the Vatican

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारच्या (19 मार्च) एका दिवसात 427 जणांचा बळी गेलाय.

यामुळे कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या इटलीमध्ये 3,405 झाली आहे. ज्या चीनमध्ये या विषाणूच्या उद्रेकाला सुरुवात झाली त्यापेक्षा ही आकडेवारी जास्त आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 3,245 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पण ही आकडेवारी कितपत विश्वसनीय आहे याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत.

12 मार्चला संपूर्ण इटलीमध्ये 'लॉकडाऊन' जाहीर करण्यात आला. 25 मार्चपर्यंत हा लॉकडाऊन असणार होता, पण आता मात्र याचा कालावधी वाढवण्यात आलाय. जवळपास सर्व इटालियन नागरिकांना घरी थांबण्यास सांगण्यात आलं आहे.

कोरोना
लाईन

पण संसर्ग रोखण्यासाठीची उपाययोजना करूनही नवीन केसेस आणि मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढतेय.

जगभरामध्ये आतापर्यंत 2,20,000 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या असून 9000 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

या उद्रेकाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी पहिल्यांदाच चीनमध्ये संसर्गाचं कोणतंही नवीन देशांतर्गत प्रकरण आढळलं नसल्याचं चीनने म्हटलंय. हा टप्पा महत्त्वाचा मानला जातोय.

पण त्याचबरोबर बाहेरच्या देशांतून आलेल्या 34 जणांना याची लागण झाल्याचंही चीनने जाहीर केलंय.

चीनमधल्या आतापर्यंतच्या संसर्गांची एकूण संख्या आहे 81000. हा आकडा अजूनतरी इटलीपेक्षा जास्त आहे.

इटलीमध्ये अद्याप 41,035 जणांना लागण झालीय.

इटलीतली सद्यस्थिती

इटलीमधले बहुतांश उद्योग बंद करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवर देशभर 12 मार्चपासून बंदी घालण्यात आली आहे.

बार, रेस्टॉरँट्स आणि बहुतेक दुकानं बंद आहेत. शाळा आणि विद्यापीठंही बंद आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून यामुळे 'परिस्थिती ढासळण्यापासून रोखण्यासाठी' मदत झाल्याचं पंतप्रधान ग्युसेप कॉन्ट यांनी म्हटलंय.

पण असं असलं तरी 'आम्हाला ताबडतोब आयुष्य पूर्वपदावर आणता येणार नसल्याचं' त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

इटलीच्या उत्तर भागाला या संसर्गाचा सर्वांत जास्त फटका बसलाय.

या भागामधल्या लोकसंख्येत जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त असून त्यासोबतच 19 ते 34 वयोगटातील अनेक जण ज्येष्ठ नागरिकांसोबत राहात असल्याचं काही तपासण्यांमध्ये आढळलेलं आहे.

युरोपाच्या इतर भागांतली परिस्थिती

फ्रान्समध्ये मंगळवार सकाळपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आपण बाहेर का पडलोय हे सांगणारी अधिकृत कागदपत्रं सोबत बाळगणं सक्तीचं आहे. तसं नसल्यास त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसांसाठीच असणार होता, पण आता मात्र हा कालावधी कदाचित वाढवला जाऊ शकतो, असं फ्रान्सचे गृहमंत्री ख्रिस्टॉफ कॅस्टनर यांनी युरोप-१ रेडियोला सांगितलं.

तर दुसरीकडे स्पेनमध्ये मृतांचा आकडा एका दिवसात 209ने वाढलाय. संसर्ग झालेल्यांची संख्या स्पेनमध्ये 3,431ने वाढून आता 17,147 झालेली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरलेला स्पेन हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे. आणि स्पेनमध्येही देशभर लॉकडाऊन आहे.

जर्मनीमध्ये अद्याप अशी कोणतीही कठोर पावलं उचलण्यात आलेली नाहीत. पण जर्मनीतल्या शाळा आणि अनेक उद्योग आणि सार्वजनिक जागा बंद करण्यात आल्या आहेत. पण सक्तीचा लॉकडाऊन लावण्याची पाळी येऊ नये म्हणून लोकांनी गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात असा इशारा जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी बुधवारी दिलाय.

युकेमध्येही कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी अद्याप तरी करण्यात आलेली नाही, पण इथल्या शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

लंडनमध्ये या संसर्गाचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव असून आता इथल्या दळणवळण सेवाही कमी करण्यात आल्या आहेत.

इतर घडामोडी

देशामध्ये परतणाऱ्या लोकांमुळे संसर्गाची दुसरी लाट येण्याचा इशारा दक्षिण कोरिया, चीन आणि सिंगापूरमध्ये देण्यात आलाय.

संसर्गाचा मोठा विळखा पडलेल्या इराणमध्ये लोकांनी बाहेर जाऊन सण साजरा करण्याऐवजी 'नवरोज'च्या (पर्शियन नववर्ष) दिवशीही घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने नागरिक नसणाऱ्या लोकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी १०० अब्ज डॉलर्सचं विधेयक मंजूर केलंय. मोफत तपासण्या आणि भरपगारी रजा देण्यासाठी हा निधी वापरला जाईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)