कोरोना व्हायरसः ब्रुफेनच्या गोळ्या योग्य आहे का?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रिएलिटी चेक टीम आणि मॉनिटरिंग
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
सोशल मीडियावरुन जर तुमच्याकडे माहिती येत असेल तर मग कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर ब्रुफेन घेणं धोकादायक ठरू शकतं, हे तुम्ही वाचलं असेलच.
असे अनेक वैद्यकीय सल्ले देणारे मेसेजेस सध्या एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे फिरत आहेत. पण यामध्ये वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आलंय.
या गोष्टी तपासून पाहण्यासाठी बीबीसीने अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली.
कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास ब्रुफेनचा वा वापर केला जाऊ शकतो का याविषयी तज्ज्ञांद्वारे कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
शिवाय काही त्रासांमुळे आधीपासून ब्रुफेन घेणाऱ्यांनाही याचा वापर बंद करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. त्यांनी या औषधाचा वापर बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणं गरजेचं आहे.
पॅरासिटमॉल आणि ब्रुफेन ही दोन्ही औषधं अतिशय लोकप्रिय आहेत. ताप कमी करण्यासाठी आणि फ्लूची लक्षणं दिसल्यानंतर ही औषधं वापरली जातात. पण ब्रुफेन आणि इतर कोणतीही नॉन स्टिरॉईड अँटी इन्फ्लमेटरी (NSAID) औषधं ही सर्वांच्या वापरासाठी नसतात. आणि अनेक लोकांमध्ये यांचे साईड-इफेक्टसही पाहायला मिळतात.
ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, श्वसनाशी वा हृदयाशी संबंधित विकार आहे त्यांना या औषधांचा त्रास होऊ शकतो.
ब्रुफेनच्या वापरामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक धोकादायक होऊ शकतो याविषयीचे ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत. जोपर्यंत आपल्याला याविषयीची माहिती मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कोरोना व्हायरससारखी लक्षणं दिसू लागल्यावर पॅरासिटमॉल घेऊ शकता. पण जर तुमच्या डॉक्टरने तुम्हाला हे घेण्याची मनाई केली असेल, तर मात्र तुम्ही या औषधाचा वापर करू नका.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा -कोरोनाच्या संसर्गासोबतच का वाढू लागले आहेत मानसिक आजार?
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे डॉक्टर शेरलॉ वॉरन-गॉश सांगतात, "ब्रुफेनचा कोरोना व्हायरसच्या संसर्गावर विशेष परिणाम होतो की नाही हे अजून आपल्याला समजलेलं नाही."
खबरदारीचा उपाय म्हणून पहिला पर्याय म्हणून पॅरासिटम़ॉलला प्राधान्य देणं योग्य असल्याचंही ते सांगतात.
श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी ब्रुफेन घेतल्यास आजाराची गंभीरता वाढल्याचं काही उदाहरणांमध्ये आढळलेलं आहे.
खोट्या बातम्या
वैदयकीय वेबसाईट्सवर भरपूर माहिती उपलब्ध असली तरी याच सोबत खोट्या बातम्या आणि चुकीची माहितीही ऑनलाईन पहायला मिळतेय. व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये चुकीचे संदेश झपाट्याने पसरत आहेत :

फोटो स्रोत, Getty Images
कॉर्कमध्ये चार लोकांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलं. त्यांना गंभीर आजार नव्हता. या सगळ्यांना अँटीइन्फ्लमेटरी ड्रग्स देण्यात आली. पण आता यामुळे या लोकांना गंभीर आजार झालेला नसेल ना, याविषयीची चिंता वाढलेली आहे. (खोटी बातमी)
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांना व्हिएन्ना युनिव्हर्सिटीने एक इशारा दिलाय. कोणत्याही परिस्थितीत ब्रुफेन घेऊ नये, ब्रुफेन घेतल्याने या व्हायरसची संख्या झपाट्याने वाढते आणि याच कारणामुळे इटलीमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात होऊन परिस्थिती ढासळल्याचं या संदेशात म्हटलंय. (खोटी बातमी)
फ्रान्सच्या टॉलॉस युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची 4 गंभीर प्रकरणं आढळली आहेत. हे सगळे तरूण आहेत. या लोकांना यापूर्वी कोणताही शारीरिक आजार नव्हीता. पण कोरोना व्हायरसची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी ब्रुफेनसारखी वेदनाशामक औषधं घेतल्यानंतर त्यांचा आजार गंभीर झाला. (खोटी बातमी)
हे आणि याप्रकारचे अनेक संदेश सोशल मीडियावर झपाट्याने शेअर केले जातायत. फक्त व्हॉट्सअॅपच नाही तर इन्स्टाग्रामवरही हे संदेश फिरत आहेत.
अशा प्रकारचे मेसेज हे बहुतेकदा कॉपी - पेस्ट होतात किंवा मग हे संदेश अशा स्रोताकडून येतात जो मित्र वा नातेवाईकच असतो आणि अनेकदा या लोकांची वैद्यकीय पार्श्वभूमीही असते.
हे सगळे दावे पूर्णपणे खोटे आहेत.
कॉर्कच्या रुग्णांविषयीचे जे संदेश सध्या फिरत आहेत ते 'फेक' वा खोटे असल्याचं आयर्लंडच्या इन्फेक्शियस डिसीज सोसायटीने म्हटलंय. तुमच्याकडे अशाप्रकारचा संदेश आल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करावं वा ते डिलीट करावेत असं या सोसायटीने म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर सोशल मीडियावरून देण्यात येणारी माहिती अजिबात खरी नसल्याचं टॉलॉस विद्यापीठानेही म्हटलं आहे.
मग अशा परिस्थितीत कोरोना व्हायरस आणि ब्रुफेनबद्दल आपल्याला काय माहीत आहे?
उपलब्ध माहितीनुसार ब्रुफेन आणि कोरोना व्हायरसच्या संबंधाविषयी अद्याप कोणतंही संशोधन झालेलं नाही.
साऊदॅम्पटन विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल लिटील सांगतात, "श्वसनाशी संबंधित काही इतर संसर्ग आहेत. असं मानलं जातं की ब्रुफेनच्या वापरामुळे या लोकांसमोरच्या अडचणी आणि गांभीर्य वाढतं. सोबतच अधिक थकवा येऊ शकतो किंवा आजारपण येऊ शकतं. पण यासाठी फक्त ब्रुफेन जबाबदार असल्याचं ठामपणे म्हणता येणार नाही."
तप ब्रुफेनमधला अँटी-इन्फ्लमेटरी गुण शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती कम करत असल्याचं अनेक तज्ज्ञ मानतात.

फोटो स्रोत, Getty Images
युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या प्राध्यापक पारास्तो म्हणतात, "अशी अनेक संशोधन आहेत ज्यामध्ये म्हटलंय की श्वसनाशी संबंधित जर एखादा संसर्ग असेल आणि ब्रुफेनचा वापर केला केला तर परिस्थिती ढासळू शकते किंवा मग इतर अडचणी वाढू शकतात."
पुढे त्या म्हणतात, "मी अद्याप असा कोणताही वैज्ञानिक पुरावा पाहिलेला नाही जिथे एखाद्या 25 वर्षांच्या एकदम निरोगी व्यक्तीने कोरोना व्हायरसची लक्षण दिसायला लागल्यानंतर ब्रुफेन घेतली आणि यामुळे धोका वाढला."
अफवांमुळे वाढणारे गैरसमज
ब्रुफेनचा वापर करावा की नाही याविषयी सुरुवातीला काळजी निर्माण झाली. मग टॉलॉस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर जीन लुईस मॉन्टेसट्रस यांनी ट्विटरवर लोकांना सल्ला दिल्यानंतर याविषयी प्रतिक्रिया यायला लागल्या.
त्यांनी लिहिलं, "कोरोना व्हायरसच्या या काळात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ताप किंवा या संसर्गाची लक्षणं दिसत असतील तर मग एनएसएआयडी घेणं धोकादायक ठरू शकतं."

फोटो स्रोत, facebook
यानंतर फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिवर वेरन यांनी ट्विट केलं, "अँटीइन्फ्लमेटरी ड्रग्समुळे कदाचित हा संसर्ग इतका पसरला असावा" हे ट्वीट 43 हजारांपेक्षा जास्त वेळा री-ट्वीट करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर असं एखादं औषध घेत असाल तर ते बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही त्यांनी लिहिलं होतं.
याशिवाय याप्रकारची इतरही अनेक ट्वीट्स लोकांनी एकमेकांना टॅग करत शेअर केलेली आहेत. अशाच एका ट्वीटमध्ये लिहीलंय, "या व्हायरसच्या गंभीर प्रकरणांमागचं एक कारण ब्रुफेन असू शकतं. अगदी तरूण आणि मध्यमवयीन लोक ज्यांना याशिवाय कोणताही त्रास नव्हता, त्यामागेही हे कारण असू शकतं." हे ट्वीट 94 हजारांपेक्षा जास्तवेळा री-ट्वीट करण्यात आलंय.
या मुद्द्याविषयी वैद्यकीय व्यावसायिकांचं एकमत नाही. आणि म्हणूनच याविषयी इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती आणि अफवा पसरत आहेत.
कुटुंबामधल्या डॉक्टरद्वारे हा संदेश पाठवण्यात आल्याचा दावा करत ट्विटर आणि फेसबुकवर अनेक पोस्ट कॉपी - पेस्ट करण्यात आलेल्या आहेत. कोव्हिड १९मुळे मृत्यू झालेल्या बहुतेकांच्या शरीरात ब्रुफेनचे अंश सापडल्याची माहिती व्हिएन्नामधल्या प्रयोगशाळेतून मिळाल्याचंही काही पोस्टमध्ये म्हटलंय.
कोरोना व्हायरस ब्रुफेनमुळेच निर्माण होतो असंही अनेक पोस्ट्समध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण याविषयीची खरी माहिती अजून उपलब्ध नाही.
हीच ऑनलाईन अफवा जर्मन भाषेतही खूप फिरली. व्हॉईस मेसेज आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये ही गोष्ट शेअर करण्यात आली. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंविषयी व्हिएन्नाच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आलं आणि बळी पडलेल्या बहुतेकांनी ब्रुफेनचं सेवन केल्याचं आढळल्याचं या संदेशात एका महिलेचा दाखला देऊन सांगण्यात आलंय.
अशा प्रकारचे संदेश खूप व्हायरल झाले पण ते कोणत्या ठोस माहितीवर आधारित आहेत, याविषयीचे पुरावे उपलब्ध नाहीत. अफवांच्या बाबतीतला हा एक ठराविक पॅटर्न असल्याचं जर्मनीच्या अपॉनेटडॉट डे फार्मा न्यूज या वेबसाईटचं म्हणणं आहे.
रिपोर्टिंग - रेचल शेरियर, जॅक गुडमन आणि अॅलिस्टर कोलमन

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























