कोरोना व्हायरस : सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? त्याचे फायदे किती?

एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या शेकडो वर्षांमध्ये जे झालं नाही ते कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर होतंय. जगभरात आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या जात आहेत, उड्डाणं रद्द केली जात आहेत. क्रीडा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहेत आणि अगदी पार्थनास्थळंही बंद केली जात आहेत. पण त्याने नेमकं काय होणार?

कोरोना व्हायरसपासून होणारा कोव्हिड-19 हा आजार आता पँडेमिक जाहीर झाला आहे. अशा जागतिक संकटाच्या काळात आपण एकत्र येऊन लढायला हवं, असं जागतिक नेते सांगत आहेत. पण सध्या गरज आहे याला प्रत्यक्षात न घेण्याची, स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवण्याची.

तुम्हाला माहिती आहेच की कोरोना व्हायरस हा कोव्हिड-19 झालेल्या आजारी रुग्णाला शिंका आली किंवा ते खोकले तर त्यांच्या नाका-तोंडातून बाहेर पडून हवेत येतो. आता जर तुम्ही त्यांच्या आसपास असाल तर हा व्हायरस तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहेच. हा व्हायरस तुमच्या नाका-तोंडातून, डोळ्यातून तुमच्या शरीरात शिरतो. त्यामुळेच आपल्याला मास्क लावण्याच्या, आणि आपण सतत हात चेहऱ्याला लावत असतो म्हणून हात स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

पण हे सतत करणं शक्य नसल्यामुळे सध्या गरज आहे ती एकमेकांपासून दूर राहण्याची. याला social distancing (सोशल डिस्टन्सिंग) म्हटलं जातं. जर तुम्ही इंटरनेट दररोज वापरता, तर ही संज्ञा तुम्ही ऐकली-पाहिली असेलच.

सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनुसार सध्या कुठल्याही व्यक्तीपासून एक मीटर किंवा तीन फूट अंतरावर असणं सुरक्षित आहे. त्यामुळेच गर्दीची ठिकाणं जसं की बस, मेट्रो, लोकलमधून शक्यतो प्रवास करणं टाळा.

लग्न आणि प्रार्थना सभांसारखे सार्वजनिक कार्यक्रम त्यामुळेच रद्द होत आहेत. पण अशा संकटकाळात लोक देवाकडे जास्त जातात, हीच बाब लक्षात घेऊन सरकारने आता लोकांना धार्मिक स्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

पण यामुळे खरंच फरक पडेल का?

कोरोना
लाईन

चीनमधल्या वुहानमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस प्रथम आढळला, तेव्हा तो कळायला जरा वेळ लागला. कारण त्याची सुरुवातीची लक्षणं अगदी न्यूमोनियासारखी होती - म्हणजे सर्दी, कोरडा खोकला, ताप, अंगदुखी. पण हा आजार काही नवीन आहे, हे कळण्यापूर्वीच त्या पहिल्या रुग्णामधून हा आजार इतरांपर्यंत पोहोचला होता.

याला आणखी एक कारण म्हणजे, या आजाराची लक्षणं शरीरात दिसायलाही पाच दिवस लागतात, असं आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात हा व्हायरस असेलही, तरी तुम्हाला ते कळण्याच्या आत तुम्ही तो इतरांमध्ये पसरवण्याचं काम करत राहण्याची जास्त शक्यता आहे.

यामुळेच सध्या जे पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं जातंय. आणि जे संशयित रुग्ण आहेत, त्यांनाही क्वारंटाईन केलं जात आहे. त्याने कुठल्याही परिस्थितीत हा व्हायरस पसरणं आणि त्यापासून अधिक रुग्ण तयार होणं थांबवता येईल.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

कारण एकही रुग्ण जो पॉझिटिव्ह असेल, पण त्याला तपासणं शक्य झालं नसेल, तो जर बाहेर पडला तर त्याच्या जो जो संपर्कात आला असेल, तो एक नवा पेशंट म्हणून तयार होईल. आणि त्या नव्या पेशंटपासून आणखी नवे रुग्ण तयार होतील.

म्हणूनच गेल्या महिन्याभरात अख्खं चीन अक्षरशः बंद पडलंय. लोकांना लोकांनी स्वतःची संपूर्ण सोय करून घरांमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, आणि घरांमध्येच राहावं, अनावश्यक प्रवास आणि बाहेरील संपर्क टाळावा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

अगदी अमेरिकेपासून युनायटेड किंगडम ते आता भारतातही लोकांना सोशल डिस्टन्सिंग करायला सांगण्यात आलं आहे.

मग मी काय करावं?

Self isolation, म्हणजेच स्वतःला इतरांपासून जास्तीत जास्त वेगळं आणि अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 14 दिवस घरातच राहा. म्हणूनच महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स, जिम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

1. जर घरात एकटेच राहात असाल तर उत्तम, पण जर कुणाबरोबर राहणार असाल तर खात्री करून घ्या की ते आजारी नाहीत, किंवा त्यांच्यात कुठली आजारपणाची लक्षणं नाहीत. दारं-खिडक्या उघडी ठेवा.

2. तुम्हाला जर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याजवळ राहण्याची गरज असेल तर स्वतःचीसुद्धा काळजी घ्या. मास्क, हँड सॅनिटायझर सतत वापरत राहा आणि घर स्वच्छ ठेवा. घरातल्या डस्टबिनवर झाकणं लावा.

3. कपडे नियमितपणे धुवून वापरा. हस्तांदोलन किंवा मिठी मारणं टाळा, शारीरिक संपर्क कमीत कमी असायला हवा.

इटलीतले डॉक्टर

फोटो स्रोत, Getty Images

4. जर तुमच्या सोबतची कुणी व्यक्ती आजारी असेल तर त्यांचे टॉवेल, कंगवा इत्यादी वैयक्तिक उपयोगाचं सामान वापरू नका. बाथरूम वेगळं करणं शक्य नसेल तर त्यांच्या वापरानंतर ते स्वच्छ करून मग वापरा.

5. अनावश्यक प्रवास टाळा. अशा ठिकाणी जाणंच टाळा जिथे जास्त लोक असतील, म्हणूनच सरकारने मॉल्स, पब-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. होम डिलेव्हरीचा पर्याय जिथे उपलब्ध असेल तिथे निवडा.

6. शक्य असेल तर छोट्या दुकानांमधून अत्यावश्यक सामान खरेदी करा, जिथे जास्त गर्दी टाळता येईल. रांगांमध्ये उभे असाल तर इतरांपासून एक मीटरचं सुरक्षित अंतर ठेवा.

7. वर्क फ्रॉम होमचा पर्याय असेल तर नक्की तो स्वीकारा. जर नसेल शक्य तर कामकाजाच्या अशा वेळा आखून घ्या की सर्वांना सर्वच दिवस ऑफिसला जाण्याची गरज असणार नाही. कामाचे दिवस किंवा शिफ्ट वाटून घ्या जेणेकरून लोकांचा संपर्क कमीत कमी होईल.

यामुळे नेमकं काय होईल?

लोक जितके एकमेकांच्या संपर्कात असतील, तितका या विषाणूला पसरण्यास वाव मिळेल. त्यामुळे रुग्णांची संख्या सतत वाढतच जाईल. आणि आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडेल.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, EPA

लोक जितके एकमेकांपासून दूर असतील, तितकाच या विषाणूचा फैलाव कमी होत जाईल. यामुळे रोज हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येणाऱ्यांची, तिथे भरती होणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होईल. त्यामुळे जे अतिगंभीर आहेत किंवा ज्यांना उपाचाराची तातडीने गरज आहे, अशा रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची संधी डॉक्टरांना मिळेल.

त्यामुळे हळुहळू का होईना, रुग्णांवर उपचार करून मृतांचं प्रमाण कमी करता येईल. तसंच काही नव्या संशयित रुग्णांनाही तपासून वेळेपूर्वीच बरं करता येईल. यामुळे या रोगाच्या प्रसारावर आळा घालता येईल.

हे नक्की वाचा -

हे नक्की पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)