कोरोना व्हायरस: होमियोपॅथीमध्ये कोरोना आजारावर औषध आहे का?

होमिओपॅथी औषधं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अॅलिस्टर कोलमॅन
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे. त्याला आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेच.

मात्र त्यापूर्वीच सोशल मीडियावर घरगुती, आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी असे अनेक उपाय सुचवले जात आहेत. मात्र हे सल्ले अजूनही संशयास्पद आहेत.

यातच अॅलोपॅथीव्यतिरिक्त पर्यायी उपचार पद्धती आणि औषधांना चालना देणाऱ्या केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने एक स्पष्टीकरण दिलं आहे. होमियोपॅथीमध्ये कोरोनाच्या कोव्हिड-19 या विषाणूवर 'उपचार' असल्याचा दावा आपण कधीच केला नसल्याचं आयुष मंत्रालयाचं म्हणणं आहे.

केंद्र सरकारचं आयुष मंत्रालय आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचार पद्धती, युनानी आणि होमियोपॅथी यासारख्या पारंपरिक आणि पर्यायी उपचार पद्धतीला चालना देतं.

आयुष मंत्रालयाने याच वर्षी 29 जानेवारी रोजी एक प्रेस नोट जारी केली होती. त्यात कोरोना विषाणूंच्या लक्षणांवर उपचारासाठी होमियोपॅथीमध्ये औषध असल्याचं म्हटलं होतं.

आयुष मंत्रालयाने काय म्हटलं?

मंत्रालयाने 29 जानेवारी रोजी जारी केलेल्या प्रेस नोटचं शीर्षक होतं 'कोरोना विषाणू संसर्गाच्या लक्षणांना आळा घालण्यासाठी होमियोपॅथी, युनानी उपचार उपयोगी'.

कोरोना विषाणुपासून बचावासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यात म्हटलं होतं. तसंच संसर्गाच्या संक्रमणापासून बचावासाठी होमियोपॅथीमधील आर्सेनिकम एल्बम 30 हे औषध घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

होमियोपॅथीचा सिद्धांत सांगतो की मुबलक प्रमाणात पाण्यासह एखादा खाद्यपदार्थ व्यक्तीच्या पोटात गेल्यास त्याची 'मेमरी' शरीराची रोगप्रतिक्रियेची प्रक्रिया सुरू करू शकतो. आयुष मंत्रालयाने ज्या 30सी डायल्युशनचा उल्लेख केला होता त्यानुसार सामान्यपणे पोटात गेल्यावर आर्सेनिकमचे अणु शून्य होतील.

BBC
लाईन

आर्सेनिक ट्रायऑक्साईडला अधिक द्रवीभूत (डायल्युट) केल्यास आर्सेनिकम मिळतं. होमियोपॅथीमध्ये अनेक लक्षणांवर उपचारासाठी याचा वापर होतो.

30सी डायल्युशननंतर आर्सेनिकम मिळत असल्याने त्यामुळे त्यात आर्सेनिकचा मूळ अणू नसतो आणि म्हणूनच हा मुख्य प्रवाहानुसार सुरक्षित मात्र प्रभावहिन मानलं जातं.

मंत्रालयाने जारी केलेल्या या प्रेस नोटवर टीका झाल्यानंतर आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक गेल्या आठवड्यात म्हणाले होते की प्रेस नोट केवळ, "त्या औषधांची नावं जाहीर करतं जी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतात. हा दावा कधीच करण्यात आला नाही की या औषधामुळे कोरोना विषाणू समूळ नष्ट होतो."

'सर्वसाधारण संदर्भात' ही प्रेस नोट जारी केल्याचं आणि ती आजारावर उपचारासाठी नव्हती, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी सरकारतर्फे आणखी एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं, "प्रसार माध्यम आणि औषधोपचार संघटनांमध्ये आयुष मंत्रालयाची प्रतिमा मलीन करणाऱ्या काही बातम्या आल्या आहेत आणि या उपचार पद्धतींविषयी लोकांमध्ये अविश्वास पसरवतात."

प्रेस नोटमध्ये पुढे म्हटलं आहे, "मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या सूचना कोरोना विषाणुवर प्रभावी उपचाराचा दावा करत नाही आणि कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी एखाद्या विशिष्ट औषधंही सुचवत नाही."

आयुष मंत्री श्रीपाद नाईक

फोटो स्रोत, HTTP://AYUSH.GOV.IN

फोटो कॅप्शन, आयुष मंत्री श्रीपाद नाईक

मात्र, उशिरा देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणावर 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये टीका करण्यात आली. आधी जारी करण्यात आलेली प्रेस नोट 'अत्यंत बेजबाबदार होती', असं या वृत्तपत्राने म्हटलं.

वृत्तपत्राने म्हटलं, "स्वतःच औषध घेऊन स्वतःवर उपचार करण्याचा अर्थ होतो की संसर्ग झालेल्या व्यक्तीची माहिती कुणालाच मिळणार नाही आणि त्यामुळे ते विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होण्याची शक्यता बळावेल."

व्हॉट्सअॅपवर येणारे व्हायरल मेसेज

मात्र, मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊनही पहिल्या प्रेस नोटमधली अपुरी माहिती लोक मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पर्यायी औषधं कोरोनाच्या कोव्हिड-19 विषाणुला संपवू शकत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात येतोय.

या व्हायरल मेसेजेससंबंधी भारतीय फॅक्ट फाईंडिग वेबसाईट BOOM ने याच आठवड्यात म्हटलं आहे, "होमियोपॅथीमधील हे औषध कोव्हिड-19 या कोरोना विषाणुच्या फैलावाला आळा घालू शकते, याला शास्त्रीय आधार नाही."

बातमी

फोटो स्रोत, Abp

द लॉजिकल इंडियननेदेखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजेची पडताळणी केली. त्यात आढळलं की सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकणाऱ्या बहुतांश लोकांनी आयुष मंत्रालयाच्या प्रेस नोटचा चुकीचा अर्थ लावला.

द लॉजिकल इंडियनने म्हटलं आहे, "आर्सेनिकम एल्बम 30 या औषधाचा कोव्हीड-19 या कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी किंवा संसर्ग कमी करण्यासाठी कधीच परीक्षण झालेलं नाही आणि कुठल्याच चाचणीत तसं आढळलेलंही नाही."

असं असलं तरी गेल्या काही दिवसात होमियोपॅथी उपचारांची मागणी वाढल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने बातमी दिली होती की तेलंगणा राज्यात 3,500 लोकांना होमियोपॅथीच्या 11,500 गोळ्या देण्यात आल्या.

न्यूज मिनिट वेबसाईटशी बोलताना एक वैद्यकीय अधिकारी म्हणाले, "या गोळ्या केवळ कोरोना विषाणुसाठी नाही तर सर्वच प्रकराच्या इन्फ्लुएंजासाठी (सर्दी, खोकल्यासाठी) आहेत. एका विषाणूची ताकद दुसऱ्या विषाणुपेक्षा वेगळी असते आणि हे औषध आजारावर उपचार नाही तर केवळ प्रतिबंधासाठी आहे."

कोरोना विषाणू आणि त्यावरील उपचारांविषयी फारशी माहिती नसल्याने आणि लोकांमध्ये जागरुकता नसल्याने ते होमियोपॅथी उपचाराकडे वळत आहेत.

एका व्यक्तीने न्यूज मिनिटच्या प्रतिनिधीला सांगितलं, "कोरोना विषाणूविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत. आपण पूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तसंही लोक म्हणतात की याचे कुठलेच साईड इफेक्ट नाहीत."

आयुष मंत्रालयाची गरज का आहे?

आयुष मंत्रालय पारंपरिक भारतीय उपचार पद्धती आणि औषधांना चालना देण्याचं काम करते आणि त्यावर देखरेख ठेवते. यातल्या अनेक उपचार पद्धती आध्यात्मिक आस्थेवर आधारित आहेत.

मात्र, होमियोपॅथीची विशिष्ट उपचार शैली आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात याचा उगम झाला आणि पुढे भारतात ही उपचार पद्धती फार लोकप्रिय झाली.

चुकीच्या विज्ञानाला चालना देत असल्यावरून मंत्रालयावर टीका होते. इतकंच नाही तर हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाला खतपाणी दिलं जात असल्यावरूनही या मंत्रालयावर टीका केली जाते.

डॉक्टर

फोटो स्रोत, Reuters

भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मात्र 2019 साली वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकी वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने भारताचा प्राचीन इतिसाह जतन करण्याच्या मोहिमेत पारंपरिक उपचार पद्धती स्वीकारल्या आहेत आणि त्यांना चालनाही दिली आहे.

मात्र 2017 साली केंद्र सरकारनेच केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं की भारतातील 93% जनता शास्त्रीय उपचार पद्धतीचाच अवलंब करतात.

कोरोना विषाणू कोव्हिड-19 वर अजून औषध निघालेलं नाही आणि कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी लसही अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत अधिकची खबरदारी म्हणून लोक पर्यायी उपचार पद्धतींकडे वळत आहेत. मात्र, त्यामुळे होमियोपॅथीमध्ये कोरोनावर औषध आहे, असा याचा अर्थ मुळीच नाही.

मात्र कोरोना विषाणुवर उपचारांबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या केवळ भारतच नाही तर यूके, अमेरिका, घाना आणि इतरही राष्ट्रांमध्ये पसरवल्या जात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)