ICC Under -19 World Cup: भारत विरुद्ध बांगलादेश अंतिम सामना रंगणार

फोटो स्रोत, Getty Images
दमदार प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडिया U19 वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. अंतिम लढतीत टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेत हा सामना रंगणार आहे.
गतविजेत्या टीम इंडियाने चार वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं आहे दुसरीकडे बांगलादेश संघासमोर सर्वोच्च जेतेपदाची कमाई करण्याची पहिलीच संधी आहे.
श्रीलंकेविरुद्ध दमदार सलामी
टीम इंडियाने सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध 297 धावांची मजल मारली. यशस्वी जैस्वाल, प्रियम गर्ग आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतकी खेळी केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने श्रीलंकेचा डाव 207 धावांतच गुंडाळला. भारतातर्फे आकाश सिंग, सिद्धेश वीर, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
जपानचा धुव्वा
दुसऱ्या लढतीत टीम इंडियाने जपानचा 41 धावांतच खुर्दा उडवला. नवख्या जपानच्या एकाही बॅट्समनला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. रवी बिश्नोईने 8 ओव्हर्समध्ये 3 मेडनसह केवळ 5 रन्स देत 4 विकेट्स पटकावल्या. कार्तिक त्यागीने 3 तर आकाश सिंगने 2 विकेट्स घेत रवीला चांगली साथ दिली.
डकवर्थ लुईसची मदत; रवी बिश्नोई चमकला
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने डकवर्थ लुईस प्रणालीच्या बळावर बाजी मारली. भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना बिनबाद 115 अशी मजल मारली. यशस्वी जैस्वालने 57 तर दिव्यांश सक्सेनाने 52 धावांची खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडला 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र त्यांचा डाव 147 धावांतच आटोपला. रवी बिश्नोईने 4 तर अथर्व अंकोलेकरने 3 विकेट्स घेतल्या.
दमदार सांघिक प्रदर्शन
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 233 धावांची मजल मारली. यशस्वीने 62 तर सातव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या अथर्व अंकोलेकरने 55 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 159 धावांतच शरणागती पत्करली. फॅनिंगच्या 75 रन्सचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
कार्तिक त्यागीने 4 तर आकाश सिंगने 3 विकेट्स घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली.
पाकिस्तानवर 'यशस्वी' मात
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या बॉलर्सनी भेदक बॉलिंग केली. यामुळे पाकिस्तानचा डाव 172 धावांतच आटोपला. पाकिस्तानचा कर्णधार रोहैल नझीरने 62 तर हैदर अलीने 56 धावांची खेळी केली. या दोघांना अन्य बॅट्समनची साथ मिळाली नाही. भारतातर्फे सुशांत मिश्राने 3 तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्युत्तरादाखल खेळताना यशस्वी जैस्वालच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. त्याने 8 फोर आणि 4 सिक्सेससह नाबाद 105 धावांची खेळी केली. दिव्यांश सक्सेनाने 6 फोरसह 59 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली.
बांगलादेशची आगेकूच
दुसरीकडे बांगलादेशची स्पर्धेतली वाटचालही स्वप्नवत अशी झाली आहे. बांगलादेशने सलामीच्या लढतीत झिम्बाब्वेला 137 धावांतच रोखलं. परवेझ हौसेन इमॉनने 58 तर महम्मदुल हसन जॉयने 38 धावांची खेळी केली.
दुसऱ्या लढतीत बांगलादेशने स्कॉटलंडला 89 धावांतच गुंडाळलं. रकीबुल हसनने 4 तर शोरीफुल इस्लाम आणि तन्झीम हसन साकीब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची थोडी पडझड झाली मात्र महमदुल हसन जॉयने 35 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 261 धावांची मजल मारली. तांझीद हसनने 80 तर तौहीद हृदोयने 51 तर शाहदत हुसैनने 74 धावांची खेळी केली.
घरच्या मैदानावर खेळत असूनही दक्षिण आफ्रिकेचा डाव 157 धावांतच आटोपला. रकीबुल हसनने 19 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
सेमी फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीत न्यूझीलंडने 211 धावांची मजल मारली. बी. व्हीलर ग्रीनालने 75 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शोरीफुल इस्लामने 3 तर शमीम हुसैन आणि हसन मुराद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना महमदुल हसन जॉयने 100 धावांची खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. तौहीद हिदोय आणि शहादत हुसैन यांनी प्रत्येकी 40 धावा करत महमदुलला चांगली साथ दिली.
भारत-बांगलादेश समोरासमोर
भारत आणि बांगलादेश U19 वर्ल्ड कप स्पर्धेत चारवेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 3 तर बांगलादेशने एक लढत जिंकली आहे. आकडेवारीच्या तुलनेत भारताचं पारडं जड आहे मात्र बांगलादेशचा संघ यंदाच्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
इतिहास टीम इंडियाच्या बाजूने
टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं आहे. बांगलादेशने आतापर्यंत एकदाही विश्वविजेतेपदावर नाव कोरलेलं नाही. जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे तर पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी बांगलादेशचा संघ उत्सुक आहे.
भारतीय संघ
प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, दिव्यांश सक्सेना, ध्रुव जोरेल, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, रवी बिश्नोई, शुभांग हेगडे, कुमार कुशाग्रा, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, शाश्वत रावत, टिळक वर्मा
बांगलादेश संघ
अकबर अली (कर्णधार), अविशेक दास, हसन मुराद, महमदुल हसन जॉय, एसएम मेहरोब, परवेझ होसेन इमॉन, प्रांतिक नवरोस नबील, रकीबुल हसन, शहादत होसेन, शाहीन अलम, शमीम हुसैन, शोरीफुल इस्लाम, तांझीद हसन, तांझिम हसन सकीब, तौहीद हिदोय.
ठिकाण
सेन्वेस पार्क, पॉचसेफ्ट्सरुम
वेळ
दुपारी 1.30 पासून स्टार स्पोर्ट्सवर

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त























