इराण विमान अपघात: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो - इराणच्या क्षेपणास्त्राने घेतला विमानाचा वेध

फोटो स्रोत, AFP
इराणच्या क्षेपणास्त्राने युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याचे पुरावे असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह पाश्चिमात्य जगातातील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे.
बुधवारी इराणने इराकमधल्या अमेरिकेच्या दोन सैन्यतळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यानंतर लगेच हा विमान अपघात झाला होता. यात सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
कॅनडा आणि ब्रिटेनच्या नेत्यांनी या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. इराणने मात्र आपण असा कुठलाही हल्ला केला नसल्याचं म्हटलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही गुरुवारी विमान अपघाताविषयी शंका व्यक्त केली होती.
दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला किंवा विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीला सुपूर्द करण्याला इराणने नकार दिला होता. मात्र, तपासात सहभागी होण्यासाठी इराणने बोईंगला आमंत्रण दिलं आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्याविषयी काय म्हणत आहेत नेते?
अनेक सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे युक्रेनचं प्रवासी विमान इराणच्या भूमीतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने कोसळल्याचे संकेत मिळत असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "कॅनडाच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं मिळायला हवी."
असं असलं तरी आत्ताच कुणावर दोषारोप करणं किंवा कुठल्याही निर्णयापर्यंत येणं योग्य नाही, असंही ट्रुडो यांचं म्हणणं आहे.
या अपघातग्रस्त विमानात कॅनडाचे 63 नागरिक होते.

फोटो स्रोत, AFP
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ट्रुडो यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. याविषयावर ब्रिटन आणि कॅनडा एकत्र मिळून काम करतील, असंही ते म्हणाले.
दरम्यान, युक्रेनचं विमान इराणच्या क्षेपणास्त्राने पाडल्याची माहिती आणि इराणमधली संघर्षाची परिस्थिती बघता ब्रिटिश नागरिकांना इराणमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती यूकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडामध्ये दिली आहे.
हे प्रवासी विमान अमेरिकेचं युद्धविमान असल्याचा समज झाल्याने इराणने त्यावर हल्ला केला असावा, असा अंदाज अमेरिकेच्या प्रसार माध्यमांनी व्यक्त केला आहे.
सीबीएस न्यूजने अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे की क्षेपणास्त्र हल्ल्याचे दोन इन्फ्रारेड फ्लॅश उपग्रहाने टिपले होते. त्यानंतर एका क्रॅशचा फ्लॅशही नोंदवण्यात आला होता.

फोटो स्रोत, EPA
तर न्यूजवीकने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनचं विमान रशियन बनावटीच्या टोर या क्षेपणास्त्राने पाडलं असावं, असा आपला अंदाज असल्याचं पेंटागॉन, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि इराकी गुप्तचर संस्थेचे वरिष्ठ अधिकारी यांचं म्हणणं आहे.
ती घटना अपघात असल्याचं पेंटागॉनच्या दोन अधिकाऱ्यांनी म्हटल्याचंही न्यूजवीकने म्हटलं आहे. पेंटॅगॉनने मात्र अजून कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
विमान कशामुळे कोसळलं असावं, असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना विचारला असता ते म्हणाले, "मला शंका आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने काहीतरी चूक झाली असण्याची शक्यता आहे."
गुरुवारी युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षण समितीच्या सचिवांनी फेसबुक पोस्ट करत विमान अपघाताच्या इतर तीन शक्यतांवरही विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं.
- हवेत ड्रोन किंवा इतर उडणाऱ्या उपकरणाशी धडक
- तांत्रिक कारणामुळे इंजिनात बिघाड
- दहशतवाद्यांनी विमानाच्या आतच स्फोट घडवून आणला
युक्रेनने विमान अपघातच्या तपासात बिनशर्त समर्थन देण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात युक्रेन क्षेपणास्त्राच्या धडकेने विमान कोसळलं का, या दिशेने तपास करत होता. मात्र त्यावेळी इराणने ही शक्यता फेटाळून लावली होती.
इराणचं म्हणणं काय आहे?
इराणच्या सीव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख अली अॅबेदझाहेद म्हणाले, "विमानतळ झोन सोडण्यासाठी विमान पश्चिम दिशेला झेपावलं होतं. मात्र, बिघाडानंतर ते पूर्वेकडे वळलं आणि क्रॅश झालं त्या क्षणी ते पुन्हा विमानतळाच्या दिशेने गेलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
प्रत्यक्षदर्शींनी कोसळण्यापूर्वी विमानाला आग लागल्याचं बघितलं. तसंच विमानतळाकडे परत येताना वैमानिकाने कुठलाही इमरजेंसी कॉल केलेला नव्हता, असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "क्षेपणास्त्राने विमानाला धडक दिली आणि ते कोसळलं हे शास्त्रीयदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे अशा अफवा अतार्किक आहेत."
विमान अपघाताचा तपास कोण करतंय?
जागतिक हवाई नियमांतर्गत या दुर्घटनेच्या चौकशीचं नेतृत्व करण्याचा अधिकार इराणला आहे.
मात्र, अशा तपासामध्ये विमान बनवणारी कंपनी साहाजिक सहभागी होत असते. शिवाय ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या मोजक्या देशांकडेच असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
अमेरिकेत बनवलेल्या बोईंग विमानाचा जगभरात कुठेही अपघात झाल्यास त्या चौकशीत अमेरिकेची नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ही संस्था सहभागी होत असते. मात्र, त्यासाठी संबंधित देशाची परवानगी बंधनकारक असते.
इराणने सुरुवातीला तपासाची कुठलीही माहिती अमेरिकेला द्यायला नकार दिला होता.
मात्र, गुरुवारी इराणच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनला सांगितलं की त्यांनी तपासात सहभागी होण्यासाठी NTSB ला बोलावलं आहे. तसंच अमेरिकेनेही तपास अधिकारी नेमायला संमती दर्शवली आहे.
'ही गंभीर चूक असू शकतो'
ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यावरून युक्रेनचं फ्लाईट PS752 हे विमान इराणच्या हवाई दलाने चुकीने पाडलं असण्याची शक्यता आहे, असं बीबीसीचे संरक्षण प्रतिनिधी जोनाथन मार्कस यांचं म्हणणं आहे.
ते पुढे म्हणतात, "युद्धक्षेत्रात (conflict zone) हवाई सुरक्षा दलाकडून एखादं विमान पाडणं नवीन नाही. मात्र, ही घटना एक घोडचूक असू शकते."
"हे विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नुकतच निघालं होतं आणि ही फ्लाईट शेड्युल्ड होती. त्यामुळे हे प्रवासी विमान आहे, हे सहज ओळखता येण्यासारखं होतं."

फोटो स्रोत, AFP
"असं असताना सोव्हिएत कालीन रशियन बनावटीचं टोर किंवा SA-15 या नावाने ओळखलं जाणारं हे क्षेपणास्त्र डागणाऱ्याला काय वाटलं असावं, हे अजून कळलेलं नाही."
जोनाथन पुढे सांगतात की इराणसाठी ही खूप लाजीरवाणी बाब आहे आणि यामुळे घटनेच्या मुळाशी जाताना आड येणारं राजकारण अधिकाधिक क्लिष्ट होत जाणार आहे.
युक्रेन आणि इराण दोघांनीही मिळून हा तपास करायला हवा, असं मतही मार्कस यांनी व्यक्त केलं आहे.
विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्याचं तंत्रज्ञान जगातल्या काही मोजक्याच देशांकडे आहे. त्यामुळे युक्रेनच्या अपघातग्रस्त विमानाच्या डेटा रेकॉर्डर किंवा ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करण्यासाठी तिसऱ्या राष्ट्राची गरज भासू शकते, असंही ते सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

























