न्यूझीलंड ज्वालामुखी: व्हाईट आयलंडवरील घटनेनंतर पर्यटकांचा शोध सुरूच

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - व्हाईट आयलंड ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या 30 मिनिटांपूर्वी तो तिथे होता...
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर व्हाईट आयलंडवर कुणी जिवंत असेल, अशी काहीच चिन्हं दिसत नसल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन म्हणाल्या.

आता केवळ मृतदेह बाहेर काढून ते मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं, यावरच लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्वालामुखी

फोटो स्रोत, Michale Schade / Twitter

व्हाईट आयलंडवर सोमवारी म्हणजे 9 नोव्हेंबरला ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नेमकं त्याचवेळी काही पर्यटक ज्वालामुखीचा हा भाग पाहण्यास आले होते. या उद्रेकात 13 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.

मात्र, आतापर्यंत केवळ पाच जणांचे मृतदेह सापडलेत तर आठ जण अजूनही बेपत्ता आहेत.

34 लोक या उद्रेकातून बचावले असून, 31 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन

व्हाईट आयलंडवर गेलेले पर्यटक न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया, अमेरिका आणि यूकेमधील होते, अशी माहिती पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दिली.

लष्कराचं विमान घटनास्थळापर्यंत पोहोचलं, मात्र तिथं कुणी जिवंत असल्याची चिन्हं दिसली नाहीत.

"माझ्या माहितीप्रमाणे, लष्कराच्या हेलिकॉप्टर पायलटनं केवळ आकाशातून पाहणी करण्याऐवजी स्वत: त्या आयलंडवर फिरला. तिथून परतल्यावर त्यान दिलेल्या माहितीनुसार दुर्दैवानं तिथं कुणीही जिवंत असल्याचे चिन्ह नव्हते," असंही आर्डन म्हणाल्या.

व्हाईट आयलंडवर कोण कोण होतं?

या आयलंडवर स्थानिकांसह विविध देशांमधून आलेले पर्यटकही होते. स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यावेळी व्हाईट आयलंडवर एकूण 47 लोक होते.

या उद्रेकानंतर ज्यावेळी बचावकार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणा तिथं पोहोचल्या, तेव्हा ज्या पहिल्या व्यक्तीची ओळख पटली ती टूर गाईड होती. हेडन मार्शल-इन्मान असं त्याचं नाव. जवळच्याच व्हॅकेटिन नामक शहरातील हेडन होते.

दुसऱ्या टूर गाईडचं नाव टिपीन मांगी असं असून, तो 24 वर्षीय आहे. तोही कुटुंबासोबत बेपत्ता आहे. या उद्रेकात जखमी झालेल्या दोन ब्रिटिश महिला सध्या उपचार घेत आहेत, असं न्यूझीलंडमधील यूकेच्या राजदूत लौरा क्लार्क यांनी सांगितलं.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, उद्रेकात मृत्युमुखी पडलेल्या 5 जणांपैकी तिघेजण ऑस्ट्रेलियाचे नागरिक होते.

व्हाईट आयलंड

फोटो स्रोत, AFP

आयलंडवर जाणाऱ्या क्रूझमध्ये 24 ऑस्ट्रेलियन नागरिक होते. त्यापैकी 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, 11 जणांची अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती मॉरिसन यांनी दिली.

अत्यंत भयंकर दुर्घटना आहे. या उद्रेकानं निष्पापपणा आणि आनंद हिरावून घेतला, असंही मॉरिसन म्हणाले.

उद्रेकात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियन नागरिकांची संख्या जास्त असल्याचं ऑर्डर्न यांनीही म्हटलं.

ज्वालामुखीत नेमकं झालं काय?

व्हाईट आयलंडला व्हाकारीही म्हटलं जातं. न्यूझीलंडमधील सर्वात सक्रीय ज्वालामुखी इथंच आहेत. इथं असलेल्या खासगी आयलंडवर नेहमी पर्यटकांच्या सहली येत असतात. इथून उत्तमोत्तम फ्लाईट्सही उपलब्ध आहेत.

सोमावारी दुपारी दोन वाजून 11 मिनिटांच्या दरम्यान (01:11 GMT) ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

नकाशा

आर्डन यांच्या माहितीनुसार, उद्रेकावेळी आयलंडवर पर्यटकांचे दोन गट होते. एका गटाला वाचवण्यात यश आलं, मात्र दुसरं उद्रेकाच्या घटनास्थळापासून अगदी जवळ होतं.

ज्वालामुखीचं उद्रेक झाल्यानंतर बोटीच्या मदतीनं तातडीनं काही जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. मात्र, पर्वतरांगांमधील बचावकार्य कायमच अवघड असतं असं पोलीस सांगतात.

मात्र, त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीनं काही जणांना वाचवलं गेलं. आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलट आणि क्रूचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डन यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)