थायलंड: न्यायाधीशांनी 5 जणांना निर्दोष सोडलं नि स्वतःवर गोळी झाडली

कायदा

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

हत्या आणि अवैधरीत्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांविरुद्धचा खटला त्यांच्या न्यायालयात आला. सुनावणी, वाद-प्रतिवाद झाले आणि अखेर पाचही आरोपींची निर्दोष झाली.

मात्र या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश देशाच्या अशा न्यायप्रक्रियेमुळे विचलीत झाले. देशाला पारदर्शी न्यायव्यवस्थेची गरज आहे, असं सांगत त्यांनी कायद्याची शपथ घेतली, मग खिशातून बंदूक काढली आणि स्वतःच्या छातीवर एक गोळी झाडली!

ही नाट्यमय घटना घडली थायलंडमध्ये. कानाकॉर्न पियानचाना असं या न्यायाधीशांचं नाव आहे.

या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात आपला निर्णय देण्यापूर्वी न्यायाधीश पियानचाना यांनी जे निवेदन लिहिलं होतं, त्यावरून त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न संबंधित प्रकरणातील हस्तक्षेपामुळे असू शकतो, अशी चिन्हं आहेत.

न्यायालयात काय घडलं?

बंडखोरीने ग्रासलेल्या दक्षिण थायलंडमधील याला कोर्टात पियानचाना काम पाहातात. इथं त्यांनी शुक्रवारी पाच मुस्लीम व्यक्तींना खून तसंच अवैधरीत्या शस्त्र बाळगण्याप्रकरणी दोषमुक्त केलं. यानंतर त्यांनी सुरू असलेल्या फेसबुक लाईव्ह सुरू करून उपस्थितांसमोर एक गंभीर भाषण केलं.

"एखाद्याला शिक्षा देण्यासाठी तुमच्याकडे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे असले पाहिजेत. तुम्हाला पुराव्यांबाबत खात्री नसेल तर संशयितांना शिक्षा करू नका," असं पियानचाना म्हणाले.

न्यायाधीश पुढे म्हणाले, "याचा अर्थ या पाच जणांनी गुन्हा केला नाही, असं मी म्हणत नाही. त्यांनी गुन्हा केलेलाही असू शकतो. पण न्यायालयीन प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासपूर्ण पद्धतीने झाली पाहिजे. चुकीच्या व्यक्तींना शिक्षा देणं म्हणजे त्यांना बळीचा बकरा बनवण्यासारखं आहे."

यानंतर फेसबुक लाईव्हशी त्यांचा संपर्क तुटला. पण न्यायालयात उपस्थित असलेल्यांनी पुढचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर फेसबुक लाईव्ह बंद झाल्यानंतर न्यायाधीश पियानचाना यांनी थायलंडच्या पूर्वाश्रमीच्या राजांच्या तैलचित्रासमोर कायद्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपली बंदूक बाहेर काढून स्वतःवर गोळी झाडली.

जखमी पियानचाना यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार करण्यात आले. आता त्यांच्या जीवाला धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांनी असं का केलं?

न्यायाधीश पियानचाना यांनी जीव देण्याचा निर्णय का घेतला, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

"वैयक्तिक ताणतणावातून" पियानचाना यांनी स्वतःवर गोळी झाडली, असा दावा न्यायालयाचे प्रवक्ते सुरियान होंगविलाई यांनी AFP न्यूजसोबत बोलताना केला आहे.

पण स्थानिक माध्यमांतील बातम्यांनुसार, त्यांनी नुकताच निर्णय दिलेल्या खटल्याचा या घटनेशी संबंध असू शकतो.

थायलंड

संशयितांना ठोस पुराव्यांशिवाय दोषी सिद्ध करण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचं एका निवेदनात त्यांनी म्हटल्यांचं सांगितलं जात आहे. त्यांनी हे निवेदन फेसबुकवर पोस्ट केलं होतं..

"सध्या मला जी वागणूक दिली जात आहे, तसंच देशभरात सगळ्याच न्यायाधीशांना वागवलं जात आहे. जर माझं वचन मी पाळू शकत नसेन, तर मी सन्मानानं मरणं पसंत करेन," असं त्यांनी लिहिलं आहे.

न्यायव्यवस्थेवर टीका होण्याचा हा थायलंडमधला एक अत्यंत दुर्मिळ प्रसंग आहे. या मलाय-मुस्लीमबहुल प्रदेशात तैनात सैन्य मुस्लिमांवरील आरोप वाढवून सांगतात, असा आरोप काही मानवी हक्क संघटना करतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)