You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅलिफोर्निया भूकंपः 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यामुळे पडझड
कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागामध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के आज जाणवले. कॅलिफोर्नियातील गेल्या 20 वर्षांमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे.
रिजरक्रेस्ट या शहराजवळ जमिनीपासून केवळ 900 मीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. हे केंद्र लॉस एंजल्सपासून ईशान्येस 240 किमी अंतरावर आहे.
भूकंपशास्त्रज्ञा डॉ. ल्युसी जोन्स यांच्यामते, "या भूकंपाचे धक्के आणखी काही काळ जाणवत राहतील. ही भूकंपाच्या धक्क्यांची मालिका आहे", असं त्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या. "अशा प्रकारचा किंवा याहून अधिक तीव्रतेचा भूकंप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचेही" डॉ. ल्युसी यांनी सांगितले.
भूकंपानंतर काही ठिकाणी आग लागण्याची घटना घडली असून आपत्कालीन व्यवस्था मदतीसाठी कार्यरत झाल्या आहेत.
रिजरक्रेस्टचे महापौर पेगी ब्रिडेन रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "काही ठिकाणी आग लागल्याचे, गॅसगळती झाल्याचे तसेच लोक जखमी झाल्याचे समजत आहे. लोकांना आम्ही शक्य तितकी मदत करत आहोत."
आतापर्यंत कोणीही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही असे पोलीसप्रमुख जेड मॅकलॉइन यांनी सांगितले. मात्र नक्की किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.
भूकंपबाधित लोकांना आपण मदत करणार आहोत असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसोम यांनी सांगितले. त्यांनी संघराज्य सरकारडून मदतीसाठी विनंतीही केली आहे.
स्थानिक रहिवासी जेरेमी जोन्स लॉस एंजल्स टाइम्सशी बोलताना म्हणाले, हा धक्का अत्यंत वाईट होता आणि अजूनही धक्के थांबलेले नाहीत. गुरुवारी झालेल्या भूकंपामुळे काही घरांना तडे गेले आहेत.
या भूकंपामुळे कोणीही गंभीर जखमी किंवा कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे लॉस एंजल्स अग्निशमन विभागाने सांगितले. शहराचे निरीक्षण केल्यानंतर कोणतीही मोठी पडझड झाली नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे.
भूकंपानंतर लॉस एजंल्स येथे सुरू असलेली बेसबॉल मॅच पाहाणारे लोक आपली जागा सोडून जाऊ लागले मात्र बेलबॉल खेळाडू मात्र खेळतच राहिले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)