फ्रान्समध्ये इंधनदरवाढीवरून आणीबाणीची शक्यता, राष्ट्राध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक

फोटो स्रोत, EPA
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इंधन दरवाढीविरोधात होणाऱ्या निदर्शनासंदर्भात आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
सुरुवातीच्या काही बातम्यांनुसार फ्रान्समध्ये आणीबाणी लागू होईल अशा प्रकारच्या चर्चा होत्या. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसला तरी आणीबाणी लागू करण्याबाबतही चर्चा झाली नाही असं फ्रान्समधील मंत्र्यांनी सांगितलं.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग आहे त्यांची अजिबात गय केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं फ्रान्सचे न्यायमंत्री निकोल बेलुबोट यांनी सांगितलं.
रविवारी घेतलेल्या बैठकीआधी मॅक्रॉन यांनी परिस्थितीचं अवलोकन केलं. पॅरिसमध्ये झालेल्या निदर्शनात 100 लोक जखमी झाले आहेत. त्यात सुरक्षादलातील 23 लोकांचा समावेश असून आतापर्यंत 400 लोकांना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty Images
मॅक्रॉन यांनी चँप्स एलियस आणि आर्क दे ट्रायम्फ या भागांना भेट दिली. या दोन्ही भागात निदर्शनांची तीव्रता सगळ्यांत जास्त होती.
त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी एक आपत्कालीन बैठक घेतली. त्यात गृहमंत्री आणि सुरक्षा दलातील उच्चाधिकाऱ्यांचा समावेश होता.
सरकारचे प्रवक्ते बेंजामिन ग्रिवॉक्स यांनी युरोप 1 रेडिओशी बोलताना सांगितलं की आणीबाणी लादणं हा एक पर्याय असू शकतो. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.
फ्रान्समध्ये डिझेलच्या किंमती गेल्या 12 महिन्यात 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. मात्र फ्रान्समध्ये किंमती कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत त्यामुळे लोकांचा सरकारवर रोष आहे.
आंदोलकांच्या रोषाचं कारण काय?
फ्रान्समध्ये डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या साधारण दर 1.51 युरो प्रतिलीटर म्हणजे अंदाजे 121 भारतीय रुपये एवढा असून, हा दरातला उच्चांक यापूर्वी 2000च्या आसपास होता.
जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या, त्यानंतर कमीसुद्धा झाल्या. मात्र मॅक्रॉन सरकारने यावर्षी डिजेलवरील हायड्रोकार्बन टॅक्स प्रतिलिटर 7.6 सेंट्सने (100 सेंट्स = 1 युरो) वाढवला आहे. तसंच पेट्रोलवर ही वाढ प्रतिलीटर 3.9सेंट्सनी झाली आहे.
पण या सगळ्या प्रकरणात खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा सरकारने सध्या असलेल्या दरांवर आणखी 6.5 सेंट्स प्रतिलीटर (डिजेल) कर आणि 2.9 सेंट्स प्रतिलीटर (पेट्रोल) कर लादण्याची घोषणा केली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इंधनवाढीसाठी जागतिक पातळीवरील तेलाच्या किमतींना दोषी ठरवले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी निगडित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी खनिज तेलांवर जास्त कर लावावा लागेल, असं मॅक्रॉन म्हणाले आहेत.
Yellow Vest म्हणजे काय?
एखादी कार कुठे खराब झाली तर ड्रायव्हरने भडक पिवळ्या रंगाचं बनियनसदृश जॅकेट घालून ती दुरुस्त करणं फ्रान्समध्ये बंधनकारक आहे. कार खराब झाल्यावर रस्त्याच्या बाजूला एक रिफ्लेक्टर त्रिकोण ठेवावा लागतोच, पण त्याबरोबर हे पिवळं जॅकेटसुद्धा घालावं लागतं, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.
हेच पिवळं जॅकेट किंवा वेस्ट या आंदोलनाचं प्रतीक बनलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)























