राणी एलिझाबेथ यांची नात म्हणते, 'लग्नाच्या दिवशी मला पाठीवरची जखम लपवायची नव्हती'

फोटो स्रोत, PA
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांची नात युजिनी हिचा विवाह जॅक ब्रुक्सबँक यांच्याशी नुकताच थाटात संपन्न झाला. राणी एलिझाबेथ यांचा दुसरा मुलगा अॅण्ड्र्यू - ड्यूक ऑफ यॉर्क यांची युजिनी ही दुसरी मुलगी.
विंडसर कॅसल इथल्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात लक्षवेधी ठरला तो युजिनी हिचा गाऊन. शाही विवाहसोहळ्यांतील वधूंच्या गाऊनपेक्षा या गाऊनमध्ये असं काय विशेष होतं, ज्याची इतकी चर्चा व्हावी?
युजिनी हिच्या पाठीवर लहानपणी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. हा शस्त्रक्रियेचा व्रण गाऊनमधून स्पष्ट दिसत होता. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेचा व्रण स्पष्ट दिसेल अशाच गाऊनची निवड युजिनीनेच केली होती.
ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्यांत वधूंनी परिधान केलेले गाऊन नेहमीच चर्चेत असतात. गाऊनचा कलर पांढरा आहे की आयव्हरी, ए-लाईन आहे की मेरमेड, लाँग आहे की शॉर्ट अशा विविध गोष्टींची चर्चा सुरू असते. पण युजिनीचा गाऊन मात्र वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला.
युजिनी जेव्हा 12 वर्षांची होती, तेव्हा तिच्या पाठीच्या कण्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. स्कोलिओसिसवर उपचार करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
काही जणांच्या पाठीच्या कण्याला बाक आलेला असतो, याला स्कोलिओसिस म्हटलं जात.
या आजारातून बरं होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि ज्यांना ही आजार आहे, त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी युजिनीनं लग्नाचा गाऊन निवडताना पाठीवरील शस्त्रक्रियेचा व्रण दिसेल, असाच गाऊन निवडला.
'सौंदर्याची व्याख्या बदलायची आहे'
विवाह समारंभापूर्वी बोलताना युजिनी हिने लोकांनी व्रण दाखवणे आवश्यक आहेत, असं मत व्यक्त केलं. याच वर्षी युजिनीने तिच्या या आजाराचा काढलेला एक्सरेही जाहीरपणे दाखवला होता.

फोटो स्रोत, EPA
आयटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "12 वर्षांची असताना माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. लग्नावेळी तुम्ही हा व्रण पाहू शकाल. मला वाटतं ज्या लोकांनी माझी काळजी घेतली, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि ज्यांना असा आजार आहे, त्यांच्या बाजूने उभे राहाण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे."
"सौंदर्याची व्याख्या बदलू शकेल, असं मला वाटतं. तुम्हाला झालेल्या जखमांचे व्रण तुम्ही दाखवू शकता," असं मला वाटतं.
स्कोलिऑसिस म्हणजे काय?
स्कोलिऑसिसमध्ये पाठीच्या कण्याला एका बाजूने बाक आलेला असतो. त्यामुळे पाठ गोलाकार दिसते आणि खांद्याची हाडं बाहेर येतात.
10 ते 15 वर्षांच्या मुलांत ही व्याधी उद्भवू शकते. याचं नेमकं कारण मात्र महिती नाही.
मूल आईच्या पोटात असतानाच हाडांची वाढ नीट झाली नसेल तर ही तसंच सेरेब्रल प्लासीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

फोटो स्रोत, REX/SHUTTERSTOCK
द स्कोलिऑसिस असोसिएशन, यूके यांनी, हा आजार असणाऱ्या 6 रुग्णांपैकी 5 मुली असल्याचं म्हटलं आहे. पण या मागे काय कारण आहेत, ते समजू शकलेलं नाही.
युजिनी यांच्यावर रॉयल नॅशनल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेची आठवण आजही मनात ताजी असल्याचं ती सांगते.
"ही शस्त्रक्रिया 8 तास चालली होती. हा शस्त्रक्रियेसाठी पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंनी रॉड बसवण्यात आले होते. मानेत दीड इंचाचा स्क्रू बसवण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर मी 3 दिवस आयसीयूमध्ये, एक आठवडा वॉर्डमध्ये आणि 6 दिवस व्हीलचेअरवर होते. त्यानंतर मी पुन्हा चालू शकले," असं त्यांनी या हॉस्पिटलच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
'मला वाटलं होते मी व्हीलचेअरवरच राहीन'
शिक्षिका कॅमिला सेकिन यांची अशीच शस्त्रक्रिया याच हॉस्पिटलमध्ये झाली आहे.
"माझ्या पाठीच्या कण्याला 72 अंशाचा बाक होता. वयाच्या 30व्या वर्षांपर्यंत मी पूर्णपणे व्हीलचेअरवर जाईन, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ही शस्त्रक्रिया करताना मी फार घाबरले होते," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, PA
युजिनी इतरांसाठी प्रेरणादायी
युजिनी यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील मणक्यावरील तज्ज्ञ डॉ. जॅन लेहोव्हस्की म्हणाले, "हा आजार सर्वसाधारणपणे शाळेत जाणाऱ्या मुलींना होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांसाठी युजिनी प्रेरणादायी ठरेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
























