इर्शाळवाडी दुर्घटना : अखेर चौथ्या दिवशी थांबलं बचावकार्य, मृतांची संख्या 27 वर

इर्शाळवाडी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना बुधवारी (19 जुलै) रात्री उशीरा घडली होती.

बुधवारी रात्री दरड कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलैपासून वाडीत बचावकार्य सुरू झालं होतं. ते आज चौथ्या दिवशी (23 जुलै) सायंकाळी 6 वाजता थांबवण्यात आल्याचं, पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.

दुर्घटनेनंतर येथील दुर्गम भौगोलिक स्थिती अंधार आणि निसरडा रस्ता यांच्यामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे आले. पण तरीही बचावकार्य वेगाने सुरू होतं.

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून शनिवार (22 जुलै) सायंकाळी 7 वाजता एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

यानुसार, इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अंदाजे 78 जण अजूनही बेपत्ता असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. या घटनेत एकूण 22 जण जखमी झाले असून ते जवळच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

इर्शाळवाडीमध्ये एकूण 43 कुटुंबं राहत होती. त्यांची एकूण लोकसंख्या ही 229 इतकी होती. त्यापैकी 27 जण मृत्यूमुखी पडले असून 124 जण सुखरूप आहेत.

तर 78 जण अद्याप बेपत्ता असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

इर्शाळवाडी

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधित व्यक्तींची संख्या अंतिम करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर एकूण लोकसंख्या, कुटुंबसंख्या, घरे, जनावरे, मयत आणि बेपत्ता व्यक्ती यांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेतून वाचलेल्या दरडग्रस्तांना सध्या पंचायतन मंदिर नढाळ येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय वाडीतील 31 विद्यार्थी विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. तसंच नातेवाईकांकडे काही कारणानिमित्त गेलेल्या 16 जणांचेही या दुर्घटनेतून प्राण वाचले आहेत.

येथील नागरिकांसोबतच इर्शाळवाडीत काही प्रमाणात पाळीव जनावरांनाही आपले प्राण गमावावे लागले. त्यामध्ये 4 बैल, 3 शेळ्या यांचा समावेश आहे.

सध्या दरडग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवासासाठी सूर्या हॉटेलसमोर चौक येथे 34 पोर्टेबल कंटेनर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन, NDRF, SDRF, TDRF यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचं अग्निशमन दल आणि इतर खासगी मदतकर्तेही तैनात आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असलं तरी पावसामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत.

कुठे आहे इर्शाळगड?

मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर तुम्हाला इर्शाळगड दिसेल.

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.

याच इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. हा परिसर नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.

इर्शाळवाडी

ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.

दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये 'देशीचे दुर्ग' या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.

ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.

इर्शाळगडाचा इतिहास

इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.

शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.

या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)