असंगाशी संग केल्यानेच त्यांना रस्त्यावर आणून सोडलं- देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1.असंगाशी संग केल्यानेच त्यांना रस्त्यावर आणून सोडलं- देवेंद्र फडणवीस

"असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजपच्या 'विजय संकल्प' सभेला रविवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

"दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले. बेईमानी केली की काय होते ते त्यांना 6 महिन्यापूर्वी दाखवली आहे. शिवसेनेचा विचाराचा वारसा चालवणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाले आहे. देशात भाजपची सत्ता आणण्याची सुरुवात कोल्हापुरातून करूया," असा संकल्प फडणवीस यांनी सोडला.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

2.भाजप शिवसेना मिळून लढणार, बाकीचे सगळे आमच्याविरोधात एकत्र येणार- अमित शाह

'आगामी काळात सर्व निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढणार असून दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसह उरलेसुरले सर्व पक्ष आमच्या विरोधात असणार आहेत. मात्र ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नसून भारताला महान आणि समृद्ध भारत करण्यासाठी असेल', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

कोल्हापुरात भाजपने आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

अमित शाह यांनी म्हटलं, "मी जेव्हा जेव्हा कोल्हापुरात आलो तेव्हा श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले आणि अंबाबाईचे दर्शन घेतले की भाजप विजयी झाला आहे. यामुळे आज मी अंबाबाईचे दर्शन घेतले, तर आगामी काळात सर्व निवडणुका या भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढवतील. उरले सुरले मात्र एकत्र येऊन भाजपविरोधात लढतील. काही झाले तरीही 2024 मध्ये भाजपचा विजय नक्की होणार आहे."

3.फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या ब्लू टिक साठी सुद्धा आता पैसे मोजावे लागणार

ट्विटर पाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहे. वेबसाईटवर ते वापरणार असाल तर महिन्याला 993 रुपये आणि आयफोन साठी 1241 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

सध्या ही सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य देशात ही सेवा सुरू केली जाणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार मेटा या कंपनीकडून अशी घोषणा केली जाणार याची चर्चा बरेच दिवस सुरू होती.

झुकरबर्ग यांची टीम याबाबत अनेक दिवस संशोधन करत होती आणि आता ही घोषणा करण्यात आली आहे.

4.मेघालयात नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला परवानगी नाकारली

मेघालयाच्या क्रीडा विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजिच रॅलीला परवानगी नाकारली आहे. दक्षिण तुरा भागातील पी.ए.संगमा स्टेडिअमवर ही रॅली प्रस्तावित होती. मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांचा हा मतदारसंघ आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

भाजपने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष राज्यात असलेली भगवी लाट परतवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

24 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी शिलाँग आणि तुरा येथे सभा घेणार होते.

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आल्याचं या विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी 16 डिसेंबरला या स्टेडिअमचं उद्गाटन करण्यात आलं होतं. 127 कोटी रुपये खर्चून हे स्टेडिअम बांधण्यात आलं आहे.

5. बस कंडक्टर हा कुशल कामगार वर्गात मोडत नाही- कर्नाटक उच्च न्यायालय

बस कंडक्टर हा कुशल कामगार नाही. निवृत्तीनंतर या व्यवसायाचा अर्थाजनाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे एखाद्या कंडक्टरचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर त्याला पुरेशी नुकसानभरपाई दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

नुकसानभरपाई देण्यासाठी Splitting the multiplier ही पद्धत वापरतात. मात्र त्यासाठी मृत व्यक्ती डॉक्टर, प्राध्यापक किंवा बँकेत अधिकारी हवी. कारण निवृत्तीनंतर त्यांना पैसे कमावण्याची संधी असते असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)