श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला- काँग्रेस नेते शिवराज पाटील #5मोठ्याबातम्या

शिवराज पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवराज पाटील चाकूरकर
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला - काँग्रेस नेते शिवराज पाटील

श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय.

दिल्लीत मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल, कुराण आणि गीता यांची तुलना केली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं.

शिवराज पाटील

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मोहसिना किडवई यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

शिवराज पाटील म्हणाले की, "मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे."

2) नाणार प्रकल्पाला गती देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

'वेदान्त-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारनं सुमारे तीन लाख कोटींचा नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये म्हणून हालचाली वेगवान केल्यात.

या रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारची जागाच योग्य असल्यानं तिथेच प्रकल्प उभारण्यावर भर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उद्योग खात्याच्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तब्बल 14 महिन्यांनंतर गुरुवारी (20 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.

3) 'आनंदाची शिधा' दिवळीनंतर मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारनं दिवाळीनिमित्त गरिबांना 100 रुपयात रेश किट देण्याची घोषणा केली खरी, पण ही घोषणा अमलात येण्यासाठी दिवाळी संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

कारण पॅकेजिंगला लागत असलेल्या वेळामुळे शिधा वाटप होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे

राज्य सरकारनं घोषित केलेल्या या किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ आणि एक किलो पामतेल यांचा समावेश आहे.

साहित्य येण्यासाठी आणि त्याच्या पॅकिंगसाठी कमीत कमी आठवडाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी ही रेशन किटविनाच जाणार आहे.

4) मुस्लीम लक्ष्मीची पूजा करत नाहीत, मग ते श्रीमंत नसतात का? - भाजप आमदार

बिहारमधील भागलपूरचे भाजप आमदार ललन पासवान यांनी धार्मिक रुढी परंपरेबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

"आपण मानलं तर देव असतो, नाहीतर तो दगड असतो. लोकं जेव्हा तर्काच्या आधारावर विचार करतील, तेव्हा अंधश्रद्धा संपेल," असं विधान ललन पासवान यांनी केलं आहे.

ललन पासवान यांच्या या वक्तव्यानंतर बिहारमधील अनेक ठिकाणी निदर्शनं करून पासवान यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमर उजालानं ही बातमी दिलीय.

"हिंदू धर्मामध्ये सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. पण मुस्लीम बांधव सरस्वतीची पूजा करत नाहीत. मग ते विद्वान नसतात का? ते आयएएस किंवा आयपीएस अधिकारी नसतात का? देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते. धनप्राप्ती व्हावी म्हणून दिवाळीत लक्ष्मीची पूजा केली जाईल. यामुळे धन मिळेल. पण मुस्लीम बांधव लक्ष्मीची पूजा करत नाहीत, तरीही ते कोट्यधीश आहेत," असं वक्तव्य ललन पासवान यांनी केलं.

5) पतंगराव कदम मला विचारून काँग्रेसचा उमेदवार द्यायचे - भाजप नेते

"पतंगराव कदम यांनी लहान भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केले. मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवेळी ते विरोधी उमेदवार कोण पाहिजे, असे म्हणत मला विचारूनच काँग्रेसचा उमेदवार द्यायचे," असा गौप्यस्फोट भाजपचे नेते व कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी रविवारी सांगलीतील कार्यक्रमात केला. लोकमतनं ही बातमी दिलीय.

सुरेश खाडे

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, सुरेश खाडे

शहरातील सिव्हिल चौकाला 'डॉ. पतंगराव कदम चौक' असे नाव देण्यात आले. या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

सुरेश खाडे म्हणाले की, "पतंगराव कदम जेव्हा मला उमेदवार कोण द्यायचा, असे विचारत होते, तेव्हा मी त्यांना सांगत असे की, कोणीही द्या.

"मिरज मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सांगलीच्या काँग्रेस भवनात एकदा बैठक झाली. त्या बैठकीत पतंगरावांनी सर्व तालुक्यात लक्ष घालणार, अशी घोषणा केली, पण मिरजेत आपण जिंकू शकत नाही, असे जाहीरपणे सांगत. पतंगराव व मदनभाऊंशी माझी मैत्री होती. वेगवेगळ्या पक्षात असलो तरी कधीही एकमेकांच्या आडवे गेलो नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)