काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार #5मोठ्या बातम्या

राहुल गांधी, भारत जोडो, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि शरद पवार
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे-शरद पवार सहभागी होणार

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेली 'भारत जोडो' यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना दिलं.

दोघांनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली.

2.माझ्या जिवाचं बरंवाईट झाल्यास शिंदे फडणवीस जबाबदार- विचारे

"माझ्या जिवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील", असं राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात राजन विचारे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देखील पाठवले आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

"मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील. माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करावी", अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

"महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासह कुठलाही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबीयांना काही धोका निर्माण झाल्यास याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील", असं ते म्हणाले.

यापूर्वी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगीतले होते.

3. सिसोदियांचा नवा दावा

"आम आदमी पक्ष न सोडल्यास अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत राहणार असं सीबीआयच्या कार्यालयात चौकशीदरम्यान सांगण्यात आलं. मात्र, मी भाजपासाठी आप सोडणार नसल्याचं अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं" अशी प्रतिक्रिया चौकशीनंतर सिसोदिया यांनी माध्यमांना दिली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचीही ऑफर या चौकशीदरम्यान मिळाल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे.

उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राजधानी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

मनीष सिसोदिया, आम आदमी पार्टी, दिल्ली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मनीष सिसोदिया

"उत्पादन शुल्क धोरणाबाबत माझ्याविरोधात दाखल खटला संपूर्णपणे खोटा असल्याचं नऊ तासांच्या चौकशीनंतर मला समजलं. हे प्रकरण माझ्याविरुद्धच्या कोणत्याही घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नाही तर ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी आहे, असे मनीष सिसोदिया म्हणाले आहेत.

आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर दाखल गुन्हेही खोटे असल्याचे या चौकशीदरम्यान सांगण्यात आल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांना पुन्हा सीबीआयकडून बोलवलं जाण्याची शक्यता आहे.

अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरासहित 21 ठिकाणी छापेमारी केली होती. दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.

अखेर केजरीवाल सरकारला हे नवे उत्पादन शुल्क धोरण रद्द करावे लागले होते.

4. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महाराष्ट्राची गेल्या अडीच वर्षात वाईट अवस्था-सुजय विखे पाटील

"राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन तयार केला होता. प्रत्येक वर्षात किती पैसे खायचे हे त्यांनी ठरवले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा प्लान उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे", असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

सुजय विखे पाटील
फोटो कॅप्शन, सुजय विखे पाटील

महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अवस्था वाईट झाल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे.

शिखर बँक घोटाळ्यात पुन्हा चौकशी सुरू झाल्यास माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या सत्ता काळात या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. आता राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा या प्रकरणाच्या तपासाची मागणी जोर धरू लागली आहे.

अजित पवारांसहीत अन्य 76 संचालकांची पुन्हा ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

5.पुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा

वीजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. पुणे शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.

पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या दोन तासांमध्ये 81 मिलिमीटर पाऊस शिवाजीनगरमध्ये नोंदला गेला. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

मुसळधार पावसाने कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागातील नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, रस्त्यांची स्थितीही भयानक झाली होती.

या भागातून रात्री 12 वाजेपर्यंत 25 हून अधिक कुटुंबीयांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून मदतीची याचना केली.

मध्यवर्ती भागात नागझरी नाल्याचा मोठा पूर आला, बुरूड पूल येथे पाणी पात्राच्या बाहेर आल्याने परिसरातील वस्तीमध्ये पाणी घुसले होते. तर मंगळवार पेठेतही शिवाजी आखाड्याच्या शेजारील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पाठविण्यात आले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)