गोपीचंद पडळकरः उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला हवं होतं #5मोठ्याबातम्या

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करून त्यांना खंजीर चिन्ह द्यायला हवं होतं - गोपीचंद पडळकर

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच खंजीरातून झालेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्रित करून निवडणूक आयोगाने खंजीर चिन्ह द्यायला हवं होतं, अशा शब्दांत विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.

बारामती येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी पडळकर यांनी दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले, "राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे.

"अजित पवार यांनी केलेले बंड फसलं. बंडानंतर अवघे दोन आमदार त्यांच्यासोबत राहिले होते. या उलट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार गेले. त्यामुळे सरस कोण? हा संदेश जनतेत गेला आहे," असंही पडळकर यांनी म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

2. अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

अंधेरी-पूर्वची जागा एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना लढवेल की भाजप हा तिढा आता सुटला आहे.

येथील माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना भाजपच्याच कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे, ही जागा आता एकनाथ शिंदे गटाकडे जाणार नाही. परिणामी या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि आमदार प्रसाद लाड

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि आमदार प्रसाद लाड

अंधेरी-पूर्वची जागा यापूर्वी शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडून दावा केला जात होता.

त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत निश्चित नव्हतं.

पण, काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली.

त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं आहे. मुरजी पटेल यांनाही यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

3. मला कालपासून धोका जाणवतोय, मी माझं बाळ शिवसेनेला दत्तक देते - सुषमा अंधारे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याला अप्रत्यक्ष धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे.

याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवलं असून त्यांनी सुरक्षा पुरवण्याबाबत पाऊले उचलली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, facebook

नवी मुंबई येथील वाशी येथे पार पडलेल्या महाप्रबोधन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, "मला कालपासून काही धोके जाणवत आहेत. ते मला शूट करतील का? मला काय चिंता आहे. माझ्याकडे एक पाच वर्षांचं बाळ आहे. मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते."

"शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील." असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती म्हणजे राज्याची अधोगती - जयंत पाटील

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात. त्यांनी मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील

फोटो स्रोत, facebook

ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, "सरकार मागे बघायला लागलं, तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने पुढचा विकास म्हणजे भविष्य याकडे बघून चालावं. पुढची कामे पटापट झाल्यास नागरिकांना नोकऱ्या आणि रोजगार यांची संधी मिळते, असंही पाटील यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

5. नेहमीच प्रशासक राहू शकत नाही, दुसरं काहीतरी करेन - सौरव गांगुली

आपण नेहमीच प्रशासकपदी कायम राहू शकत नाही. त्यामुळे आता दुसरं काहीतरी करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी केलं आहे.

दिल्ली येथील एका खासगी कार्यक्रमात बोलताना गांगुली यांनी प्रथमच अध्यक्षपद सोडावं लागल्याच्या प्रकरणावर भाष्य केलं.

ते म्हणाले, "हे जीवनचक्र आहे. यामध्ये चढ-उतार येत राहतात. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वांत महत्त्वाचं होतं. सर्व काही पटकन मिळवायचं असेल तर ते शक्य नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनू शकत नाही." ही बातमी आजतकने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)