कार्टून नेटवर्कची वॉर्नर ब्रदर्स घेणार संपूर्ण मालकी, आमच्या आवडत्या कार्टूनचं काय होणार? - ब्लॉग

फोटो स्रोत, BBC / Cartoon network
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मी 12वीत असतानाची गोष्ट. नागपूरच्या एका शिकवणी वर्गात केमिस्ट्रीचा तास सुरू होता. तेव्हा अनेक रासायनिक समीकरणं सोडवून वेगवेगळे फॉर्म्युले घोटावे लागत, जे खूप कठीण आणि त्यामुळे कंटाळवाणं काम होतं.
पण तो दिवस लक्षात राहण्यासारखा होता - मास्तरांनी अचानक फळ्यावर असंच एक समीकरण सोडवून एक नवीन फॉर्म्युला सांगितला - "C6H2(NO2)3CH3 - अर्थात ट्रायनायट्रोटोलीन. याला सोप्या भाषेत TNT म्हणतात."
हे TNT ऐकून माझे कान टवकारले. मी झटकन बोललो, "सर, हे स्फोटक असतं ना?"
सर म्हणाले, "करेक्ट!"
धन्यवाद कार्टून नेटवर्कचे, ज्यामुळे अशा गोष्टींचं तर्क लावण्याची सवय लागली. लहानपणापासून हे TNT अनेकदा मी कार्टून नेटवर्कवरच्या शोंमध्ये पाहिलं होतं, खासकरून द रोड रनर शोमध्ये. पण त्याचा अर्थ त्यादिवशी उमगला होता. यात एका पक्ष्याची शिकार करण्याचा एक कोयोट (लांडग्यासारखा दिसणारा जंगली प्राणी) सतत प्रयत्न करत असतो, आणि हास्यास्पदपणे अपयशी ठरत असतो.

फोटो स्रोत, Warner bros
बरं, रोड रनर शो नाही तर याच धाटणीचं 'टॉम अँड जेरी' तुम्ही पाहिलं असेलच. यातसुद्धा एका उंदराची शिकार करण्याच्या भानगडीत टॉम नावाचा बोका सतत तोंडावर पडत असतो. त्यातही भौतिकशास्त्राच्या अनेक गोष्टी मजेशीररीत्या समजावून सांगण्याची कला होती. अर्थात तेव्हा तितकी बुद्धी नव्हती हे कळायला की इनर्शिया काय असतं, ज्यामुळे टॉम पायाखालची जमीन संपल्यावरही आकाशातच काही वेळ का रेंगाळतो?
लहानपणी शाळेतून आल्यावर आपण एकतर बाहेर खेळायला पळायचो किंवा आपल्या आवडत्या कार्टूनच्या वेळेनुसार गृहपाठ हातावेगळं करून टीव्हीसमोर बसायचो. संध्याकाळचे सात वाजायचे, आजोबा ओरडायचे की बातम्या लाव, पण तरीही आपण रडून, जरा विनवणी करून आपलं कार्टून पाहणं सुरूच ठेवायचो.
काय तो काळ होता, आणि काय ते कार्टून होते!
'स्कूबी डू' तुम्हाला आठवत असेल. एक कुत्रा त्याच्या काही मानवी मित्रांसह काही रहस्यमयी घटनांचा पर्दाफाश करायचा. सोनी टीव्हीवरचं CID जेव्हा अगदी भरात यायचं होतं, त्यापूर्वीच आपल्याला स्कूबीडूने केसेसचा छडा लावायला शिकवलं होतं.

फोटो स्रोत, CBBC
प्रत्येकाच्या कार्टून नेटवर्कच्या आठवणी याहून काही वेगळ्या असू शकतात. कुणाला पाषाण युगात घेऊन जाणारे फ्लिंटस्टोन्स आठवत असतील तर कुणाला प्रगत, भविष्यात घेऊन जाणारे जेटसन्स.
या दोन्ही कार्टून्समधली वाहनं आठवतात का? फ्लिंटस्टोन्समध्ये फ्रेड आणि बार्नी त्यांच्या गाड्या पायांनीच चालवायचे, तर जेटसन्समधला जॉर्ज त्याचं एकेरी हेलिकॉप्टर उडवून ऑफिसला जायचा. काय भारी वाटायचं ते? आपणही भविष्यात असंच ऑफिसला जाऊ, असं तेव्हा वाटायचं. आज मात्र दिल्लीची मेट्रो किती अद्ययावत आहे, त्यात कसे युएसबी चार्जिंग पोर्ट आहेत, हेच पाहून समाधान मानावं लागतं.

फोटो स्रोत, Cartoon Network
आणि पॉपायला आपण कसं विसरू शकतो. पालक भाजीत लोह (Iron) असतं, हे आपल्याला आईने सांगितलं होतं, पण ते पटवलं होतं पॉपायने. त्याची गर्लफ्रेंड ऑलिव्ह जेव्हा तिच्या मोठमोठ्या पापण्या हलवून तिचं प्रेम व्यक्त करायची, तेव्हा वाटायची की एके दिवशी आपलीसुद्धा अशीच प्रेयसी असेल. हे सगळे मनाचे खेळ होते.

फोटो स्रोत, Getty Images
कार्टून नेटवर्क (सुद्धा) मध्ये पुरुषांचाच भरणा होता असं नाही. "टाऊन्सविल शहर" याच वाक्याने 'द पावरपफ गर्ल्स'चा प्रत्येक एपिसोड सुरू व्हायचा. त्यात मोजोजोजो नावाचा एक सैतान असायचा, ज्यापासून या शहराला वाचवायची जबाबदारी ब्लॉसम्स, बबल्स आणि बटरकप या तीन पिटुकल्या मुलींवर असायची
प्रत्येक एपिसोडच्या शेवटी त्या मोजोजोजोला हरवायच्या, ते पाहून बहीण-मैत्रीण वर्गात उत्साह संचारायचा.

फोटो स्रोत, Twitter
आता भावा-बहिणींबद्दल बोलतोय आणि डेक्सटर आणि त्याच्या डीडीबद्दल नाही बोललं तर कसं होईल? 'डेक्स्टर्स लेबॉरेटरी' हा शो पाहून, आपल्याही बेडरूमच्या खाली एक प्रयोगशाळा असावी, असं प्रत्येकाला वाटलं नसेल तर नवलच. त्यात डेक्स्टर काही भन्नाट प्रयोग करायचा, पण त्याची बहीण डीडी नेहमी येऊन काही ना काही काड्या करायची. आणि मग ते भांडायचे.
तिचं नाव डीडी हे हिंदीतल्या दीदीवरून पडलंय का असंही अनेकदा वाटायचं पण भावाबहिणींची जोडी भारी होती हे मात्र नक्की.
कार्टून नेटवर्कचं झालं CN
पण कालांतराने जशा काही गोष्टी सुटतात तसं कार्टून नेटवर्कचा सिग्नलही आयुष्यातून कट होऊ लागला. दहावीचं वर्ष जवळ येता-येता घरी केबल टीव्हीचं कनेक्शन कट झालं, आणि नंतर ते लागलं तोवर कार्टून नेटवर्कचं CN झालं होतं. सोबतीला पोगो, हंगामा टीव्ही, डिस्नी किड्स, निकलोडियन आलं.
मग कार्टून पाहण्यातली मज्जा पूर्वीसारखी राहिली नाही. स्कूबी डू, स्वॉट कॅट्स आणि पॉपायच्या जागी डोरेमॉन, हागेमारू, पिकाचू, थॉमस अँड फ्रेंड्स यांनी घेतली. आणि त्यांच्याशी तसं नातं कधी निर्माण होऊ नाही शकलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
लहानपणी बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने आपलं शहर बदलतं, तेव्हा ते जुने मित्र जसे मागे पडतात आणि पुन्हा कधीच कदाचित भेटत नाही. तसंच काहीसं कार्टून नेटवर्कच्या बाबतीत तारुण्यात प्रवेश करताना झालं.
आता टॉम अँड जेरी लागतं अधून मधून टीव्हीवर, जेव्हा आमची घरची बालक मंडळी कार्टूनचे चॅनल फिरवत असतात, पण आता आपल्याला त्या निरागस मनाने त्याची मजा नाही घेता येत, हेही तितकंच खरं.
शुक्रवारी 14 ऑक्टोबरला बातमी आली की हेच कार्टून नेटवर्क आता वॉर्नर ब्रदर्स या बड्या प्रोडक्शन कंपनीसोबत पूर्णपणे विलीन होणार आहे, तेव्हा ऐकून जरा भावूक झालो. ट्विटरसह इंटरनेटवर अनेकांनी भावनिक संदेश टाकायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की आपल्या बालपणाचा जिव्हाळ्याचा सोबती आता इतिहासजमा होतोय.
कार्टून नेटवर्कने स्पष्ट केलंय की ते काही बंद वगैरे पडत नाहीयेत. पण माझ्यासारखंच कार्टून नेटवर्कसुद्धा यंदा तीस वर्षांचं झालंय, आणि आता त्यालाही काळासह बदलावं लागतंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























