ठाणे-पनवेल लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, महिला पोलीस गंभीर जखमी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. ठाणे-पनवेल लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, महिला पोलीस गंभीर जखमी
लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या झालेल्या वादातून महिलांमध्ये गंभीर हाणामारी झाल्याची घटना ठाणे-पनवेल लोकलमध्ये घडली. तुर्भे ते सीवुड्स या मार्गावर ही घटना घडली.
ही हाणामारी सोडवण्यासाठी ट्रेनमध्ये चढलेल्या पोलीस महिलेलाही त्यातील एक महिलेने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
तळोजा येथे राहणाऱ्या गुलनाथ खान, त्यांची मुलगी अंजू दहा वर्षीय नातीसह संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रवास करत होत्या. त्यात स्नेहा देवडे ही महिला कोपरखैरणे रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये चढली.
तुर्भे स्थानकात जागा रिकामी झाली म्हणून स्नेहा तिथे बसल्या. तेव्हा गुलनाथ यांनी नातीला का बसू दिलं नाही या मुद्द्यावरून भांडण करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि या मायलेकी आणि स्नेहा यांच्यात मारामारी झाली.
नेरुळ स्थानकात गाडी आल्यानंतर शारदा उगले नावाच्या पोलिस कॉन्स्टेबल हे भांडण सोडवण्यासाठी आल्या. मात्र त्यांनाही अंजू यांनी फ्लॉवर पॉटने मारलं. त्यात शारदा रक्तबंबाळ झाल्या
अंजू खान यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
2. अमेरिकेत राहणाऱ्या शीख कुटुंबातील चौघांची अपहरण करून हत्या
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये चार सदस्यीय शीख कुटुंबाचं अपहरण करण्यात आलं होतं. या चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 3 ऑक्टोबरला या कुटुंबाचं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती अमेरिकतल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कॅलिफोर्नियातील सेंट्रल व्हॅलीतील जसदीप सिंग (36), त्यांची पत्नी जसलीन कौर (27), आरोही (8 महिने) आणि अमनदीप सिंग (39) अशी मृतांची नावं आहेत. या कुटुंबाचा हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे.
हे कुटुंब मूळचं पंजाबच्या होशियारपूरचे होते. अपहरणकर्त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अपहरण केलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.
3. धनुष्यबाण कोणाचा? - निवडणूक आयोगात आज सुनावणी
शिवसेना नेमकी कोणाची, यावर निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 'धनुष्यबाणा'चा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.
अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून १४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकालाची अपेक्षा आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 7 ऑक्टोबपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. त्यामुळे शुक्रवारी ठाकरे गटाच्या वतीने कोणती कागदपत्रे आयोगाला दिली जातात आणि आयोगासमोर कोणता युक्तिवाद केला जातो, हेही महत्त्वाचे मानले जात आहे.
4. स्वत:ला वाचवण्यासाठी 'त्यांनी' माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी हातमिळवणी करून माझ्यावर आरोप केले असं अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सांगितलं आहे.
न्यायलयाने सीबीआयला देशमुखांच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्यावरील सर्व आरोप तपास यंत्रणांच्या इच्छा आणि कल्पनांवर आधारित आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी सीबीआयने ज्या जबाबांचा आधार घेऊन गुन्हा नोंदवला आहे त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
संपूर्ण प्रकरण परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या जबाबावर आधारित आहे. वाझे स्वत: अनेक प्रकरणात अडकला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत. दोघांनी स्वत:ला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप केले आहेत, असं देशमुख यांनी त्यांच्या अर्जात म्हटलं आहे.
5. त्या कफ सिरपची भारतात विक्री नाही- भारत सरकार
गांबियामध्ये भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे 66 मुलांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर खळबळ उडालीय. या कफ सिरपची निर्मिती भारतातील मेडन फार्मा या कंपनीकडून केली जात असली तरी त्याची विक्री मात्र भारतात केली जात नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
या कंपनीतून निर्मिती होणारं कफ सिरप हे गांबियाला निर्यात केलं जायचं. भारतात तयार होणाऱ्या या कफ सिरपचे सेवन केल्यानंतर गांबिया या देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला होता. भारतीय औषधं नियंत्रक मंडळाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. WHO ने पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी इशारा दिला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























