जयंत पाटीलः भाजपच सरकार पाडेल तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.भाजपच सरकार पाडेल तेव्हा शिंदेंना आपली चूक लक्षात येईल- जयंत पाटील

"हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणार नाहीच, आता फक्त एवढाच प्रश्न आहे की सरकार बरखास्त कधी करायचं. भारतीय जनता पार्टीच्या कॅल्क्युलेशननुसार जेव्हा गणितं जुळायला लागतील, तेव्हा भाजपाच हे सरकार बरखास्त करेल. त्यादिवशी एकनाथ शिंदेंना आपण किती मोठी चूक केली आहे, हे लक्षात येईल", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील बोलत होते.

"हे सरकार लवकरच कोसळेल. कारण लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासोबत गेलेले बरेच आमदारही नाराज आहेत. त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते, म्हणून राज्याच्या प्रशासनादेखील यांचं ऐकायचं थांबवलं आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांही माहीत आहे की हे फार दिवसाचे आपले साथी नाहीत. कधीही जाऊ शकतात. त्यामुळे नवीन सरकारची राज्याच्या प्रशासनावरची पकडही सैल झाली आहे", असंही पाटील म्हणाले.

2.ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीचा ठसा

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्याने, या दाव्या-प्रतिदाव्यांमधील तथ्य शोधणे कठीण असले, तरी या निकालांचा एकूण कल हा भाजप; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याचे दिसते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

शिंदे-फडणवीस या दोघांचा आकडा हा 185वर; तर महाविकास आघाडीचा आकडा हा 225वर गेल्याचे दिसते. अशा वेळी पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही काही ठिकाणी अनपेक्षित विजय मिळवला असताना, शिवसेना आणि काँग्रेसला मात्र वैयक्तिक्तरीत्या काही ठिकाणी फटका बसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे.

राज्यात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची जी काही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली, त्यानुसार 494 पैकी 144 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

'राष्ट्रवादी'कडे 126, शिंदे गटाला 41, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 37, तर काँग्रेसला 62 जागा मिळाल्या आहेत, तर इतरांनी 88 जागांवर सरशी घेतली आहे.

3.निवडणूक आयोगासमोर शिंदे करणार आमदारांची ओळख परेड

शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहे.

एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे.

निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, यानंतर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

4.जॅकलिन फर्नांडिझची ईडीकडून सात तास चौकशी

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिची सोमवारी 19 सप्टेंबर,2022 रोजी दिल्ली पोलिसांनी तब्बल 7 तास कसून चौकशी केली.

ती दुपारी जवळपास 2 च्या सुमारास दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचली. त्यानंतर जवळपास साडेनऊच्या सुमारास जॅकलीन कार्यालयाच्या बाहेर आलेली दिसली.

जॅकलिनशी याआधी बुधवारी देखील चौकशी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दोनदा चौकशी केलेली आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सुकेश प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेनं याआधी जॅकलिनला 14 सप्टेंबर रोजी(बुधवारी) चौकशीसाठी बोलावले होते. त्यादिवशी सुकेशची मैत्रिण आणि एजंट पिंकी इराणी देखील चौकशीसाठी हजर राहिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नोरा फतेही,तिचा जिजाजी बॉबी आणि पिंकी इराणी यांची एकत्र चौकशी केली गेली.

5.फूड डिलिव्हरी अॅपच्या माणसाने जबरदस्तीने घेतलं चुंबन, पुण्यातली घटना

झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे. जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 40 वर्षांचा रईस शेख हा कोंढव्यात राहतो. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास रईस जेवणाची ऑर्डर घेऊन पीडित मुलीच्या घराच्या दरवाजावर आला. मुलीने जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर रईसने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. पाणी पिऊन झाल्यानंतर थॅन्क्यू म्हणण्यासाठी रईसने मुलीचा हात धरला आणि दोन वेळा गालावर चुंबन घेतलं, असं मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हणलं आहे.

पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमणावार फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली जाते. फूड डिलिव्हरी अॅप करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कागदपत्रांची तपासणी करतात का? तसंच या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती करून घेतात का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)