नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका : 'टिव टिव करत उंदीर महाराष्ट्रात फिरतोय'

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांचा घेतलेला आढावा
1. 'टिव टिव करत उंदीर महाराष्ट्रात फिरतोय,' नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला.
त्यावर 'टिव टिव करत एक उंदीर फिरतोय महाराष्ट्रभर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने,' असं म्हणत नारायण राणे यांनी टीका केली आहे.
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दौरा करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, असा दौरा देखील केला.
या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीकादेखील केली होती. दरम्यान, आता नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन त्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.
टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.
2.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा - शहाजीबापू पाटील
"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा व्हावा, कारण बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून शिवसेना काम करते आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचर जोपासले असते तर काँग्रेस- राष्ट्रवादीशी युती झाली असती का? त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे फिरकूही दिलं नसतं," अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार शहाजीबापू म्हणाले की, बाळासाहेबांची विचारधारा खूप मोठी होती. हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षांपूर्वी उद्धवस्त झाला. मतदारसंघात आम्हाला उत्तरं देणं मुश्किल झालं.
3.भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर
करोनाच्या दोन वर्षांच्या प्रतिकूल परिणामांतून सावरत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचं बुधवारी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदराने 13.5 टक्क्यांची पातळी गाठली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीचा दर 20.1 टक्के राहिला होता. सरलेल्या आर्थिक वर्षांतील चौथ्या महिन्यात जीडीपीचा दर 4.1 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.
केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला.
यंदा मात्र जागतिक पातळीवर अन्नधान्य आणि खनिज तेलाच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचूनही आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याने 13.5 टक्क्यांची विकासगती गाठता आली.
4. बिहारच्या कायदामंत्र्यांचा राजीनामा
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे कायदा मंत्री कार्तिक कुमार यांनी राजीनामा दिली आहे. 2014 मध्ये झालेल्या अपहरणाच्या एका प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर विरोधकांनी कुमार यांच्याविरुद्धा राळ उठविली. बुधवारी 31 ऑगस्टला त्यांनी राजीनामा दिला आहे. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.
कार्तिक कुमार यांच्याविरुद्ध आंदोलन तीव्र झाल्यानंतर त्यांना कमी महत्त्वाचं असलेल्या ऊस मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला होता. आता मात्र त्यांनी राजीनामा दिला आहे.
5. लोकसभा निवडणूक एकत्र लढवू शकतो- शरद पवार
"2024 मधील लोकसभेची निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सांगितलं. त्यामुळे पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, "आागामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार होऊ शकतो."
ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, "भाजपने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारं पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडलं, तसाच प्रयोग झारखंडमध्ये सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसं द्यायचं हे आम्हाला ठरवावं लागेल. विरोधकांनी एकजूट झालं पाहिजे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























