मुकेश : असा गायक ज्यांना राज कपूर आपला आवाजच नाही तर 'आत्मा' समजायचे...

मुकेश

फोटो स्रोत, PUBLICATION DEPARTMENT, GOV. OF INDIA

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

"मुकेश माझा आवाज होता...माझा आत्मा होता. मी केवळ शरीर होतो, राज कपूर ही केवळ एक प्रतिमा होती; त्याला त्यानं आवाज दिला होता. मुकेश गेला तेव्हा मला जाणवलं की, मी काय गमावलंय. ती एक पोकळी होती."

गायक मुकेश यांच्या निधनामुळे आपण केवळ मित्रच नाही, तर अजून काय गमावलंय याबद्दलच्या भावना दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी व्यक्त केल्या होत्या.

राज कपूरसाठी मुकेश खास होते...काही जणांसाठी ते 'राज कपूरचा आवाज' होते...पण मुकेशची ओळख तेवढीच होती? आपल्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 900 हून अधिक गाणी गाणाऱ्या मुकेशचं गायक म्हणून काय वैशिष्ट्य होतं? त्यांच्या समकालीनांपेक्षा ते कसे वेगळे होते?

मुकेशकडे कदाचित मोहम्मद रफीप्रमाणे 'रेंज' नसेल, किशोर कुमारप्रमाणे आवाजामध्ये फिरत नसेल, तलतप्रमाणे त्यांचा आवाज मखमली नसेल...पण तरी मुकेशला जाऊन 44 वर्षं झाल्यानंतरही त्यांची अनेक गाणी तितकीच अवीट वाटतात. मुकेशशिवाय या गाण्यांना अजून कोणीही न्याय देऊ शकणार नाही असंच वाटतं.

म्हणूनच प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि लेखिका भावना सोमय्या यांनी मुकेश यांच्या गाण्यांबद्दल बोलताना म्हटलं होतं, "जेव्हा कोणत्याही गाण्यात दर्द असतो, खूप भावना असतात आणि ते जेव्हा माझ्या हृदयाला स्पर्श करून जातं तेव्हा हे गाणं मुकेशजींनी गायलं असेल हे मी समजून जाते."

जाने कहाँ गये वो दिन, कहीं दूर जब दिन ढल जाये, चांदी की दीवार ना तोड़ी, सजन रे झूठ मत बोलो, ये कौन चित्रकार है, मैं पल दो पल का शायर हूँ यांसारखी अनेक गाणी ऐकताना आपल्या मनातही याच भावना येतात, ज्या भावना सोमय्या यांनी व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास

मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1922 साली दिल्लीमध्ये झाला होता. लाला जोरावर चंद माथुर आणि चाँद रानी यांचं सातवं अपत्य होते मुकेश.

त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. दिल्लीतील मंदिर मार्गावरच्या एम बी स्कूलमधून (सध्याचं एन पी बॉईज सीनिअर सेकंडरी स्कूल) त्यांनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

मुकेश शाळेतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पंकज मलिक आणि के. एल. सैगल यांची गाणी गायचे.

अगदी शाळकरी वयापासून आवडीनं गाणी गाणाऱ्या मुकेश हे पार्श्वगायक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत कसे आले?

बीबीसी हिंदीसाठी ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक प्रदीप सरदाना यांनी एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी मुकेश यांचे धाकटे बंधू पी. डी. माथुर यांनी सांगितलेल्या आठवणीच्या संदर्भाने मुकेश यांचा दिल्ली ते मुंबई हा प्रवास कसा झाला हे सांगितलं होतं.

माथुर यांनी सांगितलं होतं, की त्यांची बहीण प्यारी जी यांचा विवाह होता. प्रसिद्ध अभिनेते मोतीलाल त्यांचे नातेवाईक होते. या लग्नाला मोतीलाल त्यांचे मित्र आणि चित्रपट निर्माते तारा हरिश यांना सोबत घेऊन आले होते.

मुकेश

फोटो स्रोत, NITINMUKESH

विवाहाच्या विधींना वेळ होता, त्यामुळे पाहुण्यांच्या मनोरंजनसाठी मुकेश हे गाणी गायला उभे राहिले. मोतीलाल आणि तारा हरीश यांना मुकेश यांचं गाणं आवडलं.

दरम्यान, मुकेश मॅट्रिकनंतर दिल्लीतच सीपीडब्ल्यूडीमध्ये नोकरीला लागले होते. नोकरीला लागून सात-आठ महिनेच झाले होते, इतक्यात मोतीलाल यांची मुकेश यांना 'मुंबईला या म्हणून' तार आली.

ऑक्टोबर 1939 मध्ये मुकेश यांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि ते मुंबईला गेले.

फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी संगीताचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या मुकेश यांनी संगीतकार खेमचंद्र प्रकाश यांचे चुलतभाऊ जगन्नाथ प्रसाद यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले.

1941 साली प्रदर्शित झालेल्या निर्दोष चित्रपटात मुकेश यांनी 'दिल ही बुझा हुआ हो तो' हे गाणं गायलं होतं. या सिनेमात त्यांनी अभिनयही केलेला.

मात्र 'पहली नज़र' या चित्रपटातल्या 'दिल जलता है तो जलने दो' या गाण्यामुळे मुकेश यांचं नाव चर्चेत आलं. हे गाणं जेव्हा लोकांनी रेडिओवर ऐकलं, तेव्हा के एल सैगल यांनी ते गायलं असावं, असं अनेकांना वाटलं. मुकेश यांच्यावर सैगल यांचा प्रभावही होताच.

भावना सोमाया यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, स्वतः सैगल यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा आपण हे गाणं कधी गायलं हे आपल्याला आठवत नसल्याचं म्हटलं होतं.

मुकेश

फोटो स्रोत, Google

पण हळूहळू त्यांनी स्वतःची शैली तयार केली. संगीतकार नौशाद यांनीही त्यांना अशी गाणी दिली ज्यामुळे ते सैगल यांच्या छायेतून बाहेर पडतील. नौशाद यांनी मेला, अंदाज आणि अनोखी अदा चित्रपटांसाठी मुकेशचा आवाज वापरला. या तीनही सिनेमांचे नायक होते दिलीप कुमार.

मुकेशची लोकप्रियता तेव्हा अधिक वाढली जेव्हा त्यांनी राज कपूर यांच्या चित्रपटात राज कपूर यांच्यासाठी गायला सुरूवात केली.

1949 मध्ये आरके स्टुडिओचा 'बरसात' प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये मुकेश यांनी 'छोड़ गए बालम' आणि 'पतली कमर है' ही गाणी गायली होती.

1951 मध्ये आर के स्टुडिओचा आवारा रिलीज झाला. या सिनेमानं आणि त्यातल्या 'आवारा हूँ' या गाण्यानं राज कपूरसोबतच मुकेशचीही लोकप्रियता भारताबाहेरही पोहोचवली. आज 70 वर्षांनंतरही रशियात हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे.

राज कपूरसोबतची मैत्री

राज कपूरसाठी मुकेश केवळ त्यांचा ऑनस्क्रीन आवाज नव्हते, दोघांचं नातं त्यापलीकडंच होतं.

संगीत हा आरके बॅनरच्या चित्रपटांचा प्राण होता. स्वतः राज कपूर यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांच्यासोबतच गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर-जयकिशन, मुकेश आणि लता मंगेशकर हे आरकेच्या सुवर्णकाळातले भागीदार होते, राज कपूर यांचे स्नेही होते.

मुकेश यांचे पुत्र आणि गायक नितीन मुकेश यांनी राज कपूर-मुकेश यांच्या मैत्रीच्या काही आठवणींना उजाळा दिला होता.

जेव्हा गाण्यांची रिहर्सल किंवा रेकॉर्डिंग असायचं तेव्हा राज कपूर यांची इंपाला मुकेश यांच्या नेपियन सी रोडवरच्या वन रुम किचन अपार्टमेंटसमोर रात्री-अपरात्री येऊन थांबायची. मुकेश यांची मुलं लगेचच जागी व्हायची. मुकेश यांची पत्नी तातडीने स्वयंपाकघरात जायची, कारण राज कपूर यांना जेवायचंही असायचं.

राज कपूर

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA

नितीन मुकेश यांनी सांगितलं होतं, "जेव्हा आम्ही 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहायला गेलो, तेव्हा आमच्या गृहप्रवेशावेळी कुटुंबाबाहेरची उपस्थित असलेली एकमेव व्यक्ती राज कपूरच होते. घर पाहिल्यानंतर आपल्याला ते आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मुलांची बेडरूम मला सगळ्यांत जास्त आवडली, पण ती एसी असायला हवी होती असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर लगेचच आमच्यासाठी एक भेटवस्तू आली...ती म्हणजे एअर कंडिशनर. आम्हा मुलांना आपण कोणतरी स्पेशल आहोत असं वाटलं होतं."

राज कपूर मुकेश यांना कायम 'मुकेश चंद' या पूर्ण नावानंच हाक मारायचे.

अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये 27 ऑगस्ट 1976 ला मुकेश यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राज कपूर हे कोलमडले. ते त्यावेळी पुण्याजवळ 'सत्यम शिवम सुंदरम'चं शूटिंग करत होते.

मुकेश यांचं पार्थिव जेव्हा भारतात आणलं तेव्हा राज कपूर एअरपोर्टवर भरलेल्या डोळ्यांनी हजर होते.

"फिल्मच्या क्लायमॅक्सचं शूटिंग तेव्हा सुरू होतं. पण शशी कपूर आणि झीनत अमान यांच्या एकत्र तारखा पुन्हा मिळणं अवघड आहे, आपल्याला नुकसान होऊ शकतं याचा जराही विचार न करता ते पुण्याहून आले आणि दहा दिवस आमच्यासोबत होते."

युएसला जाण्यापूर्वी मुकेश यांनी 'सत्यम शिवम सुंदरम'साठीच शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं होतं.

आरकेच्या चित्रपटांसाठी कधीच मिळाला नाही पुरस्कार

मुकेशने राज कपूर यांच्या आरके फिल्मसच्या सिनेमांसाठी गायलेली सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. पण यातल्या कोणत्याही गाण्यासाठी मुकेश यांना कधी पुरस्कार मिळाला नाही.

मुकेश यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. त्यांपैकी पहिला फिल्मफेअर 'अनाड़ी' चित्रपटाच्या 'सब कुछ सीखा हमने' या गाण्यासाठी मिळाला. या चित्रपटाचा हिरो राज कपूरच होते.

मुकेश यांना जे इतर तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते, त्यांपैकी दोन सिनेमांचे नायक होते मनोज कुमार. पहचान (1970) सिनेमातील 'सबसे बड़ा नादान वही है' आणि 'बेईमान' (1972) सिनेमातील 'जय बोलो बेईमान की' या गाण्यांसाठी मुकेश यांना फिल्मफेअर मिळाला होता.

विशेष म्हणजे या तीनही चित्रपटांचे संगीतकार होते शंकर जयकिशन.

अमिताभ बच्चन यांच्या 'कभी कभी' या सिनेमाच्या शीर्षक गीतासाठीही मुकेश यांना फिल्मफेअर मिळाला होता.

राज कपूर-नर्गिस दत्त

फोटो स्रोत, JH THAKKER VIMAL THAKKER

राज कपूरनंतर मुकेशचा आवाज ज्या अभिनेत्यासाठी सर्वाधिक परफेक्ट मानला गेला तो म्हणजे मनोज कुमार. मनोज कुमार यांनी जेव्हा चित्रपट निर्मितीला सुरूवात केली, तेव्हा त्यांनी बऱ्याचदा मुकेशचा आवाज वापरला.

मुकेश यांनी जवळपास 20 सिनेमांसाठी मनोज कुमार यांच्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. यामध्ये हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में, पत्थर के सनम, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, संन्यासी आणि दस नंबरी यांसारखे गाजलेले सिनेमे आहेत.

दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद, शशी कपूर यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसाठीही मुकेश यांनी पार्श्वगायन केलं होतं.

मुकेश हे त्यांच्या कामाप्रति किती प्रामाणिक होते, याचा एक किस्सा संगीतकार खय्याम यांनी सांगितला होता. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या कभी कभी चित्रपटासाठी मुकेश यांनी पार्श्वगायन केलं होतं.

खय्याम यांनी सांगितलं होतं, की जेव्हा ते 'कभी कभी'च्या गाण्यांची रिहर्सल करत होते, तेव्हा मुकेश यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता.

"डॉक्टरांनी त्यांना जिने चढायला मनाई केली होती. तेव्हा मी जुहूमधल्या ज्या फ्लॅटमध्ये राहात होतो, तिथे लिफ्ट नव्हती. मी तुमच्या घरी येतो, आपण तिथेच रिहर्सल करू असं मी त्यांना म्हटलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही. ते माझ्याकडे यायचे. गाण्यांच्या रिहर्सलमध्ये त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही."

मुकेश यांचा अमेरिका दौरा आणि शेवटचे क्षण

मुकेश यांचं निधन 27 ऑगस्ट 1976 मध्ये अमेरिकेतील डेट्रॉइट शहरामध्ये झालं. मुकेश तेव्हा जवळपास महिनाभरापासून कॅनडा आणि अमेरिकेतील कार्यक्रमांसाठी गेले होते. त्यांच्या या म्युझिकल शोमध्ये लता मंगेशकरही त्यांच्या सोबत होत्या. लता मंगेशकरांसोबत त्यांचं भावा-बहिणीसारखं नातं होतं. त्या मुकेश यांना भैय्या म्हणायच्या.

या दौऱ्यात नितीन मुकेशही वडीलांसोबत गेले होते.

24 आणि 25 ऑगस्टला मुकेश यांचे मॉन्ट्रियल आणि कॅनाडामध्ये दोन शो होणार होते. त्याचवेळी मुकेश यांना जरा थंडी वाजून आल्यासारखं झालं. त्यानंतर त्यांनी लता मंगेशकर यांना म्हटलं की, माझी तब्येत काही ठीक नाहीये. आज तुम्ही माझ्याऐवजी नितीनसोबत गाणार का?

मुकेश

लता मंगेशकर यांनीही होकार दिला. लता यांच्यासोबत नितीन यांनी पहिल्यांदा 'कभी-कभी मेरे दिल में' हे गायलं. प्रेक्षकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. हे पाहून मुकेश खूश झाला. नितीन यांनी लता यांच्यासोबत 'सावन का महिना' हे गाणं गायलं, तेव्हा स्वतः मुकेश यांनी हार्मोनियम वाजवलं.

या शोनंतर पूर्ण ग्रुप हा अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये पोहोचला. तिथे 27 ऑगस्टला संध्याकाळचा शो होता.

त्यादिवशी त्यांनी नितीन यांना आपली तब्येत ठीक असून आपण गाणं गाऊ शकतो, असं सांगितलं. त्यानंतर ते तयारी करण्यासाठी बाथरुममध्ये गेले. खूप वेळानं ते बाहेर आले तेव्हा घामानं डबडबले होते. त्यांनी तातडीने एसी लावायला सांगितला. एसी लावल्यानंतर नितीन यांनी लता मंगेशकर यांना फोन केला. लता दीदी, हृदयनाथ मंगेशकर मुकेश यांच्या रुममध्ये आले.

त्यांनी अँब्युलन्समधून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे पोहोचल्यावर थोड्या वेळातच मुकेश यांचं निधन झालं.

साधा माणूस

मुकेश हे अतिशय साधे होते, माणसं जोडून ठेवण्याचा त्यांचा स्वभाव होता.

असं सांगतात की, एक छोटी मुलगी खूप आजारी होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मुकेश यांचं गाणं ऐकल्यावर आपल्याला बरं वाटेल, असं तिला वाटत होतं. मुकेश यांना ही गोष्ट एका सुप्रसिद्ध फिजिशियनकडून कळली. तेव्हा मुकेश त्या मुलीला भेटायला गेले आणि त्या अनोळखी मुलीसाठी गाणंही गायलं.

आपल्या सहकलाकारांबद्दल ते खूप आदरानं वागायचे.

जेव्हा मुकेश यांनी 'उपकार' सिनेमातलं 'कस्मे वादे प्यार वफा सब' हे गाण ऐकलं तेव्हा मन्ना डे यांना फोन केला. इतकं छान गाणं मी गाऊ शकलो नसतो, असं त्यांनी मन्ना डेंना सांगितलं.

मुकेश यांचा असाच अनुभव संगीतकार कल्याणजी यांनी सांगितला होता.

कल्याणजी आनंदजी संगीत देत असलेल्या 'विश्वास' या चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. या सिनेमातलं 'चांदी की दीवार न तोडी' सारखं गाणं मुकेश यांनी आधीच गायलं होतं. पण 'आपसे हमको बिछड़े हुए एक जमाना बीत गया' या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार होतं. पण मुकेश तेव्हा मुंबईत नव्हते.

कल्याणजी आनंदजी यांनी हे गाणं मनहर उधास यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचं ठरवलं. मुकेश आल्यानंतर पुन्हा त्यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करता येईल असा विचार त्यांनी केला. त्याप्रमाणे मनहर उधास आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं रेकॉर्डही केलं.

मुकेश जेव्हा मुंबईला परत आले, तेव्हा हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना सांगितलं. पण मुकेश यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, या गाण्यात काय वाईट आहे? मनहरने इतकं छान तर गायलं आहे. त्याला हटवून पुन्हा माझ्याकडून का गाऊन घेताय?

असं सहसा कोणी करायचं नाही, असं आनंदजी यांनी म्हटलं होतं.

पण मुकेश यांनी हे केलं कारण जो नितळपणा त्यांच्या आवाजात होता, तोच त्यांच्या स्वभावातही होता. किंवा स्वभावातला नितळपणा त्यांच्या आवाजात उतरला होता, असंही म्हणता येईल.

(या लेखासाठी बीबीसी हिंदीसाठी ज्येष्ठ सिने पत्रकार प्रदीप सरदाना यांनी लिहिलेल्या लेखातले संदर्भ वापरले आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)