उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर टीका, 'आईला गिळायला निघालेली ही अवलाद'

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. 'आईला गिळायला निघालेली ही अवलाद' उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

"मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी आणखी काय वेगळं केलं असतं? कारण यांची भूक भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रिपद पण हवंय आणि आता यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलेत हे आता. राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी प्रमुख संजय राऊत यांना मुलाखत दिली, त्यात त्यांनी असं म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

"ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात... तुझं तेही माझं... माझं तेही माझं... ह्याचं तेही माझं... आणि त्याचं तेही माझं.. अशी सगळी ही वृत्ती आहे.. हावरटपणाला सीमा नसते," असंही ते पुढे म्हणाले.

2. 100 कोटीत राज्यसभेची सीट विकू पाहाणाऱ्या टोळीला अटक

100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट तसंच राज्यपाल करण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना सीबीआयने अटक केली आहे. या आरोपींना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.

यातल्या तिघांची नावं कमलाकर प्रेमकुमार बांदगर, रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आहे. तसंच आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. हे चारही जण राज्यसभा सीट, राज्यपाल आणि अन्य पदांसाठी लोकांकडून पैसे घेत होते.

मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातही अशीच घटना घडली होती. भाजपच्या आमदाराकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फक्त एकच नाही तर आणखी तीन आमदारांनाही अशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

3. सोनिया गांधींची पुन्हा ईडीकडून चौकशी होणार, 11 वाजता हजर राहण्याचे आदेश

काही दिवसांपूर्वीच ईडीने सलग दहा-दहा तास अशी चार-पाच दिवस राहुल गांधी यांची चौकशी केली आहे, त्यानंतर सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी ईडी कडून झाली आहे. सोनिया गांधी यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे. ही बातमी TV9 ने दिली आहे.

सोनिया गांधी

फोटो स्रोत, ANI

नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलं होता. मात्र सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या चौकशीला हजर राहू शकल्या नव्हत्या. तर राहुल गांधी हे ईडी समोर चौकशीला हजर राहिले होते.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र ही दिसून आलं. देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

4. दृष्टिहीनांना सहज ओळखू येण्यासाठी चलनी नोटांमध्ये बदल : रिझर्व्ह बँक

नवीन चलनी नोटा- नाणी ओळखण्यात आणि त्यात फरक करण्यात दृष्टिहीनांना अडचणी येत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

त्यावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने म्हटलं की, दृष्टिहीनांना सहज ओळखता येतील अशाच पद्धतीने नवीन चलनी नोटांमध्ये बदल करण्यात आल्याचा आणि हा बदल दृष्टीहीनांसाठी कार्यरत संघटनांना विचारात घेऊनच करण्यात आला.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

पूर्वीच्या नोटा आणि नाणी वेगवेगळय़ा आकाराच्या होत्या. त्यामुळे दृष्टिहीनांना त्या सहजपणे ओळखता येत होत्या. नवीन नोटा आणि नाण्यांचा आकार लहान करण्यात आलेला आहे. परिणामी दृष्टिहीनांना त्या ओळखणे कठीण जाते, असे याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेने चलनी नोटांमध्ये ओळख चिन्हे आणि उंचावलेल्या रेषांसह स्पर्श केल्यावर ठळकपणे जाणवतील असे बदल दृष्टिहीनांसाठी केले आहेत. त्यानुसार, 100 रुपयांच्या नोटेमध्ये त्रिकोण आणि चार रेषा आहेत, 500 रुपयांच्या नोटेत वर्तुळ आणि पाच रेषा आहेत आणि दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये आयत आणि सात रेषा आहेत.

5. डिसले गुरूजींना अब्दुल कलाम पुरस्कार

काही दिवसांपुर्वीच आपल्या राजीनाम्यामुळे चर्चेत आलेले ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

डिसले

फोटो स्रोत, TWITTER@RANJITDISLE

ही बातमी लोकमतने दिली आहे.

तंत्रज्ञानामधील अभिनव प्रयोगामुळे हा पुरस्कार डिसले गुरुजींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "खरंतर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्नं पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)