सुनील दत्त जेव्हा 'मदर इंडिया'च्या सेटवर आईच्या भूमिकेतील नर्गिसच्याच प्रेमात पडले..

फोटो स्रोत, MOTHER INDIA FILM
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
ते वर्ष असेल 1955 चं. त्यावर्षी राज कपूर आणि नर्गिस मद्रासच्या एव्हीएम स्टुडिओमध्ये 'चोरी चोरी' या चित्रपटाचं शूटिंग करत होते.
त्याच स्टुडिओमध्ये दुसरा एक सेट लागला होता. आणि तिथं पद्मिनी नावाच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या सिनेमाचं ही शूटिंग सुरू होतं. एव्हाना राज कपूर पद्मिनीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागले होते. आणि यावरून नर्गिस आणि राज कपूर यांच्यात खटके उडू लागले होते.
या सगळ्याचा आता शेवट करायचा, असं ठरवत नर्गिसने मेहबूब खान यांच्या 'मदर इंडिया' या नव्या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.
नर्गिसने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मेहबूबच्या चित्रपटातूनचं केली होती. आणि तोपर्यंत मेहबूब हिंदी सिनेसृष्टीत खूप प्रसिद्ध झाले होते.
मेहबूब यांच्या चित्रपटात भूमिका वठवून नर्गिसला संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं होतं की ती आता राज कपूर कॅम्पमधून बाहेर आली आहे.
'मदर इंडिया'च्या आधी म्हणजे 1940 मध्ये मेहबूब यांनी याच विषयावर 'औरत' नावाचा चित्रपट बनवला होता.
नर्गिस यांचं चरित्र 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ नर्गिस' मध्ये टिजीएस जॉर्ज लिहितात, मेहबूब यांना मदर इंडिया चित्रपटाची कल्पना 1937 मध्ये आलेल्या एमजीएम यांच्या 'द गुड अर्थ' मधून सुचली होती.
या चित्रपटाच्या लेखिका पर्ल एस बक यांनी एका चिनी शेतकरी कुटुंबाचं चित्रण केलं होतं. यात एका निस्वार्थी आईला सोसावं लागलेलं दुःख, अडचणी या चित्रपटात कमालीच्या संवेदनशीलतेने चित्रित केल्या होत्या.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
चित्रपट पाहिल्यानंतर हजारो प्रेक्षकांप्रमाणे रडणाऱ्या मेहबूब खान यांना, हा चित्रपट चीनप्रमाणेच भारतातही समर्पक ठरू शकतो याचा अंदाज आला.
त्यांचे सहाय्यक बाबूभाई मेहता यांनाही मॅक्सिम गॉर्कीच्या 'मदर' या कादंबरीतून प्रेरणा मिळाली होती.
पर्ल बक, मॅक्सिम गॉर्कीची कादंबरी आणि गुजरातमध्ये आलेल्या अनुभवांचा मिलाफ करून, मेहबूब यांनी 'औरत' हा चित्रपट बनवला. या चित्रपटातून भारतीय पडद्यावर पहिल्यांदाच स्त्रीत्वाचं अस्सल चित्रण दाखवण्यात आलं होतं.
दिलीप कुमार 'मदर इंडिया'मध्ये नायकाची भूमिका करणार होते...
राज कपूर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर नर्गिसने मदर इंडिया हा पहिला चित्रपट साईन केला.
मेहबूब यांनी दिलीप कुमार यांना हिरो म्हणून साईन केलं. पण नर्गिसने दिलीप कुमार यांच्यासोबत चित्रपट करावा अशी राज कपूर यांची इच्छा नव्हती.
जर मेहबूब यांचा प्लॅन यशस्वी झाला असता आणि दिलीप कुमार या चित्रपटात हिरो असते तर मात्र सुनील दत्त नर्गिसच्या आयुष्यात आलेच नसते.

फोटो स्रोत, INDUS BOOKS
झालं असं की, दिलीप कुमार आणि मेहबूब यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा केली. पुढे दिलीप कुमारांनी मेहबूब यांना सुचवलं की, चित्रपटातील नर्गिसच्या मुलाची भूमिका नव्याने लिहिण्यात यावी. आणि त्याचा डबल रोल दाखवावा. यात फर्स्ट हाफमध्ये नवरा आणि सेकंड हाल्फमध्ये मुलगा दाखवावा.
मेहबूब यांना ही कल्पना पटली आणि त्यांनी चित्रपटाच्या कथेत बदल करायला सुरुवात केली. या भूमिकेसाठी लागणारा खास विग बनवण्यासाठी दिलीप कुमारही लंडनच्या दिशेने रवाना झाले.
पण दिलीप कुमार यांच्या अनुपस्थितीत चित्रपटाच्या लेखकांनी आपला विचार बदलला.

फोटो स्रोत, Getty Images
आपण पुन्हा मूळ कथेवरचं काम करू म्हणून त्यांनी मेहबूब यांना पटवून दिलं. यथावकाश दिलीप कुमार लंडनहून परतले, तेव्हा त्यांना याविषयी समजलं आणि त्यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
अखेर बिरजू नामक मुलाची भूमिका सुनील दत्त यांना मिळाली.
नर्गिसने तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम अभिनय केला
या चित्रपटात नर्गिसने त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम अभिनयाची कलाकृती सादर केली होती. या चित्रपटात एका तरुण बायकोपासून ते वृद्ध स्त्री बनण्याची कथा गुंफण्यात आली होती. यात रोमान्ससोबत स्त्रीच्या सहनशक्ती आणि दृढतेची कथा सांगण्यात आली होती, जी आपल्या पोटच्या मुलाला गोळ्या घालण्यासही कचरत नाही.
टीजीएस जॉर्ज नर्गिसच्या चरित्रात लिहितात, 'नर्गिसला या भूमिकेमुळे भारतच काय तर संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळाली.'
त्यांना कार्लोव्ही व्हॅरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिलीप कुमार यांना जेव्हा नर्गिसचे तीन सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी 'मदर इंडिया' हा नर्गिसचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता असं म्हटलं. तिचा दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील 'मदर इंडिया' आणि तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील 'मदर इंडिया' होता असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
या चित्रपटाचा नकारात्मक परिणामही झाला. नर्गिस या भूमिकेपेक्षा छोटी भूमिका आता करणार नाही अशा पद्धतीने नर्गिसला टाईपकास्ट करण्यात आलं.
मदर इंडियानंतर प्रत्येक भूमिका त्यांच्यापुढं छोटीचं झाली. मदर इंडिया रिलीज झाल्यानंतरच्या तीस वर्षांनी म्हणजे 1988 मध्ये सुभाष झा यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक लेख लिहिला होता. ते लिहितात की, मार्लन ब्रँडोसाठी 'गॉडफादर' आणि ज्युली अँड्र्यूजसाठी 'द साउंड ऑफ म्युझिक' जसा होता तसाच नर्गिससाठी, मदर इंडिया हा चित्रपट होता. हा चित्रपट आणि नर्गिसची भूमिका इतकी गुंतली होती की दोघांना वेगळं करणं जवळपास अशक्यच होतं.
नर्गिसने स्वत: कबूल केलं होतं की मदर इंडिया केल्यानंतर त्यांना दुसऱ्या भूमिका करणं अशक्य झालं होतं. विशेष म्हणजे नर्गिसने ही भूमिका साकारली तेव्हा त्या अवघ्या 28 वर्षांच्या होत्या. आपल्या वयाच्या 28 व्या वर्षी आईची भूमिका साकारणं खरोखरच धाडसाचं काम होतं.
मेहबूबने सुनील दत्त यांना मदर इंडियासाठी साइन केलं
मदर इंडियामध्ये दिलीप कुमारला पर्याय शोधण्यासाठी मेहबूब खान यांना खूप मेहनत करावी लागली.
शेवटी ही भूमिका सुनील दत्तकडे गेली. त्यावेळी सुनील दत्त नर्गिसपेक्षा एक वर्ष ज्युनियर होते. सुनील दत्त एकेकाळी रेडिओ सिलोनसाठी काम करायचे. तिथं ते चित्रपटातील कलाकारांच्या मुलाखती घ्यायचे. 1953 मध्ये त्यांनी 'दो बिघा जमीन' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये कंपेयरिंग केलं होतं.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
पांढऱ्या सुटात असलेल्या सुनील दत्त यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चित्रपट कलाकारांना स्टेजवर बोलावून दोन शब्द बोलण्याची विनंती केली होती. यात एक स्टार होत्या नर्गिस. त्यांनी पांढरी साडी नेसलेली आणि केसात चमेलीचं फुल माळलेलं. ही त्यांची पहिली भेट होती.
त्यांना याची अजिबात कल्पना नसेल की पुढच्या पाच वर्षांत ते एकमेकांचे पती-पत्नी होतील. सुनील दत्त यांनी जेव्हा बीआर चोप्रा यांच्या 'एक ही रास्ता' या चित्रपटात काम केलं तेव्हा त्यांना भारतभर ओळख मिळाली. आणि अगदी तेव्हाच मेहबूब खान यांची नजर सुनील दत्तवर पडली.
सेटवर लागलेल्या आगीने सुनील दत्त आणि नर्गिस जवळ आले
अभिनयात उत्स्फूर्तता राहावी यासाठी मेहबूब आपल्या चित्रपटातील कलाकारांमध्ये मैत्री व्हावी म्हणून प्रयत्नशील असायचे.
चित्रपटातील कलाकारांनी पुरेसा वेळ सोबत घालवावा म्हणून ते अनेकदा आऊटडोअर शूट अरेंज करायचे. नर्गिसने तिचे दोन सहकलाकार सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांच्यासोबतही बराच वेळ घालवला.
मेहबूब यांनी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर फरदीन इराणी यांना पुराचे शॉट्स घेण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये पाठवलं होतं. कारण तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पूर आला होता. चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे महाराष्ट्र आणि गुजरात लोकेशनवर झालं होतं. दरम्यानच्या काळात एक घटना घडली ज्यामुळे नर्गिस सुनील दत्त यांच्या खूप जवळ आल्या.

फोटो स्रोत, NAMRATA DUTT
गुजरातमध्ये 'मदर इंडिया'त दाखवण्यात आलेल्या आगीचं शूटिंग सुरू होतं. पेंढ्याच्या ढिगात लपलेले सुनील दत्त बाहेर यावेत म्हणून आग लावण्यात आली होती.
टीजेएस जॉर्ज लिहितात, "नर्गिस जळत्या पेंढ्याच्या ढिगाऱ्यातून धावत असताना अचानक वाऱ्याची दिशा बदलली आणि नर्गिस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या."
ही बाब सुनील यांच्या लक्षात येताच त्यांनी आगीच्या ज्वाळांमध्ये उडी ठोकली आणि नर्गिसला बाहेर काढलं.
या प्रयत्नात सुनील दत्त स्वतः भाजले. सुनील दत्त यांच्या या वागणुकीने नर्गिसच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम जागृत झालं. नर्गिसने या प्रसंगाचं वर्णन आपल्या डायरीत केलंय. त्या लिहितात की, "रुग्णालयात आम्हाला पेथिडीनचे इंजेक्शन देण्यात आलं, जेणेकरून आमचा त्रास कमी होईल. इंजेक्शनमुळे आम्हाला झोप आली. जेव्हा कोणी माझ्याकडे यायचं तेव्हा त्यांना सुनील कसे आहेत? हे एकच प्रश्न विचारायचे.सुनील माझ्यापेक्षा अत्यवस्थ होते हे मला माहित होतं. 2 मार्चला मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले.
त्यांचा चेहरा, पोट आणि हात सर्व भाजलं होतं आणि त्यांना खूप वेदना होत होत्या. मी दिवसभर त्यांच्यासोबत बसून राहिले. नंतर मी त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली जणू ते माझाचं भाग असतील. काही दिवसातच अशी परिस्थिती झाली की मला त्यांच्यापासून मिनिटभरही दूर राहवेना. हे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदादायी क्षण होते."
नर्गिसने सुनील दत्त यांच्या बहिणीवर उपचार करवले
याच दरम्यान आणखी एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त आणि नर्गिस आणखीन जवळ आले.
एकदा शूटिंगदरम्यान सुनील दत्त खूपच उदास असल्याचं नर्गिसला जाणवलं. जेव्हा नर्गिसने सुनील दत्तना कारण विचारलं तेव्हा सुनील म्हणाले की, त्यांची बहीण राणीला टीबी झालाय आणि ती खूप त्रासात आहे.
नर्गिस शांतपणे तिथून उठल्या आणि सुनील दत्तच्या फ्लॅटवर येऊन पोहोचल्या. तिथून राणीला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेल्या. राणी पूर्णपणे बरी होईपर्यंत त्यांनी त्यांच्या मुलालाही आपल्या घरी आणून सांभाळलं.
पुढे या ना त्या कारणाने नर्गिस आणि राणीच्या भेटीगाठी वाढू लागल्या.

फोटो स्रोत, Getty Images
टीजेएस जॉर्ज लिहितात, 'एक दिवस नर्गिस बराच वेळ राणीच्या घरी थांबून होत्या. रात्र झाली असल्याने सुनील दत्त नर्गिसला त्यांच्या मरीन ड्राईव्हच्या घरी सोडायला गेले. जाता जाता त्यांनी नर्गिसला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यावेळी नर्गिसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत नर्गिसने राणीशी चर्चा केली. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुनील दत्त यांना त्यांची बहीण राणीच्या माध्यमातून त्यांच्या प्रपोजलचं उत्तर मिळालं.'
पुढे बर्याच वर्षांनंतर सुनील यांनी त्यांचे एक पत्रकार मित्र पी.के. रवींद्रनाथ यांना सांगितलं की, 'जर त्यांच्या आईने मुस्लिम सून स्वीकारायला संकोच केला असता, तर कदाचित सुनील यांनी नर्गिसशी लग्न केलं नसतं. आपला मुलगा याच मुलीसोबत आनंदी राहील याची जाणीव सुनीलच्या आईला झाली होती. त्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिले.'
'मदर इंडिया'चा प्रीमियर लिबर्टी सिनेमात
मदर इंडियाचा प्रीमियर 25 ऑक्टोबर 1957 रोजी मुंबईतील लिबर्टी सिनेमाहॉल मध्ये करण्यात आला.
त्यावेळी सुनील दत्त तिथे उपस्थित नव्हते.

फोटो स्रोत, MOTHER INDIA FILM POSTER
त्या दिवशी नर्गिस त्यांच्या डायरीत लिहितात, 'सर्वात आधी माझ्या कुटुंबातील काही सदस्य मुलांसोबत मदर इंडिया पाहायला गेले. मी श्वास रोखून त्यांच्या परतण्याची वाट पाहत होते. ते परत आले तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावर रडू दिसलं. आयएस जोहर तर धापा टाकत माझ्याजवळ पोहचले. ते शो पाहून थेट माझ्याजवळचं आले होते. ते इतके उत्तेजित झाले होते की त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
त्यांनी मला सांगितलं की, आता मी चित्रपटात काम करणं थांबवावं. मेहबूब खान यांनी मला फोन करून त्यांच्या घरी बोलावलं. मी तिथे पोहोचले तेव्हा जोहर, नेमानी आणि धीरूभाई तिथे आधीच हजर होते.'
यानंतर नर्गिस आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरला जायला तयार झाल्या. पण त्यांचे हात पाय थंड पडले होते. त्यांचं सर्वांग थरथरतयं याची जाणीव त्यांना झाली.
उपस्थितांनी टाळ्या वाजवून नर्गिसला दाद दिली
सुनील दत्त यांना पाठवलेल्या पत्रात नर्गिस लिहितात की, 'नवकेतन संपूर्ण प्रीमियरचे शूटिंग करणार असल्याचं मला सांगण्यात आलं. प्रत्येकजण मला तुझ्याबद्दल विचारत होता. तू माझ्या हृदयात, डोळ्यात आणि श्वासात आहेस हे मला लोकांना सांगायचं होतं. एका वृद्धेच्या रुपात जसा माझा पहिला सीन पडद्यावर आला तशा लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
मी तुझं घड्याळ माझ्या हृदयाजवळ धरून होते. लोकांना चित्रपट आवडला होता. इंटर्व्हल नंतर अन्वर माझ्याकडे आला आणि म्हणाला की, गोल्डीला मी हॉलमध्ये प्रवेश करताना माझा आणखी एक शॉट घ्यायचा आहे. मी उठल्याबरोबर अन्वरने माझं चुंबन घेतलं. मला त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. चित्रपटात तू खूप सुंदर दिसत होतास. चित्रपटातील तुझ्या रोलसाठी तू फारसा खूश नसलास तरी पण लोकांना तुला बिरजूच्या भूमिकेत बघायला आवडलं. मी फक्त याचसाठी प्रार्थना करत होते.'

फोटो स्रोत, HARPER COLLINS
त्याच दरम्यान नर्गिसने मांस आणि अंडी खाणं सोडून दिलं होतं. सुनीलशी लग्न करेपर्यंत त्या शाकाहारी राहतील असा प्रण त्यांनी केला होता. म्हणून जेव्हा मेहबूब खान यांनी मदर इंडियाच्या प्रीमियरची मेजवानी दिली तेव्हा नर्गिसने रोटी आणि फक्त लोणचं खाल्लं.
सुनील नर्गिसचं लग्न आणि ट्रॅफिक जाम
नर्गिस आणि सुनील दत्त यांचा विवाह 11 मार्च 1958 ला पार पडला.
सांताक्रूझ येथील आर्यसमाज हॉलमध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. त्या दिवशी एक मजेदार घटना घडली.
पोपच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईत ट्रॅफिक जॅम झालं होतं. आणि या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने नर्गिसला लग्नस्थळी पोहोचताचं आलं नाही.
नम्रता आणि प्रिया दत्त त्यांच्या 'मिस्टर अँड मिसेस दत्त मेमरीज ऑफ अवर पॅरेंट्स' या पुस्तकात लिहितात, 'सुनील दत्त तीन तास नर्गिसची वाट पाहत होते. गाडीत बसलेल्या नर्गिस विचार करत होत्या की, शेवटच्या क्षणी माझी फसवणूक झाली असं सुनीलला वाटू नये. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. आणि दुसरीकडे सुनील दत्त जागचे हलले नाहीत कारण, जर ते फोन करण्यासाठी गेले आणि इकडे नर्गिस आली तर तिला वाटेल की, ते तिला सोडून गेले.'

फोटो स्रोत, INDUS BOOKS
"पण नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या संयमाचं योग्य फळ त्यांना मिळालं आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचं लग्न पार पडलं. हा एक गुप्त विवाहसोहळा होता. कारण काही महिन्यांपूर्वीच मदर इंडिया प्रदर्शित झाला होता. लोकांमध्ये त्या दोघांची प्रतिमा आई-मुलगा अशी बनली होती. नर्गिस त्यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीच्या 'फर्स्ट लेडी' बनल्या होत्या, तर सुनील दत्त अजूनही सिनेसृष्टीत पाय रोवण्याच्या प्रयत्नात होते. नर्गिसकडे पैसा आणि प्रसिद्धी असल्यामुळे सुनील दत्त यांनी तिच्याशी लग्न केल्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण याचा नर्गिसवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. नर्गिसने मुस्लिम असूनही आपल्या पतीसाठी करवा चौथचा उपवास करायला सुरुवात केली."
'मदर इंडिया'ला ऑस्करसाठी नामांकन
'फिल्म इंडिया' मासिकाने मदर इंडियाला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केलं होतं. उत्तम कथा, घुमवदार प्लॉट, उत्तम संवाद, उत्तम संगीत आणि भावनांचा ओव्हरडोस असे सर्व गुण या चित्रपटात होते.
या चित्रपटाला जेवढं क्रिटिकल अॅक्लेम मिळालं, ते आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाला मिळालं नव्हतं. कथाकार जावेद अख्तर म्हणाले होते की, 'सर्व हिंदी चित्रपट मदर इंडियापासून जन्माला आलेत.'

फोटो स्रोत, HARPER COLLINS
किश्वर देसाई त्यांच्या 'डार्लिंगजी द ट्रू लव्ह स्टोरी ऑफ नर्गिस अँड सुनील दत्त' या पुस्तकात लिहितात की, 'मदर इंडियाच्या रिलीजमुळे नर्गिसवर एक बर्डन तयार झालं होतं. त्यांच्या मुलाखती आणि ऑटोग्राफ्स घेण्यात येऊ लागले. अभिनंदनासाठी फोनवर फोन येऊ लागले.'
प्रसिद्ध अभिनेत्री नादिरा यांनी नर्गिसच्या घरी येऊन त्यांचं चुंबन घेतलं आणि त्यांचं अभिनंदन केलं.
नर्गिसची यापूर्वी कोणत्याही भूमिकेसाठी एवढी प्रशंसा झाली नव्हती जेवढी 'मदर इंडिया'साठी झाली.
नादिरा नर्गिसला म्हणाल्या की, सुनीलच्या भूमिकेपेक्षा त्यांना त्याचा चेहरा आवडला. पण सुनीलचा अभिनय सर्वांना आवडला आहे या आपल्या मतावर नर्गिस ठाम होत्या.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीत 'मदर इंडिया'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती.
त्याच वर्षी नर्गिस यांना चित्रपटातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
1957 मध्ये 'मदर इंडिया'ला परदेशी भाषा श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळालं. मदर इंडियामधील अभिनयासाठी त्यांना त्या वर्षीचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























