आधी मुलगा, मग पती मारला गेला; शकीला म्हणतात- 'कयामत'च्या दिवशी हिशेब करेन...

शकीला अख्तर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

फोटो कॅप्शन, मुश्ताक अहमद यांच्या पत्नी शकीला अख्तर
    • Author, माजिद जहाँगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, काश्मीरहून
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

वडील आणि मुलाच्या मृत्यूनं संपूर्ण काश्मीर हादरलंय. 26 महिन्यांच्या काळात या बाप-लेकावर मृत्यू ओढवला.

या बाप-लेकाचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्यांनी झाला. फरक इतकाच की, वडिलांची हत्या कट्टरतावाद्यांनी केली, तर मुलावर सुरक्षारक्षकांनीच गोळ्या झाडल्या.

काश्मीरच्या कुलगाममधील सूच गावातली घटना. लोन कुटुंब मुलाच्या कथित चकमकीतून सावरत होते, तोवर त्याच्या वडिलांची हत्या करण्यात आली. लोन कुटुंब अक्षरश: दु:खाच्या खाईत लोटलं गेलंय.

13 जुलै 2022 रोजी संध्याकाळी श्रीनगरच्या लाल बाजारमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसात काम करणाऱ्या 55 वर्षीय असिस्टंट सब-इन्स्पेक्टर मुश्ताक अहमद लोन हे ड्युटीवर होते.

बाजारात मोठी गर्दी होती. लोक आपापल्या घरी परतत होते. त्याचवेळी कट्टरतावाद्यांनी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यात तीन पोलीस जखमी झाले.

या जखमींमध्ये असिस्टंट सब-इन्स्पेक्टर मुश्ताक अहमद लोनही होते. गोळी लागल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

मुश्ताक अहमद लोन यांच्या घरात शोकाकुळ वातावरण आहे. घराच्या अंगणात उभारण्यात आलेल्या मंडपात मुश्ताक अहमद यांच्या पत्नी शकीला रडताना कधी पतीचं नाव घेत होत्या, तर कधी मुलाचं.

आधी मुलगा मारला गेला आणि आता पती...

पतीच्या मृत्यूआधी त्यांच्याशी झालेला संवाद आठवत शकीला म्हणतात की, "त्यांनी ईद घरीच आमच्यासोबत साजरी केली. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमधून फोन आला की, ड्युटीवर यावं लागेल आणि त्यानुसार ते गेले. त्यांच्यावरील हल्ल्यापूर्वी मी त्यांच्याशी फोनवर बोलले होते.

त्यांनी घरातल्यांची ख्यालीखुशाली विचारली. त्याच दिवशी संध्याकाळच्या सात वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरून आम्हाला हल्ल्याची बातमी कळली. पाहता पाहता आमच्या घराबाहेर गर्दी जमू लागली. आम्हालाच कळत नव्हतं की, आमच्यासोबत काय झालं. दोन वर्षांत दुसऱ्यांदा हे घडलं. आधी मुलगा मारला गेला, आता पती."

शकीला अख्तर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

मुश्ताक अहमद लोन यांच्या अंत्ययात्रेत शेकडोंच्या संख्येत लोक सहभागी झाले होते आणि मुलाच्या अंत्ययात्रेत 150 किलोमीटर दूर केवळ कुटुंबाचे लोकच सहभागी झाले होते. मुश्ताक अहमद यांना स्थानिक कब्रस्तानात दफन करण्यात आलं.

ज्यावेळी मुश्ताक अहमद यांच्या दोन्ही मुली आणि बहिणींनी शवपेटीला बिलगून हंबरडा फोडला, ते दृश्य अंगावर शहारा आणणारं आणि काळीज पिळवटून टाकणारं होतं. मुश्ताक अहमद यांचा मुलगा आसिफ लोन तर शवपेटीला बराच वेळ बिलगूनच होता. किंबहुना, शवपेटी सोडण्यास तो तयारच नव्हता.

कट्टरतावाद्यांनी लाल बाजारात पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा 39 सेकंदांचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केलाय. हा व्हीडिओ स्वत: कट्टरतावाद्यांनी रेकॉर्ड केल्याचं सांगितलं जातंय. व्हीडिओत कट्टरतावादी पोलिसांवर गोळीबार करताना दिसत आहेत.

बीबीसी त्या व्हीडिओची स्वतंत्रपणे पडताळणी करु शकलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन कट्टरतावादी सहभागी होते. एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं जात आहे.

'कयामत'च्या दिवशी तुमचा हिशेब करेन...

दोन वर्षांपूर्वी 2020 च्या एप्रिल महिन्यात लोन कुटुंबाला फोनवरूनच पोलिसांनी सांगितलं की, तुमचा मुलगा चकमकीत मारला गेलाय, त्याचा चेहरा पाहण्यासाठी या.

जेव्हा शकीला पती मुश्ताक अहमद यांच्याबद्दल बीबीसीला सांगत होत्या, त्याचवेळी त्या मुलगा अकीबच्या मृत्यूबद्दलही बोलू लागल्या. शकीला पती आणि मुलाचा मृत्यू वेगवेगळा करू शकत नव्हत्या.

त्यांचं म्हणणं होतं की, "दोन वर्षांपूर्वी मुलगा मारला गेला, आता पती मारला गेला, दोन्हीवेळा दु:खाचं डोंगर कोसळलं. जेव्हा मुलगा मारला गेला, तेव्हा पोलिसांनी सांगितलं की, लपून येऊन मुलाचा चेहरा पाहून जा. त्यानंतर त्याच पद्धतीनं मी मुलाचा चेहरा पाहायला गेलो. त्यानंतर पुन्हा सांगितलं गेलं की, मुलाचा मृतदेह बारामुल्लाला दफन करण्यासाठी नेलं जाईल. त्यामुळे शेवटचं एकदा चेहरा पाहून घ्या. जेव्हा मी पुन्हा गेले, तेव्हा पोलीस माझ्याशी नीट वागले नाहीत. मी त्यांना सांगितलं की, तुमचा हा दबाव जगात खेळ बनलाय. कयामतच्या दिवशी तुम्हा सगळ्यांचा हिशेब करेन."

काश्मीर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

त्या पुढे म्हणाल्या की, "मग आम्हाला गाडीनं बारामुल्लाला नेलं गेलं. 2020 मध्ये कोरोनामुळे परिस्थिती वाईट होती आणि आम्ही भुकेले-तहानलेले असतानाही मोठा प्रवास करत बारामुल्लाला पोहोचलो."

आईनं सांगितलं, त्या दिवशी काय झालं होतं?

ज्या दिवशी मुलाचा मृत्यू झाला, त्या दिवशी नेमकं काय झालं, हे विचारल्यावर शकीला म्हणाल्या, "त्या दिवशी संध्याकाळी माझा मुलगा केस कापण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. नंतर आम्हालाही कळलं नाही की, त्याच्यासोबत काय झालं. त्याला कट्टरतावादी घेऊन गेले, पोलीस टास्कफोर्स घेऊन गेलं की आणखी कुणी, ते माहीत नाही.

पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमनं सांगितलं की, तुमच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी या. माझ्या मुलाचा रात्रभर फोन वाजत होता. आम्ही रात्रभर जागे होतो. आम्हाला वाटलं की, त्याचा फोन कुठेतरी पडला असावा. मग आम्ही श्रीनगरला गेलो आणि माझ्या पतीने पोलिसांच्या मदतीची विनंती केली. डीजी पोलिसांनी आमची काहीही मदत केली नाही."

त्यांनी सांगितलं की, "आम्ही सांगितलं की, आमच्या मुलाचा मृतदेह आम्हाला द्या. मात्र, पोलिसांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी माझ्या मुलाच्या छातीवर हँड ग्रेनेड आणि बंदुक ठेवली आणि माझ्या मुलाचा जीव घेतला. आता माझ्या पतीसोबतही अन्याय झाला. आमचं दु:ख आम्ही कुणाला सांगायचं? आम्ही तर संपलोच आहोत. आता बस्स झालं आणि आता आणखी काही बोलण्याची हिंमत नाहीय."

पोलिसांचा दावा

2020 साली पोलिसांनी दावा केला होता की, आकीब मुश्ताक एका चकमकीत मारला गेला.

पोलिसांच्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान चार कट्टरतावादी घटनास्थळावरून फरार झाले. तपास मोहिमेदरम्यान पोलिसांना आकीब मुश्ताकचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी सांगितलं की, आकीब मुश्ताक 'कट्टरतावाद्यांचा साथीदार' होता, त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता.

काश्मीर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

पोलिसांनी नंतर असंही सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, त्या चौकशीचा अंतिम निकाल अद्याप समोर आला नाहीय.

कुटुंबीयांनी तेव्हाही पोलिसांच्या दाव्याचं खंडन केलं होतं. त्यावेळी कट्टरतावाद्यांसारखं आकीबचा मृतदेहही 150 किलोमीटर दूर बारामुल्लामध्ये दफन करण्यात आलं. आकीब त्याच्या घरापासून दूर असलेल्या दुसऱ्या गावात मारला गेला होता.

मोठ्या भावाची स्थिती बिकट

आकीबचे मोठे भाऊ आसिफ मुश्ताक लोन घरात डोक्यावर हात घेऊन नुसते पडलेले असतात. ते कुणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. किंबहुना, कुणाशी ते बोलूही इच्छित नाहीत. त्यांना भाऊ आणि वडिलांच्या मृत्यूचा जबर धक्का बसला आहे.

आकीबप्रमाणेच आसिफ यांनीही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय.

खूप वेळ त्यांच्या बाजूला बसल्यानंतर एक-दोन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते तयार झाले. तुमच्या घरातील दोन जणांना गोळी मारण्यात आली, त्यावर ते म्हणाले की, "हे सर्व काश्मिरात होतच राहणार, लोक गोळीबारात मारले जात राहणारच, या गोळ्या इथल्या लोकांना मारण्यासाठीच आणल्यात. मग त्या कट्टरतावाद्यांच्या गोळ्या असोत वा सुरक्षारक्षकांच्या."

भावाबद्दल विचारलं असता, आसिफ म्हणाले, "आम्हालाच माहिती नाही, त्या रात्री त्याच्यासोबत नेमकं काय झालं."

काश्मीर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

त्याचसोबत आसिफनं असाही प्रश्न विचारला की, घरातून बाहेर पडल्यावर एका रात्रीत तो कट्टरतावादी कसा बनला?

बाप-लेकाच्या मृत्यूनंतर घरातले इतर सदस्य बोलण्याच्याही स्थितीत नाहीत. नातेवाईक, शेजारी सुद्धा मोकळेपणाने बोलण्याच्या अवस्थेत नाहीत. सगळे घाबरलेत आणि दु:खात बुडालेत.

दोन्हीकडे भीती

मुश्ताक अहमद यांचे शेजारी आणि पोलीस विभागात काम केलेले हाजी मुश्ताक अहमद ठाकूर म्हणाले की, आधी मुलाच्या आणि आताच्या वडिलांच्या मृत्यूनं या कुटुंबाला पार कोलमडवून टाकलंय.

काश्मीर

फोटो स्रोत, MAJID JAHANGIR

त्यांचं म्हणणं होतं की, "रात्रभर संपूर्ण गाव मुश्ताक अहमद यांच्या घरातच होतं. तो माझ्या मुलासारखा होता. मुश्ताक अहमदच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर आम्ही रात्रभर झोपू शकलो नाही. बापही गेला, लेकही गेला. त्यांच्या मागे मुश्ताकच्या दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा तर या दोन्ही घटनांनी वेड्यासारखाच झालाय. त्याला जबर धक्का बसलाय."

एका शेजाऱ्यानं सांगितलं की, "तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) सर्व माहीत आहेच. उघडपणे बोललं जाऊ शकत नाही. कारण एकीकडे कट्टरतावाद्यांची भीती आणि दुसरी सुरक्षारक्षकांची."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)