शहाजीबापू पाटील संजय राऊतांवर म्हणाले, 'हा माणूस सकाळी 10 वाजता बोलायला लागतो. सगळं वातावरण भडक केलं त्यांनी'

शहाजी बापू पाटील, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

फोटो कॅप्शन, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

"एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षं एकत्र काम केलं आहे. ते एकत्र येणार नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही. ते एकमेकांचे शत्रू नाहीत." शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

उद्धव ठाकरे निश्चितपणे वेळोवेळी टप्याने विचार करतील आणि संपूर्ण शिवसेना एकजुटीने काम करेल असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिंदे गटाचं भविष्य काय असेल? शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का? मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यांच्या लोकप्रिय डायलॉगवर पत्नीची प्रतिक्रिया काय होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?

या प्रश्नाचं उत्तर आपण नाही पण म्हणू शकत नाही. 25 वर्षं त्यांनी एकमेकांसोबत काम केलंय. ते एकमेकांचे शत्रू नाहीत. हा परिस्थितीचा निर्णय आहे. सत्तेचा नाही.

उद्धव साहेब वेळोवेळी टप्प्याने विचार करतील आणि संपूर्ण शिवसेना भविष्यात एकजुटीने काम करेल.

शिंदे गटातील आमदांना याबाबत काय वाटतं? पुन्हा एकत्र येण्याबाबत त्यांची भूमिका काय?

एकत्र यावं असं 100 टक्के आम्हाला वाटतं. का वाटू नये? उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे सर्व आमदारांच्या काळजात आहेत.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की खरी शिवसेना ठाकरेंची आहे. शिवसेना कोणाची याचं उत्तर काय?

बहुमत आमच्याकडे आहे. विधिमंडळातील 55 आमदारांपैकी सर्वाधिक आमदार आमच्या गटात आहेत. अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय निर्णय घेताना आकडे पाहणार.

आम्ही शिवसेनेत आहोत, कालही होतो आणि उद्याही शिवसेनेतच असणार. आम्ही शिवसेनेशी फारकत घेणार नाही.

शहाजी बापू पाटील, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

फोटो कॅप्शन, शहाजी बापू पाटील

खरी शिवसेना आमची आहे असं आम्ही म्हणतो. येत्या दोन ते तीन महिन्यात एकनाथ नेतृत्त्वाखाली शिवसेनेवर महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनता शिक्कामोर्तब करतील.

संजय राऊतांवर एवढा रोष का?

संजय राऊत यांच्या 'रोखठोक' सदराचा मी वाचक होतो. मला ते आवडायचं. अलीकडे त्यांच्या वागण्यात अहंकाराचा दर्प यायला लागला. हा माणूस सकाळी 10 वाजता बोलायला लागतो. सगळं वातावरण भडक केलं त्यांनी. या वातावरणात काम होत नाही.

झाडी, डोंगार, हाटील हा डायलॉग प्रसिद्ध झाल्यानंतर कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती?

घरात पाऊल टाकल्यावर ती (पत्नी) म्हटली, काय ते बोलून राहीला, डोंगार बिंगार, नीट राहाता येत नव्हतं का? नवरा जगाला माहीत झाला म्हटलं मी गप्प बस की.

मंत्रीमंडळ स्थापन व्हायला उशीर का होतोय?

याचं कारण मी सांगू शकत नाही. हा नेत्यांचा विषय आहे. पण मला वाटतं राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया चालू आहेत. हे कारण असू शकतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तयार करतील ते आदर्श मंत्रीमंडळ असेल.

तुम्हाला मंत्रिपदाची अपेक्षा आहे का?

मी शिंदे यांना वडील मानतो. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सख्ख्या भावासारखे संबंध आहेत. त्यांना वाटलं तर घेतील. एकनाथ शिंदे जी भूमिका देतील ती मी पार पडेन. आपल्या हातात काय आहे त्याचं सोनं कसं करतो त्यावर सर्व अवलंबून असतं.

शिंदे गटाचं नेतृत्त्व कोणाकडे आहे? शिंदे गटाचा पक्षप्रमुख कोण?

शिवसेनेचं पक्षप्रमुख व्हायचं का हा निर्णय नेत्यांचा असतो. आमचा नाही.

उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता का?

बंड करण्यापूर्वी दोन वेळा भेट झाली होती. आम्ही सर्व तक्रारी सांगितल्या. पण पुढे निर्णय झाला नाही. शिवसेना वाचेल त्यामुळे आम्ही गेलो. सत्तेसाठी आम्ही गेलो नाही.

शहाजी बापू पाटील, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

फोटो कॅप्शन, शहाजीबापू पाटील

महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालं. हे अनैसर्गिक सरकार आहे अशी भावना झाली. जनतेच्या समोर मतं मागत असताना त्या पद्धतीने जनतेने मत मागितलं त्याला तडा जातोय.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर भावनेमुळे मी शिवसेनेत आलो. मी काँग्रेसमध्ये मोठा झालो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कुरतडायला लागले आहेत हे समोर आलं.

निधी द्यायला तयार नाहीत, आमची कामं होत नाहीत, कोरोना काळात उद्धव ठाकरे आजारी होते. आम्हाला त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाली नाही. मोठ्या नेत्यांना वेळ मिळाली असेल माहिती नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)