मध्य प्रदेश : धाकट्या भावाचा मृतदेह घेऊन बसलेल्या चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल #5मोठ्याबातम्या

धाकट्या भावाचा मृतदेह घेऊन बसलेल्या चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल

फोटो स्रोत, शुरैह नियाज़ी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. धाकट्या भावाचा मृतदेह घेऊन बसलेल्या चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, काय आहे ही घटना?

मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये आठ वर्षांचा एक मुलगा आपल्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला आहे. त्याचे वडील गाडीसाठी वणवण फिरत आहेत, जेणेकरून त्यांना आपल्या लहानग्याचा मृतदेह घरी नेता येईल.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते काहीही न बोलता निघून गेले. मात्र राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीनुसार पूजाराम जाटव यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर गाडीसाठी विचारणा केली तेव्हा त्यांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला.

आता कोणतीही गाडी नाहीये आणि तुम्ही स्वतः गाडीची व्यवस्था करा, असं सांगण्यात आल्याचं पूजाराम यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी अँब्युलन्ससाठी विचारणा केली, पण त्यांच्याकडे दीड हजार रुपयांची मागणी केली गेली.

त्यानंतर ते आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन बाहेर आले. पण हॉस्पिटलबाहेर गाडी नव्हती. त्यानंतर त्यांनी नेहरू पार्कजवळ आपल्या आठ वर्षांच्या मुलाला मृतदेहासोबत बसवलं आणि गाडीच्या शोधात निघाले.

बीबीसी हिंदीने यासंबंधी सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. गुजरातला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी पुराची भीती

अहमदाबादसह गुजरातच्या दक्षिण आणि मध्य भागात असलेल्या विविध जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सुमारे सहा हजार पूरग्रस्तांना तेथून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

गुजरात पूर

फोटो स्रोत, NANDAN DAVE

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत संवाद साधला. सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य महामार्ग आणि पंचायत रस्त्यांसह 388 रस्ते मोठ्या पावसामुळे बंद झाले होते, ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 13 पथकं आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 16 पथके बचाव कार्यात सहभागी आहेत.

लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाबद्दलचं शरद पवारांचं ते विधान हास्यास्पद- इम्तियाज जलील

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी मंगळवारी (12 जुलै) औरंगाबादमध्ये भव्य असा मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्यापूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मंत्रिमंडळात घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाबाबत मला कल्पना नव्हती, असं पवारांचं विधान म्हणजे हास्यास्पद असल्याचं जलील म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी आधीच असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली होती. त्यांनतर सुद्धा शरद पवार म्हणतात की, याबाबत आम्हाला माहीत नव्हते. या कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित होते, राजेश टोपे, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. त्यामुळे औरंगाबादला येऊन स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार यांना एवढा वेळ का लागला आहे. कारण त्यांना माहिती होतं की, हा जो निर्णय घेण्यात आला आहे तो लोकांना पटलेला नाही," असं जलील म्हणाले.

इम्तियाज जलील

भाजप-शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी का या दोन्ही पक्षाने नामांतराचा निर्णय घेतला नाही. मात्र आता याचे श्रेयं आपल्याला मिळावे म्हणून, जाता-जाता उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याची टीका जलील यांनी केली.

4. ...तर रक्ताचे पाट वाहिले असते- अपक्ष आमदार शंकरराव गडाख

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. शिंदे गटात 40 आमदार सामील झाले आहेत, तर उरलेले 15 आमदार अद्याप उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अपक्ष आमदार शंकरराव गडाख देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

गडाख यांनी अहमदनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, "मंत्रिपद गेलं याचं वाईट वाटत नाही, पण विकासकामं थांबतील, याचं वाईट वाटतंय."

गडाख यांनी म्हटलं, "मला याठिकाणी एक सांगायचं आहे. उद्धव ठाकरे हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तामध्ये एक वेगळी ताकद निर्माण केली होती. बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होता. राज्यामध्ये नाही तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती, तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं."

अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असलो, तरी काही सिद्धांतामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिलीये.

5. मंत्रिपद मिळालं तर दहा हत्तींचं बळ येईल- संतोष बांगर

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं आहे. सोमवारी (11 जुलै) बांगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, "मंत्रिपद कोणाला नको असतं? मंत्रिपद देत असतील तर पुन्हा दहा हत्तींचं बळ माझ्यात येईल आणि मी पुन्हा शिवसेना वाढल्याशिवाय राहणार नाही."

"मी मंत्रिपदाच्या अपेक्षेने कोणतं काम करत नाही. एकनाथ शिंदे यांना वाटलं तर ते जबाबदारी देतील. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही मागून घेणारा नाही," असंही बांगर यांनी म्हटल्याचं लोकमतनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)