उद्धव ठाकरे राजीनामा : एकनाथ शिंदेंसमोर आता कोणते पर्याय आहेत?

'आम्ही अजून शिवसेनेतच आहोत, आम्ही पक्ष सोडला नाही' असे दावे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार वारंवार करत आहेत.
शिंदेंचं बंड आता यशस्वी झालंय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात त्यांना यश आलंय.
पण आता पुढे या आमदारांचं काय होणार? ते भारतीय जनता पक्षात जाणार की आणखी कोणतं पाऊल उचलणार? या प्रश्नांच्या उत्तरांवर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्यही अवलंबून आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांसमोर काय पर्याय आहेत, आणि त्याविषयी कायदा काय सांगतो?
शिंदेंसमोर दुसऱ्या पक्षात प्रवेशाचा पर्याय
एकनाथ शिंदेंसमोर पहिला पर्याय आहे, पक्षांतराचा.
एकनाथ शिंदे यांनी ते स्वत: धरून 50 इतर आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यात अपक्ष आमदारही आहेत आणि शिवसेनेचे 39 आमदार त्यांच्या बाजूनं आहेत.
म्हणजे सेनेच्या मूळ संख्याबळापैकी 2/3 पेक्षा जास्त आमदार सध्या आता शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचं विधानसभा सदस्यत्व किंवा आमदारकी रद्द होऊ शकत नाही. अर्थात हा पाठिंबा त्यांना विधानसभेत सिद्धही करावा लागेल.
पुन्हा निवडणुका न घेताच नवं सरकार सत्तेत येऊ शकतं आणि शिंदेसमर्थक त्यात सहभागी होऊ शकतात.
पण ते कुठल्या पक्षात सामील होतील? शिंदे गटासमोर भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा पर्याय आहे, पण काहींचा भाजपला विरोध असेल, तर वेगळा पेच निर्माण होऊ शकतो.

फोटो स्रोत, EKNATH SHINDE OFFICE
त्यामुळे भाजप नसेल, तर शिंदे समर्थक आमदार बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोनपैकी एका पक्षातही जाऊ शकतात.
पण पक्षांतर करणं सर्वच बंडखोर आमदारांना मान्य आहे का, यावर बरंच अवलंबून आहे. कारण भाजपसोबत किंवा दुसऱ्या पक्षासोबत जायचं म्हणजे त्यांना शिवसेना, धनुष्य बाण हे चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंची ओळख सोडून द्यावी लागेल.
म्हणजे ते शिवसेनेचे नेते राहणार नाहीत. पण इथे काय चित्र आहे, तर बंड सुरू झाल्यापासून त्यात सहभागी आमदार हे आम्हीच मूळ शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत.
स्वतंत्र गटाला मान्यता मिळणं अशक्य
एकनाथ शिंदेंना स्वतंत्र गट म्हणून मात्र मान्यता मिळू शकणार नाही. कारण कायद्यानुसार ते तसं करू शकत नाहीत.
आता हा कायदा कुठला, तर राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्ठात पक्षातंराविषयीच्या तरतुदी आहेत. 2003 साली 91 व्या घटनादुरुस्तीनुसार या दहाव्या परिशिष्टातून विभाजनाचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पक्षात फूट पडली तर बाहेर पडलेल्या गटाला दुसऱ्या नोंदणीकृत पक्षात सहभागी व्हावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
शिंदेंसोबत गेलेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना म्हटलं आहे की "विलीन म्हणू नका. आम्ही मूळ शिवसेना आहोत. कोर्टाच्या अनेक निर्णयांमध्ये म्हंटलंय की पक्षाची घटना महत्त्वाची नाही राज्यघटना काय सांगते हे महत्त्वाचं. त्यामुळे सर्व गोष्टी तपासून पाहात आहोत. त्यावर आता काहीच बोलता येणार नाही. जे काही होईल त्याप्रमाणे पुढचा निर्णय होईल."
विधीमंडळात शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत, हे सध्या स्पष्ट दिसतंय. दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना असा दावा करतायत. पण कोणता गट अधिकृत हा निर्णय कसा होईल?
निवडणूक आयोग आणि कोर्टाचा निकाल महत्त्वाचा
या वादात दोन्ही बाजू आणखी एक गोष्ट वारंवार सांगत आहेत. ती म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत. ही विधानं महत्त्वाचीही आहेत.

विधानसभेतल्या शिवसेनेच्या मूळ 53 आमदारांमध्ये फूट पडली असली, तरी पक्षात फूट सिद्ध करणं सोपं नाही. कारण निवडणूक आयोगासमोर जिल्हापातळीवर आणि तालुकापातळीवर सगळीकडे ही फूट झाल्याचं सिद्ध करावं लागतं.
विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सांगतात, की "आता हा प्रश्न इलेक्शन कमिशनच सोडवू शकेल. विधानसभेत नवीन अध्यक्ष येतील आणि त्यांच्यासमोरही हा मुद्दा जाऊ शकतो. अध्यक्ष काय निर्णय घेतात, कोणत्या गटाला अधिकृत म्हणून मान्यता देतात हेही पाहावं लागेल. पण अशा परिस्थितीत दुसरा गट अध्यक्षांविरोधात कोर्टातही जाऊ शकतो. याआधी काँग्रेसमध्ये किंवा जनता पक्षात फूट पडली होती, तेव्हा निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना मान्यता दिली होती आणि मूळ चिन्ह फ्रीज केलं होतं. तसंच यावेळी होऊ शकतं." अशी आठवणही अनंत कळसे करून देतात.
हा विषय आधीच कोर्टासमोरही आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या उरलेल्या 16 आमदारांनी वेगळा गटनेता निवडला होता आणि तर अध्यक्षपदाचा कारभार पाहणाऱ्या उपाध्यक्ष नरहरी झिरवळांविरोधात शिंदे गटानं अविश्वास ठराव दाखल केला होता. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात युक्तीवाद झाला तेव्हा शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी आमचाच गट मूळ पक्ष असल्याचा दावा केला होता. पण त्यावर अजून काही निर्णय आलेला नाही.
संकलन - जान्हवी मुळे
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























