एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील आणि म्हाडाच्या लॉटरीत घर लागलेले आमदार आहेत तरी कोण?

संदीपान भुमरे

फोटो स्रोत, Sandipan Bhumare/ facebook

फोटो कॅप्शन, संदीपान भुमरे
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेले पैठणचे आमदार तसेच रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना म्हाडाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भुमरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

औरंगाबादमधील म्हाडाच्या चिकलठाणा येथील घरासाठी शुक्रवारी ऑनलाईन सोडत झाली. या सोडतीत मंत्री भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचे घर लागले आहे.

आमदार कोट्यातून घर मिळण्यासाठी अल्प उत्पन्न गटातून (एलआयजी) औरंगाबादमधील चिकलठाणा येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी संदीपान भुमरे यांनी अर्ज केल्याचं माध्यमांमध्ये आलं आहे. त्यानुसार भुमरे यांना एल-2,2,202 क्रमांकाचा प्लॉट लागला आहे.

म्हाडाची मराठवाड्यातील बाराशे सदनिकांसाठी शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने सोडत घेण्यात आली. या सोडतीसाठी आठही जिल्ह्यातून जवळपास 11 हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. म्हाडातर्फे विविध गटासाठी काही सदनिका राखीव ठेवण्यात येतात.

यातूनच राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी देखील दोन टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतात. या राखीव कोट्यातून भुमरे यांना घर मिळाले आहे.

कोण आहेत संदीपान भुमरे?

शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री आहेत.

संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत.

ज्या कारखान्यात स्लिप बॉय, त्याच कारखान्याचे चेअरमन

टीव्ही 9 मराठीच्या बातमीनुसार, संदीपान भुमरे यांनी सुरुवातीच्या काळात पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम केलं. विशेष म्हणजे ज्या कारखान्यात त्यांनी स्लिप बॉय म्हणून काम केलं, पुढे त्याच कारखान्याचे चेअरमन झाले.

कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी 1988मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय इनिंगला सुरुवात केली. 1989मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.

त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभातीपद मिळवले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1993मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले.

अब्दुल सत्तार, आदित्य ठाकरे आणि संदीपान भुमरे

फोटो स्रोत, Sandipan Bhumare

फोटो कॅप्शन, अब्दुल सत्तार, आदित्य ठाकरे आणि संदीपान भुमरे

1995 च्या विधानसभा निवडणुकीत भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1999 आणि 2004 निवडणूकही जिंकली.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे यांना पाच वर्षे घरी बसावं लागलं. पुढे 2014 आणि 2019ची निवडणूक सहजपणे जिंकली. भुमरे हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)