नरेंद्र मोदींचा फोटो विठ्ठलापेक्षा मोठा, राष्ट्रवादीचा आक्षेप #5मोठ्याबातम्या

स्वागत फलक

फोटो स्रोत, @ravikantvarpe

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. स्वागत फलकावर विठ्ठलापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूत दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक शहरभर लावण्यात आले आहेत.

पण पुण्यातील काही भागांमध्ये फलकावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला आहे.

विठ्ठलापेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रविकांत वरपे यांनी ट्वीट केलं असून भाजपाने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला आहे.

देहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु , फलकावर विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

2. आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरू

कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं.

सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

प्राथमिक शाळा

फोटो स्रोत, Getty Images

अशातच, राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली.

शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

3. पंकजा मुंडे समर्थकांचा पुन्हा राडा

पंकजा मुंडे समर्थकांनी आज पुन्हा राडा केला. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

विधान परिषदेत डावलल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक अजूनही नाराज आहेत.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

पंकजा मुंडे समर्थकाकडून भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकीट न दिल्यामुळे त्यांचं समर्थक नाराज आहेत. याआधी बीडमध्येही मुंडे समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

4. लिहून ठेवा, 2024 च्या विधानसभेला 170 जागा - चंद्रकांत पाटील

2024 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. मग त्यांनी तिन्ही पक्षाने सोबत यावे की, एकट्याने यावे हा त्यांचं प्रश्न आहे. पण लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असं भाकितच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, facebook

राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर धनंजय महाडिक यांची कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. तब्बल 3 तास ही मिरवणूक चालली होती. अंबादेवी मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला.

महाडिकांनी सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. यानंतर माध्यमांशी बोलत असताना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज दिलं.

5. गौतम गंभीरसह भाजपाच्या नेत्यांनी नुपूर शर्मा यांना दर्शवला पाठिंबा

प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभर निदर्शने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे.

शर्मा यांना देशभरातून विरोध होत असताना, माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गौतम गंभीरने ट्वीट करत म्हटलं की, "माफी मागितल्यानंतरही एका महिलेबाबत देशभर द्वेषपूर्ण बोललं जात आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत तथाकथित 'सेक्युलर लिबरल' लोकांचं मौन चिंताजनक आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)